Saturday, April 27, 2024
Homeनाशिकचला भटकंतीला ! मावळ्यांच्या शौर्याचा साक्षी : किल्ले साल्हेर

चला भटकंतीला ! मावळ्यांच्या शौर्याचा साक्षी : किल्ले साल्हेर

नाशिक ! गोकुळ पवार
जिल्ह्यातील सर्वाधिक दुर्गांचा मान लाभलेल्या सटाणा तालुक्यातील महत्वाचा किल्ला म्हणजेच साल्हेर किल्ला होय. कळसुबाई शिखरांनंतर सह्याद्री पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला तसेच सह्याद्रीच्या किल्ल्यांचे ‘मस्तक’ म्हणून साल्हेरची ओळख आहे.

नाशिकहून सटाणामार्गे ताहराबाद गाठायचं. तिथून ताहराबाद-मुल्हेर-साल्हेरवाडी असा एसटीने एक तास प्रवास करत पायथ्याशी असलेल्या साल्हेरवाडी गावांत पोचता येतं. तिथून साल्हेरच्या पश्चिमेकडून तीन तासांत किल्‍ल्‍यावर चढाई करता येते. सह्याद्रीच्या मुख्यरांगेला लागूनच साल्हेरचा आहे. समुद्रसपाटीपासून १५६७ मीटरची उंची लाभलेला साल्हेर हा भौगोलिकदृष्टय़ा मोक्याच्या ठिकाणी आहे. कोकणातून काही घाटरस्ते या परिसरामध्ये चढतात. यातील सहा घाटांवर येथून लक्ष ठेवता येत होते त्यामुळे शिवकाळात मुख्य किल्ला होता.

- Advertisement -

साल्हेर किल्ल्याचा भव्यदिव्य इतिहास मावळ्यांच्या शौर्याची आठवण करून देतो. गुजरात आणि बागलाण या प्रांतांना जोडणाऱ्या व्यापारी मार्गावर असलेल्या किल्ल्याचे महत्व शिवाजी महाराजांनी ओळखले होते. त्यामुळे त्यांनी १६७० मध्ये सुरतेच्या लुटीच्या वेळी परतताना साल्हेरचा किल्ला जिंकून घेतला. याबद्दल औरंगजेबाला माहिती होताच त्याने सरदार इखलास खानाला साल्हेर काबीज करण्यास पाठवले. यावेळी स्वराज्याच्या इतिहासात प्रथमच मैदानावर सर्वात मोठं युद्ध मराठे आणि मोगल सैन्यामध्ये झाले होते. यामुळे साल्हेर किल्ला हा मावळ्यांच्या शौर्याची साक्ष देतो.

साल्हेरवाडीच्या पायथ्यापासून किल्ल्यावर जायला वाट मिळते. आपल्यासमोर उभा असलेला कातळकडा आपली नजरेत भरतो. तिथून कोरीव पायऱ्यांनी पहिल्या दरवाज्यासमोर पोचायचं. तेथील दरवाज्याचं वैशिष्ट्य म्हणजे चुना न वापरता केवळ एकावर एक दगड रचून केलेली बुरूज बांधणी, खरोखरच अप्रतिम! त्यानंतर दोन दरवाजे पार करून माचीवर प्रवेश करता येतो. यावेळी गडाच्या पहिल्या टेकडीवर चंदन टाके पाहावयास मिळतात. हळूहळू दरवाजे पार केल्यानंतर डाव्या बाजूने तटबंदी, चौथरे, पाण्याची टाकी, यज्ञकुंड आदी वास्तूसुद्धा इतिहास सांगताना जाणवतात.

गडाच्या पठारावर पोहचल्यानंतर येथील विस्तीर्ण आकाराचा तलाव दिसून येतो. यास गंगासागर तलाव किंवा दुधी तलाव असेही म्हटले जाते. तलावाला जोडूनच गंगा यमुना या दोन टाक्यांमधील पाणी पिण्यायोग्य आहे. तसेच रेणुका मंदिरा शेजारील संजीवन टाके आकर्षित करतात. अशा या झुंजार आठवणींचा ठेवा असलेल्या साल्हेर किल्ल्यास भेट द्यायलाच हवी!

- Advertisment -

ताज्या बातम्या