Friday, April 26, 2024
Homeनाशिकटेहळणी नाक्याचे ठिकाण : किल्ले अंकाई-टंकाई

टेहळणी नाक्याचे ठिकाण : किल्ले अंकाई-टंकाई

नाशिक । गोकुळ पवार : महाराष्ट्राला अभेद्य अशा गडकिल्ल्यांचा वारसा लाभला असून नाशिक जिल्ह्यातही अनेक गडकिल्ले इतिहासाची साक्ष दत्त अभिमानाने उभे आहेत. यापैकी एक म्हणजे येवला तालुक्यातील मुघलशाही, निजामशाही आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा साक्षीदार असलेला अंकाई-टंकाई किल्ला होय.

अंकाई-टंकाई या किल्ल्यांची जोडगोळी अंकाई या गावालगत आहे. यादवकालीन एका ताम्रपटात (इसवी सन ९७४) त्या किल्ल्याचा उल्लेख ‘एककाई दुर्ग’ असा केलेला आढळतो. दरम्यान या किल्ल्यांचे वैशिष्ट्य असे कि एकाच खिंडीने वेगळ्या झालेल्या दोन डोंगरांवर हे किल्ले बांधलेले आहेत. सुरत – औरंगाबाद व्यापारी मार्ग या डोंगररांगेजवळून जात असल्याने या मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि संरक्षणाच्या दृष्टीने या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली होती.

- Advertisement -

नाशिकपासून निघाल्यावर येवला मार्गे किंवा मनमाड मार्गे देखील या किल्ल्यांवर जाता येते. किल्ल्याच्या पायथ्याशी अंकाई हे गाव लागते. सुमारे १००० वर्षांपूर्वी देवगिरीच्या यादवांनी या किल्ल्याची उभारणी केल्याची माहिती मिळते. त्याकाळी या किल्ल्यांचा उपयोग टेहळणी नाका म्हणून केला जात असे. या किल्ल्यांवरून खानदेश भागातील व गोदावरी खोऱ्यातील विस्तृत प्रदेशावर लक्ष ठेवणे सोपे असायचे. किल्ल्याच्या पायथ्याशी जैन लेणी, पुरातन अवशेष पाहावयास मिळतात.

किल्ल्याची सध्याची स्थिती अतिशय बिकट असून तटबंदी मात्र मजबूत आहे. किल्ल्याच्या पायथ्यालाच प्राचीन लेण्या पाहावयास मिळतात. लेणी पाहुन पायर्‍यांच्या मार्गावर आल्यावर आपण किल्ल्याच्या दुसर्‍या प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. प्रवेशव्दाराच्या बाजूला दोन भव्य अष्टकोनी बुरुज आहेत. या प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर कातळात खोदलेल्या (८० अंशाच्या कोनात) पायर्‍यांनी आपल्याला उभा चढ चढावा लागतो.काही पायर्‍या चढुन गेल्यावर तिसरे प्रवेशव्दार येते. त्यापुढे चौथे प्रवेशव्दार येते. पुढे पाचवा आणि झीज झालेले दगड असलेला सहावा दरवाजा ओलांडल्यावर किल्ल्यावर प्रवेश होतो.

किल्ल्यावर प्रवेश केल्यानंतर दोन तीन गुहा पाहावयास मिळतात. किल्ल्यात मध्यभागी हौदासारखे दगडी बांधकाम आहे. तेथून उत्तरेकडे बाहेर पडण्यासाठी भुयारी रस्ता आहे. तसेच कातळात कोरलेला “काशी तळे” नावाचा तलावही आहे. बाजूलाच एका छोटास मंदिर आपले लक्ष वेधून घेते. येथून दिसणारा विलोभनीय परिसर सुखावणारा असतो. या किल्ल्यावरून कात्रा किल्ला, हडबीची शेंडी, गोरक्षनाथाचा डोंगर व मनमाड शहर नजरेच्या टप्प्यात येतो. येथूनच टंकाई किल्ल्यावरही जाता येते. दरम्यान अनकाई किल्ला व आजुबाजूच्या परिसरास पर्यटन स्थळाचा दर्जा मिळालेला आहे. दुर्गप्रेमींनी व पर्यटकांनी नक्कीच या वैभवशाली व ऐतिहासिक किल्ल्यावर जायलाच हवं…

पायथ्याचं गांव – अंकाई
उंची : अंकाई – ३१५२ फूट
टंकाई – २८०२ फूट
चढाई श्रेणी – सोपी
रांग – अजिंठा सातमाळा
वैशिष्ट्य : किल्ल्याचे प्रवेशद्वाराचे बांधकाम लाकडी आहे.
जायचे कसे : नाशिकहून मनमाड किंवा येवला. मनमाडमार्गे गेल्यास येथून अवघ्या १० किमीवर अंकाई गाव आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या