आमदारांची स्वारी यंदा नाही महापालिकेच्या दारी

आमदारांची स्वारी यंदा नाही महापालिकेच्या दारी

नाशिक । कुंदन राजपूत
महापालिका सभागृहात काम केलेले अनेक नगरसेवक पुढे जाऊन आमदार झाले. मात्र आमदार झाल्यावर त्यांनी नगरसेवकपदाला सोडचिठ्ठी दिली नाही. आमदारकीसोबत अडीच वर्षे नगरसेवकपदही उपभोगले. यंदा मात्र निवडणूक लढवलेले नगरसेवक पराभूत झाले, तर आमदार झालेल्या राष्ट्रवादीच्या सरोज अहिरे यांनी निवडणुकीपूर्वीच नगरसेवक पदाचा राजीनामा दिला होता.

त्यामुळे आमदारकीसोबत नगरसेवक हा डबलबार यंदा दिसणार नाही. तब्बल 15 वर्षांनंतर हे चित्र पाहायला मिळत आहे. याअगोदर सात आमदारांनी एकाचवेळी विधानसभा व महापालिका या दोन्ही सभागृहांचे सदस्यत्व उपभोगले आहे.

डॉ. शोभा बच्छाव, वसंत गिते, बाळासाहेब सानप, प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ. राहुल आहेर हे सहा जण नगरसेवक असताना विधानसभेची निवडणूक लढवत आमदार झाले. तर डॉ. अपूर्व हिरे हे नगरसेवक असताना विधान परिषदेवर शिक्षक आमदार म्हणून निवडून गेले होते. या सर्वांना आमदार झाल्यानंतर नगरसेवकपद सोडण्याचा मोह आवरता आला नाही. आमदारकीसोबत त्यांनी अडीच वर्षे नगरसेवक म्हणून काम केले होते. आमदार झाले तरी त्यांची स्वारी महापालिका सभागृहात दिसायची.

विधासभेच्या सभागृहाप्रमाणे महापालिका सभागृहातही त्यांची तोफ धडाडायची. सन 2004 च्या विधानसभा निवडणुकीत नगरसेविका डॉ. शोभा बच्छाव आमदार झाल्या. मात्र त्यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला नाही. त्यानंतर वसंत गिते यांनी त्यांच्या पूर्वश्रमीचा पायंडा कायम ठेवला. मनसेनेच्या लाटेत सन 2009 च्या विधानसभा निवडणुकीत ते नाशिक मध्य मतदारसंघातून आमदार झाले. त्यांनीदेखील दोन्ही सभागृहांत काम केले.

विशेष म्हणजे त्या माध्यमातून त्यांनी महापालिकेच्या राजकारणावर पकड कायम केली. सन 2014 च्या निवडणुकीत मोदी लाटेत भाजपचे बाळासाहेब सानप, प्रा. फरांदे, सीमा हिरे व डॉ. राहुल आहेर या चारही जणांना आमदारकीची लॉटरी लागली. त्यांनीदेखील हाच कित्ता गिरवला. या चौघांनी इतरांप्रमाणे महापालिका व विधानसभा या दोन्ही ठिकाणी काम केले. तब्बल 15 वर्षे आमदारकीसोबत नगरसेवकपद हे समीकरण अबाधित होते.

दीड महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सरोज अहिरे, दिलीप दातीर, विलास शिंदे, डॉ. हेमलता पाटील, योगेश शेवरे या नगरसेवकांनी विधानसभा लढवली. मात्र सेनेचे मटाले यांनी मनसेनेकडून तर भाजपच्या सरोज अहिरे यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली. पक्षांतर कायद्यामुळे त्यांनी अगोदरच त्यांच्या पदाचे राजीनामे दिले होते. वरीलपैकी सरोज अहिरे या एकमेव आमदार झाल्या. इतर नगरसेवक पराभूत झाले. त्यामुळे नगरसेवक व आमदार हे चित्र यंदा पाहायला मिळणार नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com