सिन्नर : वडांगळी येथील देव नदीपात्रातून वाळूची चोरी; नदीपात्राची चाळण

jalgaon-digital
2 Min Read

सिन्नर : तालुक्याची जीवनवाहिनी असणारी देवनदी वाळू तस्करांमुळे संकटात सापडली आहे. वडांगळी परिसरात असलेल्या देव नदीपात्रातून वाळूसाठी उघडपणे खोदकाम सुरू असून नदीपात्राची अक्षरशः चाळण झाली आहे.

दरम्यान सध्या लॉकडाऊन असताना वाळू चोरांनी याकडे मोर्चा वळविला आहे. या प्रकाराकडे कोरोनाचे कारण देत प्रशासकीय यंत्रणांना लक्ष द्यायला वेळ नसल्याने वाळू तस्कर याचा फायदा घेत असल्याची चर्चा परिसरात होत आहे.

वडांगळी परिसरात गेल्या महिनाभरापासून हे खोदकाम करण्यात येत आहे. दिवसा ट्रॅक्‍टरचा वापर करून तर रात्रीच्या वेळी डंपर मधून हिवरगाव रस्त्याने नाशिक, सिन्नरकडे ही वाहतूक होत असल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकारात काही स्थानिक व्यक्तींचा सहभाग घेतल्याने वाद नको म्हणून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. अर्थात वाळूतस्करीचा हा व्यवसाय काही स्थानिक यंत्रणांना हाताशी धरून केला जात असल्याने तक्रार कोणाकडे करायची हा प्रश्न ग्रामस्थांपुढे आहे.

देवनदी तालुक्यातील एकमेव मोठी नदी आहे. यंदाच्या पावसाळ्यात ही नदी दुथडी भरून वाहिल्याने काठावरील गावांमध्ये नंदनवन फुलले आहे. जुन्या बंधाऱ्यांची दुरुस्ती आणि नवीन साखळी बंधारे यामुळे नदीकाठच्या गावांतील जलस्तर उंचावला आहे. जानेवारीपासून नदीचा प्रवाह थांबल्याने अनेक ठिकाणी पात्र उघडे आहे. ही ठिकाणे आता वाळू माफियांचे लक्ष्य आहेत.

कारवाई करणार

ज्या ठिकाणी वाळू चोरी होते तो भाग मुख्य रस्त्यापासून खूप आत आहे. त्यामुळे एखादे वाहन त्या बाजूला गेले तर चोरटे सावध होतात. ग्रामस्थांपैकी कुणीतरी पुढे येऊन थेट माझ्याशी संपर्क साधावा. अशा व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवले जाईल. त्यामुळे तेथे वाळू भरणारी वाहने असल्याची खात्रीशीर माहिती मिळून कारवाई करणे सोपे होईल. चोरण्यात येणारी वाळू तालुक्यातच कुठेतरी साठवली जात असेल. या साठ्याचा देखील शोध घेतला जाईल.
– राहुल कोताडे, तहसीलदार

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *