Type to search

Featured

चला दुर्गभ्रमंतीला! अजस्त्र पहूडलेला आणि धडकी भरविणारा धोडप किल्ला

Share
चला दुर्गभ्रमंतीला! अजस्त्र पहूडलेला आणि धडकी भरविणारा धोडप किल्ला Latest News Nashik The Second Tallest Dhodap Fort in the State of Maharashtra

नाशिक । गोकुळ पवार : नाशिक जिल्हा किल्ल्यांची समृद्ध बनलेला आहे. जिल्ह्याच्या मध्यभागातून जाणारी सह्याद्रीची पूर्वपश्चिम डोंगररांग म्हणजे अजंठा-सातमाळ. या डोंगररांगेत वसलेल्या कळवण तालुक्यात गिरिदुर्गांची मालिकाच दिसते. या डोंगररांगेमधील सर्वात उंच आणि बलदंड किल्ला म्हणजे धोडप हा होय. शिवलिंगासारख्या आकाराचा माथा असलेला धोडप पर्यटकांच्या नजरेत भरतो.

महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त गिरीदुर्ग नाशिक जिल्ह्यात आढळून येतात. अगदी हतगड-अचला पासून ते साल्हेर-मुल्हेपर्यंत आणि आड-पट्टय़ापासून ते गाळणा-कंकराळय़ापर्यंत एकापेक्षा एक सरस आणि सुरम्य गिरिदुर्ग या नाशिक जिल्ह्याने धारण केले आहेत. यातील एक रंग म्हणजेच अजंठा सातमाळ होय. याच डोंगररांगेत धोडप किल्ला एखाद्या भिंतीसारखा ताठ मानेने उभा आहे. एका विशेष रचनेमुळे हा किल्ला नेहमीच पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो.

नाशिकहून गाडी पकडली का थेट वडाळीभोई गाठून धोडांबे गावात प्रवेश करावा लागतो. येथून जवळच म्हणजेच किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हट्टीपाडा या गावातुन किल्ल्यावर प्रवेश करावा लागतो. यानंतर गडाच्या बालेकिल्ल्याकडील भागात साधारण २०० मीटर उंचीचा ‘शेंडी’ नावाचा सुळका पाहावयास मिळतो. सुळका पाहिल्यानंतर पायवाटेने सुळक्याच्या खाली असलेल्या गुहेमध्ये पोहोचतो. यातील एका गुहेत पिण्यायोग्य पाणी आहे. दुसर्‍या गुहेत एक मंदिर आहे. ही जागा मुक्कामाच्यादृष्टीने योग्य आहे. गुहेच्या पुढे सरळ गेल्यावर निमुळती होत जाणारी कातळभिंत आहे. या भिंतीला असलेली खाच पर्यटकांना विचार करायला लावणारी आहे.असं म्हणतात कि शत्रूला हेरण्यासाठी या खाचेचा उपयोग करण्यात येत असावा.

ही खाच ओलांडल्यानंतर माचीसारखा भाग मोकळा असून उंचावर असल्यामुळे येथून गडाचा परिसर तसेच धोडपचा वरचा सुळका उत्तम प्रकारे दिसतो. येथून चांदवड, इंद्राई, राजदेहेर, कांचन मंचन, कण्हेरगड, रवळ्याजवळ्या, सप्तश्रृंगी, अहीवंतगड, अचला अशी सातमाळा रांग पहायला मिळते. धोडपवरून साधारण २५ किल्ले पर्यटकांना दिसतात. किल्ल्यावर राजवाड्याचे जोते, देखणी तटबंदी व बुरुज, संरक्षक दरवाजे किल्ल्याचे गतवैभव दर्शवितात.

किल्ल्याच्या पूर्वाभिमुख असलेल्या कातळ कोरीव दरवाज्यावर बाहेरील बाजूस ‘फारशी’ भाषेत शिलालेख आहे. महादरवाजा, सोनार माची, अनेक मंदिरे, कमान व पायऱ्या असलेली विहीर पाहायला मिळते. फारशी भाषेत असलेल्या शिलालेखात हिजरी १०४६ मोहरम महिन्याच्या २५ व्या दिवसाचा उल्लेख असून दुसरा शूर शहाजहान बादशहा, त्याचा नम्र सेवक अलावर्दी खान तुर्कमान, तसेच त्यांचे इतर चौदा किल्ले चार महिन्यात जिंकल्याचा उल्लेख दिसून येतो.

धोडप किल्ल्याच्या पायथ्याशी महाराष्ट्र सरकारने वनविभागाच्या मदतीने पर्यटन केंद्र विकसित केले आहे. किल्ल्याची माहिती देणारे दालन, निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ऍडव्हेंचर पार्क देखील या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यामुळे अजस्त्र पहूडलेला आणि धडकी भरविणारा धोडप किल्ला एकदा बघायलाच हवा!

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!