Friday, April 26, 2024
Homeनाशिकसिव्हिल मधून पळालेला संशयित रुग्ण असा आला पोलिसांच्या ताब्यात

सिव्हिल मधून पळालेला संशयित रुग्ण असा आला पोलिसांच्या ताब्यात

नाशिक : कोरोना संशयित म्हणून दाखल झालेल्या एकाने युवकाने जिल्हा रूग्णालयातून पळ काढल्याची घटना शनिवारी (दि.४) दुपारी घडली. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. तर जिल्हा प्रशासनासह सर्व यंत्रणा कामाला लागल्या होत्या. सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरिक्षक संदिप पवार व अनिल घुंभाडे यांनी सबंधीतांच्या नातेवाईकांच्या दुरध्वनीवर चौकशी करत दुचाकीवरूनच पाठलाग करत त्यास अवघ्या तीन तासात जेरबंद केले.

या पाठलागाबाबत देशदूतशी बोलताना पवार तसेच घुंभाडे यांनी सांगितले, जिल्हा रूग्णालयातील कोरोना संशयित म्हणून दाखल असलेल्या एका रूग्णाने पलायन केल्याची माहिती दुपारी सरकारवाडा पोलीस ठाण्यास मिळाली.

- Advertisement -

पोलीस उपायुक्त अमोल तांबे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक हेमंत सोमवंशी यांनी तत्काळ याचा शोध घेण्याचे आदेश दिले. तो औंरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथील असल्याने तो औरंगाबाद रोडनेच चालतच जाईल असा अंदाज बांधत आम्ही आमच्याकडे असलेल्या दुचाकीवरूनच औरंगाबाद रोडने त्याच्या शोध घेत घेत निघालो. तो पर्यंत वरिष्ठांकडून जिल्हा रूग्णालयात असलेल्या रूग्णाच्या फॉर्मवर त्याच्या घरचा संपर्क क्रमांक मिळाला. त्यावर कॉल केला असता रूग्णाची आई तसेच भावाशी बोलणे झाले.

रूग्ण असलेला युवक काही झाले तरी घरीच येईल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. तसेच तो वैजापूर येथे एका हॉटेलात काम करत होता अशी माहिती दिली. चालू दुचाकीवरूनच आम्ही तात्काळ हॉटेल मालकाशी संपर्क केला. त्याने सबंधीत युवकास मद्य सेवनाची सवय आहे. परंतु तो कुठेही न जाता घरीच येईल, तसेच त्याची बहिण निफाड तालुक्यातील विंचूर येथे असल्याची माहिती दिली.

हॉटेल मालकास सबंधीत युवक आल्यास तात्काळ पोलीसांना कळवण्याचे सांगण्यात आले. पुन्हा सबंधीत युवकाच्या घरी कॉल करून त्याच्या दाजीचा मोबाईल क्रमांक मिळवला. त्याच्या दाजीला कॉल करून तो पळाल्याची माहिती दिली. तसेच तो करोना संशयित असून यामध्ये कुटुंबियांचेच नुकसान असल्याचे पटवून देत. तो आपल्याकडे आल्यास आम्हाला कळवण्यास सांगितले.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस प्रशासानानेच शहर तसेच जिल्हा भरात ठिकठिकाणी रस्ते बंद केले असल्याने मोठे वाहन न घेता तसेच आम्ही औरंबाद रोडने बरेच पुढे आलो असल्याने पुन्हा माघारी जाऊन मोठे वाहन घेण्याऐवजी आम्ही दुचाकीनेच पुढील प्रवास करत राहिलो. तोपर्यंत वरिष्ठांनी इतर पथके तयार करून शहर तसेच इतर ठिकाणी त्याचा शोध सुरू केला होता. तसेच वैजापूर, निफाड, येवला येथील पोलीसांशी संपर्क करून त्यांना याबाबत सुचना देण्यात आली होती.

आम्ही विंचुर गावाजवळ असतानाच सबंधीत युवकाच्या दाजीचा आम्हाला कॉल आला. काही वेळापुर्वी कोणाच्या तरी मोबाईलवरून सबंधीत युवकाने दाजीला कॉल केला होता व तो एका दुचाकीवरून विंचूर येथे पोहचत असल्याचे त्याने सांगीतले होते. त्याच्या दाजीला तो आल्यास थांबवून ठेवण्यास सांगून आम्ही काही वेळातच विंचुर गावात पोहचलो.

नुकताच तो युवक तेथील एका पेट्रोल पंपाजवळ उतरला होता. एकिकडून त्याचा दाजी तर दुसर्‍या बाजूने आम्ही तेथे पोहचलो. सामाजिक अंतर ठेवतच त्यास पोलीसी खाक्यात दमबाजी करत तेथेच थांबण्याचा इशारा दिला.

तात्काळ वरिष्ठांना त्या युवकास पकडल्याची माहिती दिली. वरिष्ठांनी दुरध्वनीद्वारेच शब्बासकी दिली. जिल्हा शल्यचिकित्सकांना माहिती देताच त्यांनी निफाड येथून १०८ ऍम्बुलन्स काही वेळात त्या ठिकाणी पाठवली. त्यास ऍम्बुलन्समध्ये बसवून जिल्हा रूग्णालयाकडे रवाना करून आम्ही परतीचा मार्ग पकडला.

दरम्यान पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनीही दुरध्वनीवरून आमचे अभिंनदन केले. यामुळे त्या युवकास पकडण्यासाठी केलेला खटाटोप, धावपळ, पाठलाग यातून आलेला शिणही विसरून गेलो.

- Advertisment -

ताज्या बातम्या