उद्या दहा हजार नाशिककर गाणार ‘वंदे मातरम्’

उद्या दहा हजार नाशिककर गाणार ‘वंदे मातरम्’

नाशिक । नागरिकांमध्ये देशभावना रूजवावी तसेच राष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या क्रांतीकारकांचे स्मरण व्हावे यासाठी नववर्ष स्वागत समिती तर्फे शनिवारी (दि.25) वंद्य वंदे मातरम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात दहा हजार नाशिककर सहभागी होऊन नविन विक्रम प्रस्थापित करणार असल्याची माहिती नववर्ष स्वागत समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती आणि संयोजन समितीचे अध्यक्ष एस.आर.रूंग्ठा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला शनिवारी (दि. 25) संध्याकाळी पाच वाजता गंगापूर रोड येथील भोसला मिलिटरी महाविद्यालयाच्या प्रांगणात हा सोहळा रंगणार आहे. या उपक्रमात सहभागी होणार्‍या नाशिककर नागरिकांची संख्या दहा हजारापर्यंत पोहचली असुन समाजात राष्ट्रीय ऐक्य, सामाजिक ऐक्य, नवयुवकांमध्ये राष्ट्राभिमान जागृती, वंदे मातरम या राष्ट्रगीताची माहिती आणि वंदे मातरम या मंत्राचे स्मरण आणि मातृभुमीसाठी आत्मबलिदान करणार्‍या वीरांचे स्मरण करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमाअंतर्गत आज शुक्रवारी (दि. 24) सकाळी 11 वाजता क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो यांनी तयार केलेल्या स्वातंत्र्य लढयातील स्वातंत्र्य सैनिकांच्या जीवनावरील प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. याअंतर्गत ज्या क्रांतीकारकांना फासावर चढवले तसेच ज्या क्रांतीकारकांनी वंदे मातरम म्हणत अखेरचा श्वास घेतला अशा 32 क्रांतीकारकांच्या रांगोळी चित्राचे प्रदर्शन भरविण्यात आले.

या उपक्रमात सहभागी झालेल्या नाशिककरांना वंदे मातरमच्या सरावासाठी शहरात 550 प्रशिक्षण केंद्राची देखील व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्यक्ष शनिवारी या उपक्रमात सहभागी होणार्‍या नागरिकांना विशिष्ट रंगाची टोपी देऊन विशिष्ट ठिकाणी उभे करून भव्य राष्ट्रध्वज साकारला जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण
दहा हजार नागरिक एकाच वेळी एकत्र येऊन वंदे मातरम सादर करणार असून आयोजकांकडून या उपक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या उपक्रमासाठी ज्येष्ठ संगीतकार कौशल इनामदार, भगवद्गितेचे प्रवचनकार विनय पत्राळे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. केवळ वंदेमातरम गीत सादर न करता या उपक्रमाआधी शहरातील विविध गुरूकुलांचे गुरू आपल्या कलेचे सादरीकरण करणार आहेत. संगीत, भरतनाट्यम, कथक, देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नेहमी म्हटले जाणारे दोन कडव्यांचे वंदे मातरम न म्हणता पाचही कडव्यांचे यावेळी सादरीकरण केले जाणार आहे. एलईडी स्क्रिनवर या गीताचे शब्द देखील दाखविण्यात येणार आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com