Thursday, April 25, 2024
Homeनाशिकवाहतुक कोंडी : स्मार्ट होऊनही ‘सीबीएस ला कोंडीत

वाहतुक कोंडी : स्मार्ट होऊनही ‘सीबीएस ला कोंडीत

नाशिक । गेली दिड वर्षापासून सुरू असलेल्या स्मार्ट रोडचे एकदाचे काम पुर्ण झाले आहे. या स्मार्टरोडवरील सीबीएस हा सर्वात स्मार्ट चौक होऊनही सध्या यंत्रणा कार्यान्वीत न झाल्याने त्यास वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत आहे. अशात चारही कोपर्‍यावर असलेल्या रिक्षांचा गराडा तसेच एसटी बसेसचाही हातभार लागत असल्याचे चित्र आहे.

शहरातील सीबीएस हा सर्वात मध्यभागी व महत्वपुर्ण चौक आहे. या चौकाच्या खेटूनच मध्यवर्ती बस स्थानक, पुढे जिल्हा न्यायालय, बाजुला जिल्हाधिकारी कार्यालय, पश्चिमेला मेळा बसस्थानक, तालुका पोलीस ठाणे, मोजणी कार्यालय अशी शासकीय कार्यालये, पुर्व बाजुला शिवाजीरोड, शालिमार ही बाजारपेठ आहे. तर शहरात व शहरातून कोणत्याही दिशेला जाण्यासाठी या चौकातून मुख्य मार्ग आहे. यामुळे या चौकात सातत्याने जिल्हाभरातील नागरीकांची गर्दी असते.

- Advertisement -

गेली दिड ते दोन वर्षांपासून या परिसरात स्मार्टसीटी अंतर्गत स्मार्टरोडचे काम सुरू होते. तेव्हापासून आजपर्यंत या चौकात कायम वाहतुक कोंडींचा सामना करावा लागत आहे. काही दिवासांपुर्वी स्मार्टरोडचे काम पुर्ण झाले आहे. यामुळे सीबीएस चौकही चकाचक करण्यात आला आहे. परंतु या चौकातील सिग्नल यंत्रणा तसेच येथील सीसीटिव्ही कॅमेरे चाचणी होऊनही कार्यान्वीत झालेले नाहीत. तर पोलीस असले तरी कोणत्या बाजुची वाहतुक रोखावी व ती कशी कार्यान्वीत ठेवावी याबाबत त्यांचाच गोंधळ उडत असल्याने ते बाजुला उभे राहुन होईल ते पाहत असतात. याच्या परिणामी सर्व वाहन चालक प्रत्येकाला घाई असल्याप्रमाणे आडवे तिडवे वाहन घुसवत असतात. यामुळे या चौकात प्रामुख्याने सकाळी व सायंकाळी कायम वाहतुक कोंडी सदृष्य स्थिती पाहवयास मिळते.

सीबीएस चौकाच्या पुर्वेला शिवाजी रोडच्या कोपर्‍यातच रिक्षांचा थांबा आहे. येथे असलेली हॉटेल, चहाचे स्टॉल यामुळे येथे सतत ग्राहकांच्या वाहनांची गर्दी असते. अशात सीबीएस चौक ते डॉ. आंबेडकर पुतळ्यापर्यंत रिक्षाच्या रांगा लागतात. या रिक्षा पोलीसांना न जुमानता रस्त्यावर दोन तीनच्या ग्रुपने उभ्या असतात. यामुळे चौकातून येणार्‍या वाहनांना पुढे जाण्यास अडथळा झाल्याने सीबीएस चौकात वाहने आडकून पडतात.

सीबीएस बसस्थानकात बस जाण्यासाठी पुर्वेकडून तर बाहेर निघण्यास दक्षिणेकडून रस्ता आहे. परंतु दक्षिणेकडील रस्ता अतिशय अरूंद आहे. अशाच तेथे फळ विक्रेते व रिक्षा वाल्यांचे अतिक्रमण असल्याने बहूतांशवेळा बस अडकून पडलेल्या असतात. यामुळे राजीवगांधी भवन व नवीन सीबीएसकडून येणारी वाहने थोपल्याने या ठिकाणी सातत्याने वाहतुक कोंडी होते.

आंदोलनाचे केंद्रबिंदू
सीबीएस चौका हा जिल्ह्याच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू आहे. जिल्हाधिकारी कार्यालय या चौका जवळच असल्याने सर्व आंदोलक याच मार्गाने जातात. आदिवासी विकास विभागाचे बिर्‍हाड आंदोलन याच चौकात ठाण मांडते. तसेच शहरात कोणत्याही भागात आंदोलन झाले तरी सीबीएस चौक सर्वप्रथम गजबजून वाहतुक कोंडीत अडकतो.

वाहन चालकांना शिस्त हवी
सीबीएस चौक हा पुर्वीच्या तुलनेत आता खूप सुटसुटीत झाला आहे. पोलीस यंत्रणाही कार्यान्वीत आहे. परंतु वाहन चालकांना अजिबात शिस्त नसल्याने कोणीही नियम पाळत नाहीत. जो तो घाई असल्या प्रमाणे आडवे घुसतो. असे असेल तर पोलीस कुठपर्यंत आवरतील. वाहनांना शिस्त लागल्यास वाहतुक कोंडीचा प्रश्न लगेच सुटेल.
– हिरालाल कनोर, व्यावसायिक

रिक्षांवर नियंत्रणाची गरज
सीबीएस चौकाच्या प्रत्येक कोपर्‍यावर रिक्षांची गर्दी आहे. यामध्ये तीन सीट तसेच सहा सीट व पुढे बाहेरगावी जाणार्‍या काळ्या पिवळ्या वाहनांची गर्दी असते. सकाळी व सायंकाळी या सर्वांचा एकाचवेळी गोंधळ सुरू होतो. तीन सीट रिक्षा चालक पोलीसांना न जुमानता चौकात, रस्त्यावरच गाड्या उभ्या करतात. त्यांच्यावर नियंत्रण आणणे आवश्यक आहे.
– चैतन्य बोरा, व्यावसायिक

- Advertisment -

ताज्या बातम्या