नाशिक तालुक्याला 300 क्विंटल तूरडाळ प्राप्त

नाशिक तालुक्याला 300 क्विंटल तूरडाळ प्राप्त

नाशिक । घाऊक बाजारपेठेत तूरडाळीचे दर प्रतिकिलो शंभरी पार पोहचले आहे. रेशनद्वारे सर्वसामान्यांना स्वस्त दरात डाळ खरेदी करता यावी यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने शासनाकडे 720 क्विंटल तुरडाळीची मागणी केली होती. ही तूरडाळ चालू आठवड्यात जिल्ह्यला प्राप्त झाली आहे. त्यापैकी नाशिक तालुक्याला 300 क्विंटल तूरडाळ देण्यात आली आहे. रेशनवर तूरडाळ 55 रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली जात आहे. बाजारभावापेक्षा रेशनवर दर कमी असल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कडधान्याचे भाव गगनाला भिडले असून किराणा दुकानात उडीद 120 तर मूगडाळ 110 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. मागील एक महिन्यात डाळींच्या किंमतीत प्रतिकिलो दहा ते वीस रुपयांनी वाढ झाली आहे. अवकाळी पावसाने कडधान्याचे मोठे नूकसान झाले. त्यामुळे मागणीच्या तुलनेत डाळींचा पुरवठा घटला आहे. मराठवाडा व विदर्भात मोठ्या प्रमाणात कडधान्ये घेतली जातात. तसेच राजस्थान व मध्यप्रदेश या राज्यातून देखील डाळींचा पुरवठा होतो. मात्र, यंदा अवकाळी पावसाने राज्यात धुमाकूळ घातला. हाता तोंडाशी आलेले कडधान्याचे पिक आडवे झाले.

डिसेंबरमध्ये नवीन डाळींचे उत्पादन बाजारपेठेत येऊ शकले नाही. त्यामुळे बाजारपेठेत डाळींचा मोठया प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. मागणी वाढली असून पुरवठा घटला आहे. तूरडाळ, मूगडाळ, हरबरा डाळ, उडीद, मूग आदींच्या किंमतीनी प्रति किलो शंभरी पार केली आहे. डाळीच्या किंमती कमी न झाल्यास सर्वसामान्यांच्या ताटातून डाळ गायब होऊ शकते.

रेशनच्या ग्राहकांना वाजवी दरात तूर डाळ मिळावी यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने 700 क्विंटल तुरडाळीची मागणी नोंदवली होती. मागील नोव्हेंबर महिन्यात ही मागणी करण्यात आली होती. चालू आठवड्यात ही डाळ जिल्ह्याला प्राप्त झाली आहे. रेशनवर प्रति व्यक्ती रेशनकॉर्डधारकाला एक किलो डाळ 55 रुपये प्रतिकिलो दराने दिली जात आहे.

जिल्ह्याने मागणी केलेली तूरडाळ प्राप्त झाली आहे. तालुक्यांनी नोंदवलेल्या मागणीनूसार त्यांना डाळीचा साठा उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
– डॉ.अरविंद नरसीकर, जिल्हा पुरवठा अधिकारी

नाशिक तालुक्यासाठी 300 क्विंटल तूरडाळ देण्यात आली आहे. गुदामात हा साठा ठेवण्यात आला आहे. तूरडाळीचा दर्जा तपासावा लागेल.
– निवृत्ती कापसे, जिल्हाध्यक्ष रेशन दुकानदार संघटना

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com