राजस्थानचा सुनील नील कुमार ठरला मविप्र मॅरेथॉनचा विजेता

राजस्थानचा सुनील नील कुमार ठरला मविप्र मॅरेथॉनचा विजेता

नाशिक : मराठा विद्या प्रसारक संस्थेतर्फे आयोजित सातव्या राष्ट्रीय आणि १२ राज्यस्तरीय मविप्र मॅरेथॉन स्पर्धेत राजस्थानच्या सुनील नील कुमार याने विजेतेपद पटकावले. त्याने २ तास २८ मिनिटे आणि २५ सेकंदात ४२ किमीची मॅरेथॉन पूर्ण केली.

नाशिकच्या गुलाबी थंडीतही हजारो स्पर्धकांनी सहभाग नोंदवत उत्साही वातावरणात हि स्पर्धा झाली. गंगापूर रोडवरील मॅरेथॉन चौक येथून सकाळी ६ वाजता मॅरेथॉन स्पर्धेला सुरवात झाली. यात शाळकरी विद्यार्थ्यांसोबत राष्ट्रीय धावपटूंनी सहभाग नोंदवला. स्पर्धेच्या शुभारंभप्रसंगी ऑलम्पिकपटू अजित लाक्रा, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील मविप्र संस्थेच्या सरचिटणीस तसेच आयोजन समितीचे पदाधिकारीव संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान दरवर्षीप्रमाणे यंदाही मॅरेथॉन स्पर्धेत चुरस पाहावयास मिळाली. यंदाच्या ४२ किमी स्पर्धेत राजस्थानच्या सुनील नील कुणार याने प्रथम क्रमांक पटकावला तर दुसऱ्या क्रमांकावर नागपूरचा देवेंद्र रामसिंग चिखलोंढे, तिसऱ्या क्रमांकावर उत्तरप्रदेशातील अंकुर निल कुमार होता.

स्पर्धेचे मुख्य आकर्षण ऑलिम्पिक खेळाडू अजित लाक्रा म्हणाले कि, नाशिकचे वातावरण खूप छान असून याचा फायदा नाशिककरांनी घ्यायला हवा. या स्पर्धेत नाशिककरांचा उत्साह मोठा होता म्हणून खेळाडूंना मज्जा आली. या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या वयोवृद्ध स्पर्धकांचे तसेच विजेत्यांचे नंदन त्यांनी अभिनंदन केले. तसेच ते म्हणाले कि, खेळामध्ये हारजीत होतच असते, यात नाराज किंवा खचून जाऊ नका, परिश्रम घेत राहा यश तुमचेच आहे. आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आयुष्यात कोणतेही लक्ष्य ठेवले पाहिजे आणि ते मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

या स्पर्धेत तरुणाईचा सळसळता उत्साह, वयोवृद्ध, महिला मुलींचा सहभाग चांगला दिसून आला. खेळाडूंना प्रशिक्षण महत्वाचे असते आणि ते नाशकात खूप चांगले मिळते. तसेच तरुणांनी धावले पाहिजे जेणेकरून म्हातारपणी त्रास कमी होतो. तरुणांनी अनावश्यक तणाव घेऊ नये, त्यासाठी व्यायाम करावा . कारण व्यायामामुळे सकारात्मक दृष्टिकोन वाढतो
-विश्वास नांगरे पाटील, पोलीस आयुक्त नाशिक

स्पर्धेतील वैशिष्ट्य:

दोन हजार स्वयंसेवक, ४० बेडचे हॉस्पिटल.
गडचिरोली, औरंगाबाद, अहमदनगर येथील मुलीचा सहभाग
९९५ स्पर्धकांचा खुल्या गटात सहभाग
स्वागतासाठी पोलीस बँड
तीन ठिकाणी सेल्फी पॉईंट

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com