नामको हॉस्पिटलमध्ये स्वादूपिंडाच्या गाठीवर यशस्वी उपचार

नामको हॉस्पिटलमध्ये स्वादूपिंडाच्या गाठीवर यशस्वी उपचार

नाशिक । पोटदुखीमुळे हैराण झालेल्या एका रुग्णाच्या स्वादूपिंडाची गाठ नामको रुग्णालयात अवघ्या काही मिनिटांत काढण्यात आली. विशेष म्हणजे या शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध गॅस्ट्रेएण्टरोलॉजिस्ट (पोटविकार तज्ज्ञ) डॉ. गौरव बच्छाव यांनी कोणतीही चिरफाड न करता दुर्बिणीच्या सहाय्याने नवीन तंत्राचा अवलंब केल्याने रुग्ण चार दिवसांत ठणठणीत होऊन घरी परतला.

एरव्ही ज्या शस्त्रक्रियांना बराच वेळ लागतो, शस्त्रक्रियेसाठी चिरफाड करावी लागते, रुग्ण बरा होऊन डिस्चार्जलाही अनेक दिवस लागतात. त्यातील बहुतांश शस्त्रक्रिया अत्याधुनिक दुर्बिणींमुळे अगदी कमी वेळात होऊ लागल्या आहेत. अनेक रुग्णांना शस्त्रक्रियांची गरज भासत असल्याच्या पार्श्वभूमीवर नामको ट्रस्टचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी व सेक्रेटरी शशिकांत पारख यांच्या संकल्पनेनुसार रुग्णालयाचे आधुनिकीकरण सुरू आहे. त्या अंतर्गत रुग्णालयात अत्याधुनिक प्रकारच्या स्कोपीज् ( दुर्बिणी ) आणण्यात आल्या आहेत. याच दुर्बिणीद्वारे रुग्णाच्या स्वादूपिंडातून अर्धा लिटर पाणी काढण्यात आले.

पोट दुखत असल्याने संबंधित रुग्ण डॉ. बच्छाव यांच्या देखरेखीखाली रुग्णालयात दाखल झाला होता. स्वादूपिंडाला सूज येऊन मोठी गाठ झाल्याचे निदान झाल्यानंतर सर्जन डॉक्टरांशी चर्चेनंतर शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी डॉ. बच्छाव यांनी पारंपरिक पद्धतीने पोटाला छेद न देता तोंडावाटे दुर्बीण टाकून ही शस्त्रक्रिया केली.

त्यासाठी सिस्टोगॅस्ट्रोस्टॉमी शस्त्रक्रिया करण्यात आले. बाह्यभागावर कोणताही छेद अथवा व्रण नसल्याने रुग्णासाठी देखील ही शस्त्रक्रिया विशेष होती. शस्त्रक्रियेनंतर अवघ्या चार दिवसांत संबंधित रुग्ण ठणठणीत बरा होऊन घरी परतला. या सेवेबद्दल रुग्णाच्या कुटुंबियांनी पदाधिकारी, डॉक्टर व नामको रुग्णालया प्रती ऋण व्यक्त केले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com