नाशिक बंदची अफवा पसरवणाऱ्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक : नाशिक शहर रेडझोनमध्ये असल्याने कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार २२ मे पासून ३१ मेपर्यंत नाशिक शहर बंद राहणार असल्याची अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात अज्ञात संशयिताविरोधात अफवा पसरविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी तलाठी आनंद मेश्राम यांनी तक्रार दाखल केली असुन त्यांच्या फिर्यादीनुसार, अज्ञात संशयिताने लॉकडाऊनसंदर्भातील आदेशामध्ये फेरबदल करीत २२ मे पासून नाशिक शहर बंद राहील असा संदेश सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या संदेशामुळे नाशिककरांमध्ये चुकीचा संदेश गेला आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन घोषित आहे. विनापरवानगी ज्या आस्थापना सुरू झाल्या होत्या त्या बंद राहणार आहेत. याशिवाय शहरात सार्वजनिक प्रवासी वाहतूक होणार नाही. यात शहर बसेस व रिक्षांनाही परवानगी नाही. हे आदेश येत्या ३१ मेपर्यंत लागू असतील.

अत्यावश्‍यक व जीवनावश्‍यक सेवा नियमित सुरू राहणार आहेत. तसेच, यापूर्वीच्या आदेशानुसार वेळेचे बंधन कायम असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात म्हटलेले आहे. असे असताना अज्ञात संशयिताने नाशिक शहर पुर्णपनमे बंद राहणार असल्याचा अफवा पसरविणारा संदेश सोशल मीडियावर व्हायरल केला.

दरम्यान, नागरिकांनी संदेशाची सत्यता पडताळून पाहिल्यानंतरच तो फॉरवर्ड करावा. नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केले जातील असे आदेश जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *