Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

पुन्हा एकदा स्मार्ट खोळंबा; सीबीएस, मेहेर चौकांच्या कामासाठी एकेरी वाहतूक

Share

नाशिक । प्रतिनिधी

शहरातील स्मार्टरोडवरील सीबीएस व मेहेर सिग्नल चौकांचे सुशोभिकरण करण्यासाठी दोन्ही सिग्नल परिसरातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर स्मार्टरोडवर एकेरी वाहतूक करण्यात आल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका सिग्नलपर्यंत दुतर्फा होणार्‍या स्मार्ट रोडचे गेल्या दीड वर्षापासून काम सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहरात येण्याआधी घाईगडबडीत काम पूर्ण करून हा मार्ग सर्वांसाठी खुला करण्यात आला होता. मात्र मुख्यमंत्री फडणवीस माघारी फिरताच शनिवारपासून पुन्हा सीबीएस व मेहेर सिग्नल येथील वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे पूर्वसूचना नसल्याने वाहनचालकांची तारांबळ उडाली असून पर्यायी मार्गांवरही वाहतुकीचा खोळंबा होत आहे.

स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात स्मार्ट रोडचे काम सुरू आहे. वारंवार मुदतवाढ देऊनही रस्त्याचे काम पूर्ण होत नसल्याने शहरवासियांमध्ये नाराजी आहे. दहा दिवसांपूर्वीच सीबीएस व मेहेर सिग्नल येथील काम करावयाचे असल्याने या रस्त्यावरील वाहतूक बंद करून पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरू केली होती. मात्र महाजनादेश यात्रेच्या समारोपप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस शहरात आल्याने प्रशासनाने तातडीने स्मार्ट रोड वाहतुकीसाठी खुला केला. पूर्वकल्पना न देताच स्मार्ट रोड वाहतुकीसाठी खुला झाल्याने तो चर्चेचा विषय बनला होता.

त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक सुरू झाली होती. मात्र तीनच दिवसांत स्मार्ट रोडवरील वाहतूक पूर्वकल्पना न देता पुन्हा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावरून दैनंदिन ये-जा करणार्‍या वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला. शालिमारकडून सीबीएसच्या दिशेने येणारा मार्ग व सांगली बँक सिग्नलकडून मेहेर सिग्नलच्या दिशेने येणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.

तसेच स्मार्ट रोडवरील वाहतूकही बंद झाल्याने वाहनचालकांना पर्यायी मार्गांवरून जावे लागत आहे. पर्यायी मार्गांवर वाहतूक वळवल्याने तेथेही वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली आहे. त्यातच काही वाहनचालक रस्ता बंद असतानाही वाहने नेत असल्याने वाहतूककोंडीत भर पडत आहे.

सूचना मिळते जवळ गेल्यावर
मेहेर सिग्नल भागात महात्मा गांधी रोडकडील वाहतूक पूर्णत: बंद आहे, तर सीबीएस सिग्नलला शिवाजी रोडवरील वाहतूक पूर्ण बंद आहे. मात्र वाहतूक बंद असल्याचे प्रत्यक्ष अर्धा किलोमीटर अंतर कापून वाहन जवळ आल्यावर समजते. यामुळे तेथेच वाहन वळवावे लागते. गेल्या दोन दिवसांत अनेक एसटी बसेस अशाच वळवाव्या लागल्या. याऐवजी शालिमार व रेडक्रॉस सिग्नल भागातच याची माहिती मिळाल्यास वाहनचालकांचा गोंधळ उडून वाहतुकीचा बोजवारा उडणार नसल्याच्या सूचना नागरिकांनी केल्या आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!