नाशकात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला अनोखा सत्यशोधक विवाहसोहळा

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक : लग्नसमारंभात पायदळी तुडविल्या जाणाऱ्या अक्षता आणि अन्नाची नासाडी होत असल्यामुळे या गोष्टींना फाटा देऊन तांदळाऐवजी फुलांच्या अक्षतासह सत्यशोधक विवाह सोहळा पार पाडत समाजात नवा पायंडा पाडला असून अश्याच प्रकारचे विवाह सोहळे या पुढील काळात साजरा करण्याचे आवाहन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छागन भुजबळ यांनी केले आहे.

माळी समाज सेवा समितीचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष विजय राऊत यांचे चिरंजीव अभिजीत व सिन्नर तालुक्यातील नायगाव येथील रामदास भास्कर यांची कन्या गौरी यांचा हा अनोखा विवाह सोहळा नांदूर नाका येथील शेवंता लॉन्स येथे बुधवारी दि.(२९) रोजी संध्याकाळी पार पडला.

अक्षतांच्या जागी फुलांचा सडा अक्षतांच्या माध्यमातून पडला. त्यामुळे तांदळाची नासाडी टळली असून हा उपक्रम अनुकरणीय असून सर्वांनी याचा सर्वांनी विचार करावा.विवाह सोहळ्याच्या सुरवातील छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत विचारांचे स्मरण केले. सत्यशोधक विवाह सोहळ्याचे नियोजन योगेश कमोद यांनी तर सत्यशोधक विवाह विधिकर्ते  महात्मा फुले साहित्य साधने प्रकाशन समितीचे सदस्य रघुनाथ ढोक यांनी  महात्मा फुले यांचे वेशभुषेत तर सहकारी हनुमंत टिळेकर, प्रा.सुदाम धाडगे यांचे सोबत सत्यशोधक मंगलाष्टक म्हटले व वधू-वरांना शपथ दिली.

या अनोख्या विवाहसोहळ्यामुळे जिल्ह्यात सत्यशोधक चळवळीचा वारसा अजूनही जिवंत असल्याची प्रचिती येत होती. विवाहासाठी आलेल्या वऱ्हाडी मंडळींमध्येही या उपक्रमाचे कौतुक होताना पहायला मिळाले.

प्रत्येक लग्नात सरासरी तांदळाच्या अक्षता केल्या जातात. राज्यांत दरवर्षी सुमारे लाखो विवाह सोहळे पार पडतात. प्रत्येक समारंभाचा विचार केला तर, अक्षतांच्या माध्यमातून दरवर्षी राज्यांत लाखो टन तांदूळ पायदळी तुडवून वाया घालवितो. दुसरीकडे दुर्गम भागातील लहान मुले अन्नावाचून कुपोषित आहेत.त्यामुळे नासाडी होणारे अन्न गोरगरिबांच्या मुखी लागले पाहिजे.                                                            -छगन भुजबळ, अन्न व पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री नाशिक 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *