५३वा वार्षिक निरंकारी संत समागमास सुरवात; लाखो भाविकांचा सहभाग

५३वा वार्षिक निरंकारी संत समागमास सुरवात; लाखो भाविकांचा सहभाग

नाशिक : सत्य, प्रेम व एकात्मतेचा संदेश देणारा महाराष्ट्राचा ५३वा वार्षिक निरंकारी संत समागम सुप्रसिद्ध तीर्थस्थळ असलेल्या नाशिक नगरीमध्ये शुक्रवार, दि.२४ जानेवारी, २०२० रोजी संत निरंकारी मिशनच्या प्रमुख माता सुदीक्षाजी महाराज यांच्या सान्निध्यात सुरु झाला.

सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या उपस्थितीत हा ५३वा संत समागम प्रथमच मुंबईबाहेर नाशिकमध्ये आयोजित होत आहे. या संत समागमामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि जवळच्या गुजरात राज्यातून लाखोंच्या संख्येने निरंकारी भक्तगण उपस्थित आहेत.  याशिवाय देशाच्या विविध भागांतून आणि विदेशातूनही अनेक प्रतिनिधी सहभागी होत असून आजचा पहिला दिवस आहे.

दरम्यान आज सकाळी ११ वाजता समागमाचा प्रारंभ एका रंगीबेरंगी शोभायात्रेने झाला. शोभायात्रेचा मार्ग पेठ रोडवरील राहू हॉटेल येथून निघून समागम स्थळावर जाईल. त्यानंतर शोभायात्रा संपन्न झाल्यानंतर दुपारच्या सत्रात ‘मानवतेच्या नावे संदेश’ देऊन सद्गुरु माताजी समागमास विधिवत प्रारंभ केला. आज सायंकाळी ९ च्या सुमारास सत्संग कार्यक्रम असणार आहे.

उद्या दि. २५ जानेवारी रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत होणारी सेवादल रॅली असणार असून या रॅलीत सेवादलाचे हजारो महिला व पुरुष सदस्य आपापल्या गणवेषामध्ये या रॅलीमध्ये भाग घेतील. सेवादल रॅलीनंतर दुपारी २.०० वाजता सत्संग कार्यक्रम सुरु होईल आणि त्याचे समापन रात्री ९.०० नंतर होणाऱ्या सद्गरु माताजींच्या प्रवचनाने होणार आहे.

समागमस्थळावर व्यवस्था

समागमासाठी वीज, पाणी पुरवठा, जलनि:सारण व स्वच्छता, सुरळीत वाहतूक व्यवस्था आणि वैद्यकीय सहाय्य, अग्निशमन यांसारख्या अत्यावश्यक सेवांची व्यवस्था करण्यात आली आहे. समागमाला येणाऱ्या भाविकांच्या सोईसाठी नाशिक शहराच्या विविध ठिकाणांहून समागम स्थळावर येण्यासाठी तसेच कार्यक्रम समाप्तीनंतर परतीच्या प्रवासासाठी उचित वाहतूकीची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासनाच्या संबंधित विभागाकडून सुरक्षा व्यवस्थेबाबत योग्य ती काळजी घेतली जात आहे.

रेल्वे रिझर्वेशन काऊंटरची व्यवस्था समागम स्थळावर दिनांक २३ ते २६ जानेवारी या कालावधीत उपलब्ध असेल. समागमाला येणाऱ्या सर्व भाविक-भक्तगणांसाठी महाप्रसाद (लंगर) ची व्यवस्था समागम स्थळावर करण्यात आलेली आहे. सत्संगाच्या विशाल मंडपाव्यतिरिक्त, समागम कमिटी व अन्य कार्यालये व पाच प्रकाशन स्टॉल लावण्यात आले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com