समृद्धीच्या साईटवर चोरट्यांचा धुमाकूळ; १५ लाखाचे साहित्य चोरीला

अजित देसाई । नाशिक
मुंबई-नागपुर समृद्धी महामार्गाच्या कामाला नाशिक जिल्हयात पॅकेज १२ आणि १३ अंतर्गत ठेकेदाराकडून सुरुवात करण्यात आली आहे. या कामावर ठेकेदारांकडून कोट्यवधी रुपयांची साधन सामुग्री रस्त्यावर उतरवण्यात आली असून चोरट्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे किमती साहित्याचे संरक्षण कसे करायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. ठिकठिकाणी सुरु असणाऱ्या काँक्रीट बांधकामासाठी आवश्यक साहित्य उघड्यावर ठेवणे जिकरीचे बनले असून पॅकेज १२ अंतर्गत काम करणाऱ्या दिलीप बिल्डकॉन या कंपनीला गेल्या दोन महिन्यात १५ लाखांच्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.

सिन्नर मधील पाथरे ते सोनारी दरम्यान समृद्धी महामार्गासाठी ठिकठिकाणी पूल, बोगद्यांची उभारणी सुरु आहे. यासाठी ठेकेदार दिलीप बिल्डकॉन या कंपनीने प्रत्येक ठिकाणी आवश्यक बांधकाम साहित्य व मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे. बांधकामासाठी आवश्यक असणारे लोखंडी साहित्य आता चोरट्यांचे लक्ष्य बनले असून रात्रीच्या वेळी संबंधित साईटवरून या साहित्याची बिनदिक्कतपणे वाहतूक करण्यात येत आहे. या साठी कंपनीच्या ताफ्यात साहित्य वाहून नेण्यासाठी असणाऱ्या वाहनासारखीच अन्य वाहने वापरली जात असल्याने कंपनी प्रशासन देखील हतबल झाले आहे.

रात्रीच्या वेळीच नव्हे तर दिवसादेखील कामावरील साहित्य उचलण्याची हिम्मत चोरट्यांनी केली असून यासाठी दुचाकीसह टाटा सफारी सारख्या आलिशान वाहनांचा देखील वापर केला जात असल्याचे आढळून आले आहे. याबाबत पोलिसांना सूचित करण्यात येऊनही चोरट्यांचा मग लागत नाही अशी परिस्थिती आहे. कारण कंपनीकडे असणाऱ्या युटिलिटी वाहनांप्रमाणे वाहन वापरून चोरटे या साहित्याची उचलेगिरी करतात. तक्रारी आल्यावर वावी पोलिसांनी काही वाहने तपासली असता ती कंपनीच्या ताफ्यातील अधिकृत असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे साहित्य घेऊन धावणारी नेमकी कोणती वाहने तापसायची असा प्रश्न गस्त घालताना पोलिसांना देखील पडतो आहे.

दोन महिन्यात साहित्य चोरीला जाऊन १५ लाखांवर नुकसानीची झळ सोसावी लागल्याने ठेकेदार कंपनीचे व्यवस्थापन देखील भयभीत झाले आहे. कंपनीतील काही कर्मचाऱ्यांच्या माहितीवरून काही संशयित रडारवर आले आहेत. ते कोणत्यातरी माध्यमातून कंपनीशी संपर्कात येउन हा प्रकार करीत असल्याचे उघड झाले आहे. मात्र प्रत्येकवेळी योग्य पुरावा हातात येत नसल्याने या चोरट्यांचे फावले आहे. रात्री – अपरात्री एखाद्या साईटवरील पडलेले सेंटरींग कामाचे साहित्य उचलणाऱ्या या चोरांचा बंदोबस्त करायचा कसा असा प्रश्न कंपनी प्रशासन आणि पोलीस यंत्रणेसमोर आहे.

बांधकामासाठी आवश्यक असणारे लाखो रुपयांचे साहित्य साईटवर आहे. आमचे कामगार त्या ठिकाणी असतात. मात्र त्यांना धमकावत दुचाकीवरून येणारे अनोळखी तरुण दहशत निर्माण करतात. त्यानंतर येणाऱ्या वाहनातून हे साहित्य वाहून नेले जाते. कामगार परप्रांतीय असल्याने कोणाला विरोध करू शकत नाही. प्रत्येक ठिकाणी सुरक्षा रक्षक ठेवणे न परवडणारे नाही. संशयितांची नावे पोलिसांकडे दिली आहेत मात्र त्यांच्याविरुद्ध भक्कम पुरावा नसल्याने कारवाई शक्य होत नाही.
-सुनिल तोमर – दिलीप बिल्डकॉन

संशयित कंपनीशी संबंधित आहेत. मात्र कंपनीचे अधिकारी त्यांच्यबद्दल खात्रीने सांगत नाही. तक्रारीत थेट नाव दिले तर तपासाला गती देता येईल. स्थानिक असणाऱ्या या संशयितांची कोणत्या ना कोणत्या निमित्ताने कंपनीत येणे जाणे असते. त्यामुळे कामगार देखील त्यांच्याबद्दल माहिती सांगणार नसतील तर कारवाई कशी करणार ?
-रणजित गलांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *