Thursday, April 25, 2024
Homeनाशिकवाहतूक कोंडी’त गुदमरतोय ‘आरके’चा श्‍वास

वाहतूक कोंडी’त गुदमरतोय ‘आरके’चा श्‍वास

नाशिक । शहराची मुख्यबाजारपेठेचे प्रवेशद्वार मानले जात असलेला रविवार कारंजा हा चौका बाजारपेठेमुळेच कायम कोंडीत असल्याचे चित्र आहे. यासह यात दुकानदारांचे अतिक्रमण, रिक्षांचा वेढा, फळे,फुले, भाजीपाला विक्री करणारांची गर्दी याचा मोठा हातभार लागत आहे.

रविवार कारंजा हा शहरातील मुख्य चौकांमध्ये मोडतो. मेनरोड, गंगापूररोड, सीबीएस तसेच सीबीएसकडून अशोक स्तंभ मार्गे पंचवटीकडे अशा सर्व ठिकाणी जाण्यासाठी या चौकातूनच मार्ग आहे. यामुळे शहर बस, रिक्षा, व्यावसायिकांचे माल ट्रक, देवदर्शनासाठी येणार्‍या भाविकांची वाहने तर सर्व पंचवटीकर, नाशिककरांच्या दुचाकी असा सर्व भार या चौकावर आहे. प्रत्येक सणावाराचे साहित्य या चौकातच मिळत असल्याने अशावेळी चालण्यासही जागा नसते. या चौकाला चहुबाजंनी किरकोळ विके्रत्यांंचा पडलेला वेढा वाहतूक कोंडी होण्यास प्रमुख कारण ठरत आहे.

- Advertisement -

येथे सकाळी 9 पासून किरकोळ फळे, भाजीपाला घेऊन बसणारे, हातगाडीवाले हे चौकाच्या पूर्व व दक्षिण बाजुने बसतात. तर सायंकाळी पश्चिम कोपर्‍यात हातगाडीवर दूध, पाणीपुरी विक्रेत्यांचे गाडे लागतात. तर चारही कोपर्‍यांवर रिक्षाचालकांचा या चौकाला गराडा पडलेला आहे. त्यांच्या रिक्षा अस्ताव्यस्त रस्त्यावर मध्यभागापयर्र्त उभ्या असतात. अशोक स्तंभाकडून येणार्‍या रिक्षा प्रवासी बसवण्यासाठी रस्त्यात मध्यभागीच थांबत असल्यामुळे मार्ग अरूंद झाल्याने नेमके गर्दीच्या कालावधीत याठिकाणी वाहने आडकून पडत असल्याचे चित्र आहे.

एसटी बसला वळण घेण्यासही जागा मिळत नाही. दिवाळी,गुडीपाडवा, होळी, नवरात्र, दसरा, गणेशोत्सव यासह इतर सर्व सणांंमध्ये सनांसाठी आवश्यक साहित्य, फळे, फुले मिळण्याचे हे ठिकाण आहे. सणांचे साहित्य घेण्यासाठी नागरीकांची झुंबड उडते. अशोक स्तंभाकडून येणारा मार्ग, रेडक्रॉस सिग्नलकडे जाणारा मार्ग ऐकरी असला तरी पंचवटीकडे जाणारा मार्ग लहान व दुहेरी असल्याने तसेच त्यावरच रिक्षा तसेच व्यावसायिकांचे अतिक्रमण असल्याने रविवार कारंजा चौक ते अहिल्याबाई होळकर चौक या भागात सर्वाधिक कोंडी होत असल्याचे येथील व्यावसायिक सांगतात.

रेडक्रॉस सिग्नलकडे जाणारा मार्ग काही दिवसांपुर्वी दुहेरी करण्यात आला होता. मात्र स्मार्टरोडचे काम पूर्ण झाल्यानंतर तो पुन्हा एकेरी करण्यात आला असला तरी या मार्गावरून विरूद्ध दिशेने वाहने जात असल्याने रविवार कारंजा चौकाच्या वाहतूक कोंडीत यांची भर पडत आहे.

रिक्षांना शिस्त हवी
या चौकात चारही बाजूने उभ्या राहणार्‍या रिक्षांना शिस्त लावली तरी वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठा हातभार लागेल. दुचाकी तसेच इतर वाहने रस्त्यात कोठेही पार्क केली जातात यांची कोंडीत भर पडत आहे. यावर उपाययोजना व्हाव्यात. – संजय सानप, व्यावसायिक

पार्किंगचा मार्ग काढावा
या चौकाच्या चहुबाजूने शहराची मुख्य बाजारपेठ असल्याने हा सर्वात मुख्य चौक आहे. असे असले तरी या ठिकाणी खरेदी करणारे ग्राहक अगर काही कारणाने आलेले नागरिक आपले वाहन पार्क करण्यासाठी जागा नसल्याने रस्त्यावर पार्क करतात. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. मुळात पार्किंगचा प्रश्न सुटला की सर्व प्रश्न सुटतील.
– रमेश कोठारी, व्यावसायिक

- Advertisment -

ताज्या बातम्या