Saturday, April 27, 2024
Homeनाशिकयेस बँकेच्या खातेदारांना ‘नो मनी’; बँकेवर आरबीआयचे निर्बंध

येस बँकेच्या खातेदारांना ‘नो मनी’; बँकेवर आरबीआयचे निर्बंध

नाशिक । येस बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निर्बंध लादल्यावर बँकेच्या खातेदारांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. आयुष्याची जमापुंजी बँकेत ठेवलेल्या खातेदारांनी बातमी कळताच रात्रीच एटीएम सेंटर गाठून पैसे काढण्यास सुरूवात केली. दरम्यान, (दि. 6) सकाळी खातेदारांनी आपले पैसे काढण्यासाठी शहरातील येस बँकेच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये व एटीएम सेंटरमध्ये मोठी गर्दी केली होती. गर्दी वाढतच चालल्याने अखेर पोलिसांना हजर व्हावे लागले. दुपारनंतर अनेक ठिकाणच्या एटीएममध्ये खडखडाट झाल्याने अनेकांना रिकाम्या हातीच घरी परतावे लागले.

खासगी क्षेत्रातील नावाजलेल्या ‘येस बँके’वर गुरुवारी रिझर्व्ह बँकेकडून अचानक निर्बंध लागू करण्यात आले, तसेच संचालक मंडळही बरखास्त करण्यात आल्याने व निर्बंध घातल्यामुळे बँकेच्या खातेदारांना महिन्याभरात 50 हजार रुपयांपर्यंतच रक्कम काढता येणार आहे. त्यापेक्षा अधिक रक्कम काढण्यासाठी रिझर्व्ह बँकेची विशेष मंजुरी घ्यावी लागणार आहे. अपवादात्मक परिस्थितीत वैद्यकीय उपचार, विदेशी शिक्षण आणि लग्नासाठी हे पैसे काढता येतील.

- Advertisement -

या निर्णयामुळे पंजाब व महाराष्ट्र सहकारी बँकेपाठोपाठ आर्थिक संकटात असणार्‍या येस बँकेला घरघर लागल्याचे स्पष्ट झाले आहे. रिझर्व्ह बँकेकडून लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे खातेदारांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. या प्रकारानंतर खातेदारांनी पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये धाव घेतली आणि रांगा लावल्या. अचानक उपस्थित झालेल्या या संकटामुळे खातेदार ऊन्हाला न जुमानता रांगेत उभे असल्याचे दिसून आले. येस बँकेवरील निर्बंधांची बातमी वार्‍यासारखी पसरल्यावर बँकेच्या बहुतांश ठिकाणच्या एटीएमसेंटरमध्ये रोख रक्कम उपलब्ध नसल्याचे दिसून आले.

बँकेवर घालण्यात आलेल्या निर्बंधांची आम्हाला कुठलीही माहिती नाही. आम्हाला पैसे काढायचे आहेत, अशी मागणी खातेदारांकडून केली जात आहे. होळीचा सण जवळ येतोय. आम्ही अडचणीत आहोत, पण एटीएममध्ये पैसेच नाहीत, बँकेत पैसे आहेत, पण स्वत:चेच पैसे काढता येत नाहीत, अशी आमची अवस्था झाली आहे, काही खातेदारानी सांगून भावना व्यक्त केल्या.

आर्थिक संकटात असलेल्या येस बँकेने आर्थिकदृष्ट्या सक्षम पुनर्उभारणी घेण्याबाबतचा विश्वासार्ह आराखडा सादर केला नाही. त्यामुळे बँकेविरुद्ध कारवाई करावी लागली आहे. बँकेकरिता भांडवल उभारण्यासाठी सुरू असलेल्या बँक व्यवस्थापनाच्या चर्चेला गती न मिळाल्याने हे पाऊल उचलावे लागत असल्याचेही आरबीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

16 शाखांत गर्दी
शहरात येस बँकेच्या 10 शाखा असून जिल्ह्यात 6 अशा एकूण 16 शाख आहेत. या बँकांत खातेदारांनी पैसे काढण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. तसेच येस बँकेचे एटीएम सेंटर व अन्य एटीएममध्येही खातेदारांनी पैसे काढण्यासाठी रात्री पर्यंत रांगा लावल्याचे दिसून आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या