Saturday, April 27, 2024
Homeनाशिक‘दुर्गवीर’मुळे नाशकातल्या अनेक गडकिल्ल्यांना नवसंजीवनी

‘दुर्गवीर’मुळे नाशकातल्या अनेक गडकिल्ल्यांना नवसंजीवनी

नाशिक । दिनेश सोनवणे : बागलाण तालुका म्हटला की, मोठ्या ऐतिहासिक वारसाची आठवण झाल्याबिगर राहत नाही. 72 पेक्षा अधिक लहानमोठे गडकिल्ले असलेल्या नाशिक जिल्ह्यातील साल्हेर, मुल्हेर चौल्हेर ही डोंगररांग महत्त्वाची मानली जाते. वर्षानुवर्षे दुर्लक्षित असलेल्या, असुविधा तसेच घाणकचर्‍यामूळे विद्रुप झालेल्या या किल्ल्यांवर तालुक्यातील दुर्गवीर प्रतिष्ठानकडून संवर्धन केले जात आहे. गेल्या काही वर्षांपासून याठिकाणी वेगवेगळे उत्सव साजरी होत आहेत, त्यामूळे बागलाण तालुक्यातील या ऐतिहासिक ठेव्याला नवसंजीवनीच मिळालेली दिसून येत आहे.
दुर्गवीर प्रतिष्ठाणच्या माधयमातून गडांवरील पाण्याचे टाके, मुख्य दरवाजा, पायवाटा यांची साफसफाई केली जाते. गडावर प्रतिवर्षी आपले सण साजरे केले जातात. तसेच हे सण प्रत्येक गडाच्या घेर्‍यातील गावात साजरे करून स्थानिकांमध्ये गडांबद्दल आस्था निर्माण करण्याचा दुर्गवीरचा संकल्प आहे. तसेच दरवर्षी 5 जानेवारी रोजी साल्हेर विजय दिन साजरा केला जातो.

गडाच्या घेर्‍यातील गरीब मुलांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात येते यातून प्रत्येक बालकामध्ये शिक्षणाची आवड निर्माण करण्याचे कार्य दुर्गवीरकडून केले जाते आहे. 2014 ते 2019 नोव्हेंबरपर्यंत संस्थेमार्फत तालुक्यातील 38 शाळांना शालेय साहित्याची तसेच वॉटर फिल्टर व ई लर्निंग साहित्य भेट म्हणून मदत केली आहे.

- Advertisement -

गडांवरील पुरातन मंदिरांची डागडुजी, मुळस्वरूप कायम राखून बांधणी करण्यात येते आहे. गड-किल्ल्यांवर दुर्मिळ व औषधी वनस्पती तसेच वृक्षारोपणाचे काम केले जाते. आजवर याठिकाणी 600 पेक्षा अधिक झाडे जगवले आहेत. आदिवासी भागातील 28 पाड्यांना 800 सौर दिवे व गृहपयोगी वस्तु दिल्या आहेत.

दुर्गम भागातील विहिरींची साफसफाई करून भर उन्हाळयात पाणी आणून दाखविले आहे. दुर्गवीरचे कार्य खांदेशात सुरू झाले असून स्थानिक संस्थेच्या मदतीने इंदवे गरम पाणी कुंड साफ सफाई, भामेर, पानखेडा या गडांची नियमित संवर्धन मोहिमा सुरू झाल्या आहेत.
साल्हेर गडाच्या पायथ्याच्या केशर बागेत संवर्धन मोहिमेवेळी अनेक अवशेष सापडले. ज्यामुळे 1671 च्या युद्धातील स्मृतींना उजाळा मिळाला आहे. आज दुर्गवीर प्रतिष्ठानचे महाराष्ट्रात 11 गडांवर नियमित कार्य सुरू आहे. मानगड, सुरगड, भिवगड, रामगड, सामानगड, यशवंतगड, वल्लभगड, साल्हेर, मुल्हेर, सत्रासेन, विजयगड तसेच बेळगाव व चंद्रपूर मधील काही गडांवर सुद्धा कार्य सुरू आहे. विशेष म्हणजे, काम धंदा सांभाळून प्रतिष्ठाणच्या माध्यमातून शेकडो कार्यकर्ते सामील झाले आहेत.

हा बदल झाला…
संवर्धंनाच्या निमित्ताने समृद्ध वारसा जतन होत आहे. गावागावात ऐतिहासिक वास्तूंबद्दल जागृती होत आहे. यातून पर्यटन वाढले आहे. गावाखेड्यात रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध होऊन आदिवासी भागाचे जीवनमान यानिमित्ताने सुधारत आहे. येथील गावं समृद्ध बनली आहेत. बागलाणमध्ये आल्यावर याठिकाणी फेरफटका मारला तर विकास खेड्यापर्यंत पोहोचू लागला आहे याची अनुभूती मिळाल्याबिगर राहत नाही. ऑक्टोबर 2016 मध्ये साल्हेरवर कारवी फेस्टिवल करता 1100 लोकांनी हजेरी लावली होती.

ना नफा ना तोटा तत्त्वावर दुर्गदर्शन मोहिमा
नाशिक जिल्ह्यात दुर्ग दर्शन मोहीमा ना नफा ना तोटा या धर्तीवर आयोजित केल्या जातात. तसेच शाळेतील विद्यार्थ्यंना गड किल्ले समजावे म्हणून शाळेत मोफत गड किल्ल्यांचे फोटो प्रदर्शन आयोजित केले जाते. याअंतर्गत 19 शाळेत हा प्रयोग यशस्वी केला आहे.
-रोहित जाधव, दुर्गवीर प्रतिष्ठाण, बागलाण

- Advertisment -

ताज्या बातम्या