Saturday, April 27, 2024
Homeनाशिकविशेष मुलाखत : नागरिकांच्या रक्षणासाठीच पोलीस रस्त्यावर : पोलीस अधीक्षक डॉ. आरती...

विशेष मुलाखत : नागरिकांच्या रक्षणासाठीच पोलीस रस्त्यावर : पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह

नाशिक : खंडू जगताप | कोरोनाचे संकट ही राष्ट्रीय आपत्ती आहे. त्याचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाचे प्रयत्न सूरू आहेत. यामध्ये सर्वाधिक आघाडीवर आहेत ते पोलीस. रात्रंदिन आम्हा युद्धाचे प्रसंग या उक्तीप्रमाणे पोलीस अधिकारी, कर्मचारी आपले व आपल्या कुटुंबियांचे जीवन पणाला लावून रात्रंदिवस धावपळ करत आहेत. ते नागरीकांच्याच रक्षणासाठी रस्त्यावर उभे आहेत याचा विसर पडतो तेव्हा वाईट वाटते. परंतु तरिही आमच्या पोलीस दलाच्या आत्मविश्वासाच्या बळावर व सर्वाच्या सहकार्यातून आपण नक्कीच या सकंटावर मात करूच असा विश्वास जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी देशदूतशी बोलताना व्यक्त केला.

सध्याचे दैनंदिन कामाचे स्वरूप काय कसे आहे ?

- Advertisement -

सध्या जिल्हाभरातील घडामोंडींमुळे अवघी तीन तास झोप मिळते. तर सकाळही फोन कॉलनेच होते. यामुळे आता योगा प्राणायाम, व्यायाम यास वेळ मिळतच नाही. आता घरालाच कार्यालय केले आहे. यामुळे सकाळी लवकर उरकून फोन कॉन्फरन्स द्वारे अधिकार्‍यांची बैठक, आढावा, दिवसभराचे नियोजन, वरिष्ठांकडून मिळालेल्या आदेशांची अंमलबजावणी, प्रत्यक्ष कार्यक्षेत्रातील काही भागात भेट देऊन पाहणी, प्रामुख्याने चेकपोस्टला भेटी, अधिकारी, कर्मचार्‍यांना सुचना, जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा, बैठका रात्रीचे नियोजन, वॉकीटॉकीवरून आढावा, सुचना असे धावपळीची दैनंदिनी आहे हे रात्रीच काय दुसर्‍या दिवशी पहाटेपर्यंत सुरू असते.

येणार्‍या ताणावर कशी मात करता?

सकारात्मक विचार हेच ताण नाहीसे करण्याचे प्रमुख साधन आहे. यामुळे मुळात आहे त्या कामाचा ताण येऊ न देणे हे आपल्या हाती आहे. इतर दिवसांमध्ये आपण योग, प्राणायाम, व्यायाम करतो. परंतु सध्या हे शक्य नसल्याने जो काही थोडास वेळ मिळेल तो कुटुंबियांसमवेत, मुलीसंमवेत घालवून आनंद मिळवत ताण नाहीसा करण्याचा प्रयत्न करते.

चिंतेचे वातावरण असताना सकारात्मकता कशी मिळवता?

जिल्हा पोलीस प्रमुख म्हणुन कार्य करताना तसेच अशा संकटाच्या कालावधीत ही जबाबदारी अनेक पटींनी वाढते. शत्रु समोर असेल तर स्थिती आणि उपायोजना वेगळ्या असतात. पण विषाणु सारख्या छुप्या शत्रुशी लढणे सोपे नाही. प्रत्येक संकटाला तोंड देत राहिले की त्याची सवय पडून जाते. मग संकट संकट वाटत नाही. आपण आपले विचार शुद्ध ठेवले की, सर्व काही सुरळीत होते, सर्व सकारात्मक होईल असा विश्वास वाटतो.

तुमचे कुटुंबिय, तुमची परिस्थिती कशी हाताळता?

मला दोन लहान मुली आहेत. एक 10 वर्षाची आहे. तीला करोना विषाणु तसेच एकंदर काय चालले आहे हे समजते. तसेच मी जिल्हा पोलीस प्रमुख असल्याने मला असे दिवसरात्र काम करावे लागेल याची जाणीव तीला आहे. तर दुसरी मुलगी अवघी चार वर्षांची आहे. तीला या सगळ्यात समजावणे आणि समजून घेणे खूप कठिण होऊन बसते. कर्तव्यदक्ष अधिकारी कधी कधी मातृत्वापुढे हरताना दिसतो. परंतु कर्तव्य यावर मात करते. आपला जीवच असलेली मुलगी गळाभेटीसाठी आतूर असते आणि मनात असूनही तीला जवळ घेता येत नाही. याचे दुःख मातांनाच माहित आहे. तरिही आईच्या आधाराने दोन्ही मुलींना संभाळून त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करून सुरक्षित रीत्या हे सर्व संभाळण्याचा प्रयत्न असतो.

तुम्हाला कोणाचा आधार वाटतो?

माझ्या टिम जीव धोक्यात घालून काम करते आहे. आम्ही केलेले नियोजन, त्याची काटेकोर अंमलबजावणी यातून आपण या संकटावर मात करूच हा आत्मविश्वास माझ्या प्रत्येक अधिकारी, प्रत्येक कर्मचार्‍यामध्ये आहे. या आत्मविश्वासाचा सर्वात मोठा आधार कायम असतो.

जबाबदारीचे भान, बदलणारी परिस्थिती नियोजनाचा भार हे गणित कसे संभाळता?

या करोनाच्या संकटाचा सर्वाधिक ताण पोलीस यंत्रणेवर आहे. पुर्ण जिल्ह्याच्या सीमा आम्ही सील केल्या आहेत. मालेगाव सारख्या ठिकाणी नागरीकांना घरात बसवण्याचे आव्हाण आम्ही पार पाडतो आहोत. सर्व लोकांना घरात ठेवण्यासाठी आमचे प्रयत्न, आमचे अधिकारी, कर्मचारी दहा ते बारा तास काम करतात. त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते. मानवी दृष्टीकोनातून पोलीसींग करण्याचे सांगितले जाते. लोक प्रतिनिधी, नागरीकांच्या समजुतीच्या भूमीकेतून सर्व पार पडण्याचा प्रयत्न असतो.

सहकार्‍यांची, त्यांच्या कुटुृबियांची काळजी कशी हाताळता?
करोनाचा धोका सर्वाधिक काळ रस्त्यावर राहणार्‍या आमच्या पोलीस अधिकारी तसेच कर्मचार्‍यांना आहे. त्यांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना व्हिटामिन सी च्या गोळ्या, मास्क, सॅनिटायझर दिले जाते, कर्मचार्‍यांसाठी सॅनिटायझर व्हॅन तयार केल्या आहेत. तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठीही सुरक्षा साधने पुरवली आहेत. तसेच काय काळजी घ्यायची याचे वेळोवेळी मार्गदर्शन दिले जात आहे. प्रत्येक चेकपोस्टच्या कर्मचार्‍यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी केली जात आहे.

कामासाठीची उर्जा व उत्सहाचे रहस्य काय?
आपण एका दलाचे प्रमुख आहोत यामुळे प्रत्येक गोष्ट ही कृतीतून दाखवणे ही माझी पद्धत राहिली आहे. तसेच आपणावर ताण येणार नाही आणि तणाव आलाच तरी तो आपल्या सहकार्‍यांना दिसणार नाही याची काळजी आम्हाला घ्यावीच लागते. परंतु सहाकरी संकटाचा सामना करण्यासाठी जो विश्वास दाखवतात. आणि त्यासाठी पुढाकार घेतात यातूनच कामासाठीची खरी उर्जा मिळते. काम हीच आपली प्रेरणा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या