Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकशहरात ८५ चौकांवर पोलिसांची नजर; गुन्हेगारीला चाप बसणार

शहरात ८५ चौकांवर पोलिसांची नजर; गुन्हेगारीला चाप बसणार

नाशिक । शहरातील वाहतुक व्यवस्था सुरूळीत सुरू रहावी, अधिक गर्दी होणारे, पुरेशा उपायोजना नसलेले, व अपघाताची शक्यता असणार्‍या धोकादायक चौकांचे सर्वेक्षण करून 85 ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. या ठिकाणी नागरिकांना मदतीसाठी गर्दीच्या कालावधित पोलीस उपलब्ध करून धोके टाळण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. यातून गुन्हेगारीलाही चाप बसणार असल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी स्पष्ट केले.

समाजाभीमुख पोलिसींग राबवण्यासाठी यंत्रणा सरसावसली आहे. शहरातील वाहतुक व्यवस्था रोज नवे स्वरूप धारण करत आहे. अनेक ठिकाणी चौकांमध्ये फुटपाथ नसणे, झेब्रा क्रॉसींग चुकीच्या ठिकाणी असणे, हॉकर्स, रिक्षा थांबे अथवा बस स्टॉप भर रस्त्यात असणे अशी वाहतूक कोंडीची अनेक कारणे आहेत. चौकाचौकांमध्ये वाहतूक कोंडी गर्दी यामुळे विद्यार्थी, जेष्ठ नागरीक यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो तर अनेकदा अपघातात अनेकांना जीव गमवावा लागतो.

- Advertisement -

या सर्वातून मार्ग काढण्यासाठी पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी एनडीएमव्हीपी आर्किटेक्ट महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मदत घेतली. कॉलेजच्या प्राचार्या डॉ. प्राजक्ता बस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सर्वेक्षण केले. त्यांनी शहराचे पाच भागात वर्गिकरण केले. प्राथमिक माहितीनुसार सातत्याने कोंडी होणारे आणि वेगवेगळ्या समस्या असलेल्या 85 ठिकाणांची निवड करण्यात आली. यातील प्रत्येक ठिकाणावर सकाळी दोन तास, दुपारी आणि सांयकाळी प्रत्येक एक तास विद्यार्थ्यांनी अभ्यास केला.

त्यात वाहनांची गर्दी, हॉकर्स, सिग्नल्स व्यवस्था, पादचार्‍यांची स्थिती, झेब्रा क्रॉसींगची स्थिती अशा वेगवेगळ्या परिस्थितीचा अभ्यास केला. सॅटेलाईट छायाचित्र आणि प्रत्यक्ष चित्र यांचाही मेळ घालण्यात आला. नुकतेच याबाबत पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांना या अभ्यासाचा अहवाल सादर करण्यात आला.

पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी विद्यार्थ्यांनी काढलेले निष्कर्ष समजावून घेत तातडीने यावर उपायोजना सुरू केल्या आहेत. त्यानुसार या 85 चौकात वाहतूक शाखेचे अधिकारी व सर्व्हे केले ते विद्यार्थी प्रत्यक्ष भेट देत आहेत. प्रामुख्याने या प्रत्येक चौकात गर्दी होणाच्या सकाळी व सायकांळच्या वेळी त्या त्या पोलीस ठाण्यांचे पोलीस कर्मचारी तसेच वाहतुक कर्मचारी हजर राहून याबाबत नागरीकांना सुचना करणे, प्रत्यक्ष मदत करणे, गर्दी होऊ नये यासाठी वाहतुक नियंत्रण करणे असा उपक्रम हाती घेतला असून याचा चांगला परिणाम दिसून येत आहे. नागरीकही याचे कौतुक करत आहेत. परंतु येथील तृटी दुर करण्यासाठी महापालिकेची भूमीका महत्वाची असल्याचे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.

एनडीएमव्हीपी आर्किटेक्ट महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या सुचना प्रत्यक्ष अंमलात आणण्यात येत आहेत. प्रत्यक्ष उपाययोजना राबविण्याचे काम झाल्यास वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. यासह दररोज चौका चौकात पोलीसांची उपस्थिती दिसत असल्याने त्या भागातील गुन्हेगारांना आपोआप चाप बसणार आहे.
– विश्वास नांगरे पाटील, पोलीस आयुक्त

असे आहेत चौक
एकुण चौक – 85
परिमंडळ 1 – 39
परिमंडळ 2 – 19
वाहतुक विभाग – 27

- Advertisment -

ताज्या बातम्या