Thursday, April 25, 2024
Homeनाशिकजिपच्या आरोग्य विभागामार्फत लासलगाव परिसरात रुग्ण सर्वेक्षण

जिपच्या आरोग्य विभागामार्फत लासलगाव परिसरात रुग्ण सर्वेक्षण

नाशिक : कोरोना बाधित रुग्ण निफाड तालुक्यातील पिंपळगाव नजीक आढळून आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत रुग्णाच्या घरच्या व गावाच्या परिसरामध्ये रुग्ण सर्वेक्षण करण्यात येत आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या 50 टीम कार्यरत असून यामध्ये आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका यांचा समावेश आहे. यातील 28 टीम करुणा बाधित रुग्णाच्या घराच्या परिसरात कार्यरत आहेत.घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत आहेत.सतत दोन दिवस प्रत्येक घरी आरोग्य सेवक गृहभेटी करत असून सर्दी,ताप सारखी लक्षणे असणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे. तसेच परदेशी अथवा परदेशातून प्रवास करून आलेल्या नागरिकांची माहिती घेण्यात येत आहे.

- Advertisement -

अशी व्यक्ती आढळल्यास व त्याची नोंद नसल्यास त्याची नोंद घेऊन त्याचे हातावर होम क्वांरटाईन असा शिक्का मारण्यात येत आहे. काळजी घेण्याबाबत सूचना करण्यात येत असून आजारी पडल्यास स्वतःहून सदर टीमला कळवावे याबाबत माहिती देण्यात येत आहे. तसेच रुग्णाचा ज्या व्यक्तींची जवळचा संबंध आढळून आलेला आहे.

अशा व्यक्तींना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले आहे. संपूर्ण गावांमध्ये ग्रामपंचायतीमार्फत गावातील मुख्य आणि उपरस्ते छोट्या गल्ल्या, चौक, बस स्टॅन्ड, इत्यादी सार्वजनिक ठिकाणी हायपो क्लोराईड द्रावणाची फवारणी करण्यात येत असून लोकांना घराबाहेर पडू नये याबाबत सक्तीचे आवाहन करण्यात आले आहे.याबाबत गटविकास अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी,सेवक विशेष सहभाग नोंदवत आहेत.

साधारणपणे 22 टीमतर्फे मळे विभागातील रहिवाशांचे सर्वेक्षण करण्यात येत असून त्याचे नियमित अहवाल प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर व तालुका स्तरावर पाठविण्यात येत आहेत. यामध्ये श्वास घेण्यास अडचण येणारे रुग्णांबाबत विशेष चौकशी करण्यात येऊन त्यांना तातडीने वैद्यकीय अधिकारी यांचेमार्फत तपासणी करण्यात येऊन उपचार करण्यात येत आहेत. गंभीर रुग्ण आढळल्यास त्यांना जिल्हा रुग्णालयात संदर्भित करण्यात येत असून उपचार करण्यात येत आहेत.गावातील सर्व परिस्थिती नियंत्रणात असून शेजारील गावांची ही विशेष काळजी घेण्यात येत आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वाहनातून लोकांना सूचना माहिती देण्याचे काम करण्यात येत असून या सर्व कामावर तालुका आरोग्य अधिकारी तसेच जिल्हास्तरावरील करोना नियंत्रण कक्षामार्फत सनियंत्रण करण्यात येत आहे. संपूर्ण तालुक्यावर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दावल साळवे,जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ रवींद्र चौधरी,जिल्हा साथरोग अधिकारी डॉक्टर दिनेश पाटील,साथरोग शास्त्रज्ञ डॉ उदय बर्वे, संख्याकी अधिकारी घोलप,मनोहर आहेरराव ,जे टी चौधरी, सुरेश जाधव परिस्थितीवर लक्ष ठेवुन आहेत. तसेच गाव पातळीवरील विविध अधिकारी,सेवक यांच्यामार्फत नियमितपणे व वेळोवेळी माहिती घेण्यात येत आहे.

सर्वांनी घरातच राहावे,कोणत्याही परिस्थितीत घराच्या बाहेर पडू नये,आपल्या घरातील बालके व वृद्ध यांची चांगल्या प्रकारे काळजी घ्यावी ,चांगला आहार घ्यावा, व्यायाम करावा व आपल्या मानसिकतेकडे लक्ष द्यावे व प्रशासनात सहकार्य करावे,असे आवाहन विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक मंडळ नाशिक डॉ पट्टणशेट्टी, करोना नियंत्रण नोडल अधिकारी डॉ. सुरेश जगदाळे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या