Friday, April 26, 2024
Homeनाशिकमहाराष्ट्र सायबर विभागाकडून ‘ऑपरेशन ब्लॅकफेस’; शहरात तिघांविरुद्ध गुन्हे

महाराष्ट्र सायबर विभागाकडून ‘ऑपरेशन ब्लॅकफेस’; शहरात तिघांविरुद्ध गुन्हे

नाशिक । भारत पगारे
केंद्राच्या एनसीएमईसीमार्फत राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने (एनसीआरबी) चाईल्ड पोर्नोग्राफीविरुद्ध सक्त पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. विभागाने राज्य पोलीस दलातील ‘सायबर’च्या विशेष पोलीस महानिरीक्षकांना कळवून संबंधितांवर कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. शहर पोलिसांच्या सायबर सेलने आतापर्यंत तीन गुन्ह्यांत तीन जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

महाराष्ट्र सायबर विभागाने दोन महिन्यांपासून ‘ऑपरेशन ब्लॅकफेस’ मोहीम हाती घेतली आहे. मोहिमेअंतर्गत ध्वनिचित्रफिती तयार करणार्‍या किंवा प्रसार माध्यमांवर प्रसिद्ध करणार्‍यांचा छडा लावला जाणार आहे. या ध्वनिचित्रफिती प्रसिद्ध करणार्‍यांविरोधात राज्यभर गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. राज्यात मुंबईसह बीड, परभणी, नंदुरबार, चंद्रपूर, भंडारा अशा ठिकाणी 24 गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. अमेरिकेच्या ‘नॅशनल सेंटर ऑफ मिसिंग अ‍ॅण्ड एक्स्प्लॉयटेड चिल्ड्रेन’(एनमॅक) ही संस्था चाईल्ड पोर्नोग्राफी विरोधात कार्यरत आहे.

- Advertisement -

समाज माध्यमे, संकेतस्थळांवरील चाईल्ड पोर्नोग्राफीबाबत ही संस्था अमेरिकेच्या ‘फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’(एफबीआय) या सर्वोच्च तपास यंत्रणेला माहिती पुरवते. भारतातून अशा ध्वनिचित्रफिती किंवा मजकूर जाहीर करणार्‍या व्यक्तींची तांत्रिक माहिती पुरवण्याबाबत या संस्थेशी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने (एनसीआरबी) करार केला आहे. त्यानुसार या संस्थेने चाईल्ड पोर्नोग्राफी पसरवणारे आयपी अ‍ॅड्रेस आणि अन्य तांत्रिक माहिती पुरवली.

एनसीआरबीने महाराष्ट्रातील 1700 प्रकरणे महाराष्ट्र सायबरकडे सुपूर्द केली आहेत. सायबर महाराष्ट्रने तज्ज्ञांच्या मदतीने तपास करून या माहितीआधारे चाईल्ड पोर्नोग्राफीसंबंधित चित्रफिती, छायाचित्रे अपलोड करणार्‍यांची ओळख पटवली आहे. गेल्या आठवड्यापासून मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबईसह राज्यभर गुन्हे नोंदवण्यास सुरुवात झाली आहे.

‘ऑपरेशन ब्लॅकफेस’
गुन्हे नोंद झाल्यावर तपास करताना संबंधित संशयीताने समाज माध्यमांवर आयत्या प्राप्त झालेल्या चित्रफिती किंवा मजकूर जाहीर केला की प्रत्यक्ष निर्माण केला? या आरोपीचे अश्लील चित्रफिती तयार करणार्‍या टोळ्यांशी संधान आहे का? पैसे घेऊन त्याने ही निर्मिती केली आहे का? आदी बाबी स्पष्ट होऊ शकतील. गुन्हे नोंदवून किंवा आरोपींवर कारवाई करण्यासोबत प्रत्यक्ष लैंगिक अत्याचार घडलेल्या बालकांना शोधून त्यांचे पुनर्वसन करणे, हा ऑपरेशन ब्लॅकफेसचा मुख्य उद्देश आहे.

तिघांवर गुन्हे
शहर सायबर पोलिसांनी चाईल्ड पोर्नोग्राफीचे तिघांवर तीन गुन्हे दाखल केले आहेत. यात संशयित खुशाल भाऊसाहेब पाटील (रा. श्री श्रद्धा विहार, इंदिरानगर, नाशिक), आशुतोष रतनराव महात्मे (रा. लक्ष्मी बंगला, प्रोफेसर कॉलनी, मखमलाबादरोड, पंचवटी) व शंकर कमानसिंग सोनार (घर नं. 158, कांबळेवाडी, स्वारबाबानगर, सातपूर, नाशिक) यांचा समावेश आहे.

केंद्र शासनाच्या सूचनांनुसार कारवाई सुरू आहे. नाशिक सायबर सेलला 16 आयपी अ‍ॅड्रेस मिळाले आहेत. तपास यंत्रणा त्यांच्या मागावर असून सध्या तीन गुन्हे दाखल झाले आहेत.
-देवराज बोरसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस
ठाणे, नाशिक शहर

- Advertisment -

ताज्या बातम्या