देवळा तालुक्यातील रुग्ण संख्या दोनवर; नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण !

देवळा तालुक्यातील रुग्ण संख्या दोनवर; नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण !

देवळा : काही दिवसांपूर्वी मुंबई स्थित महिलेचा करोनाने मृत्यू झाला होता. त्या महिलेच्या संपर्कातील अकरा जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर देवळा तालुका वासीयांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र हा आनंद औटघटकेचाच ठरला.

अखेर देवळा तालुक्यात करोनाने मुंबई मार्गे शिरकाव केला असून तालुक्यातील दहिवड येथील एका संशयित रुग्णाचा शुक्रवारी (दि. २९) रात्री उशिरा प्राप्त झालेला करोना अहवाल सकारात्मक आल्या नंतर आज सदर रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ७० वर्षीय दुसऱ्या रुग्नाचा अहवाल सकारात्मक आल्याने ही संख्या आता दोन झाली आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत तालुका आरोग्य अधिकारी सुभाष मांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार दहिवड येथील शिंद ओहळ शिवारातील एक २८ वर्षीय तरुण मुंबई येथे कामानिमित्त राहत होता. तो दि.२० मे रोजी पहाटे दहिवड येथील घरी आला होता. परंतु दुसऱ्याच दिवशी त्याला ताप व जुलाबाचा त्रास जाणवू लागल्याने तो दहिवड येथील आरोग्य उपकेंद्रात उपचारासाठी दाखल झाला होता. संबंधित रुग्णाची लक्षणे संशयास्पद वाटल्याने त्याला चांदवड येथे पाठविण्यात आले होते.

त्याच्या घशातील द्रवाचे नमुने नाशिक येथे पाठवले होते. शुक्रवारी रात्री त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्या रुग्णाला देवळा येथील कोविड केअर सेंटर येथे पुढील उपचारासाठी दाखल केले आहे.

रुग्णाच्या संपर्कातील पाच हाय रिस्क लोकांना कॉरंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असता त्यातील एका ७० वर्षीय इसमाचा करोना अहवाल सकारात्मक आला.

त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता दोनवर गेली असून तालुक्यातील दहिवड गावामध्ये आरोग्य विभागाच्या वतीने घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. पुढील चौदा दिवसात संपूर्ण गावाचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार आहे. सदर रुग्ण वास्तव्यास असलेला परिसर सील करण्यात आला असून कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com