Thursday, April 25, 2024
Homeनाशिकगेल्या २४ दिवसांत एकही बस धावली नाही; तिजोरीत खडखडाट, एसटी कर्मचारी पगाराविना

गेल्या २४ दिवसांत एकही बस धावली नाही; तिजोरीत खडखडाट, एसटी कर्मचारी पगाराविना

नाशिक : कोरोना व्हायरसचा विपरित परिणाम एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर झाला आहे.

गेल्या २४ दिवसांपासून एकही बस न धावल्याने एसटी महामंडळाच्या तिजोरीत खडखडाट आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्यांचे वेतनच होऊ शकलेले नाही. ७ तारिखेनंतरही कर्मचारी वेतनाविनाच असल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

एकीकडे, एसटी प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे प्रवाशांची संख्या सातत्याने कमी होत आहे. अपघातांचे वाढते प्रमाण, पूर्वसूचना न देताच फेर्‍या रद्द करणे, तिकीट दरवाढ, आर्युमान संपलेल्या बसेस आदी कारणांमुळे प्रवाशांनी गेल्या काही वर्षांत एसटीकडे पाठ फिरवली आहे.

त्यामुळे महामंडळाच्या संचित तोट्यात सातत्याने वाढ होत आहे. उत्पन्नापेक्षा कर्मचार्‍यांचे वेतन आणि इंधनावरच जास्त खर्च होत असल्याने महामंडळाची आर्थिक स्थिती नाजूक बनली आहे. दुसरीकडे, अतिवृष्टीसह कोरोनासारख्या गंभीर आजारामुळे एसटी महामंडळाचे उत्पन्न खालावले आहे.

शहर व ग्रामीण बससेवा तसेच लांब पल्ल्याच्या बसेस न धावल्याने एसटीचे उत्पन्न घटले आहे. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या वेतनास विलंब करण्याची नामुष्की एसटी प्रशासनावर ओढवली आहे. हीच परिस्थिती नोव्हेंबर २०१९ च्या वेतनाच्या वेळीही निर्माण झाली होती. त्यावेळी अतिवृष्टीमुळे उत्पन्न घटल्याचे कारण एसटी महामंडळाकडून देण्यात आले होते.

यंदाही कर्मचार्‍यांची संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी मार्च महिन्याचे वेतन दोन टप्प्यात देण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार वर्ग चारच्या कर्मचार्‍यांना पूर्ण दिवसांचे वेतन, वर्ग एक ते तीनमधील टक्केवारीनुसार वेतन देण्याचे जाहीर करण्यात आले होते.

वर्ग एक व दोनच्या कर्मचार्‍यांना १६ दिवसांचे तर, वर्ग तीनच्या कर्मचार्‍यांचे २४ दिवसांचे वेतन पहिल्या टप्प्यात मिळणार होते. मात्र, ७ तारिख उलटल्यानंतरही वेतन न झाल्याने अधिकारी-कर्मचारी नाराज आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या