Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

जि. प. चा दहा टक्केच निधी खर्च; पालकमंत्र्यांनी केली बैठक रद्द

Share

नाशिक । प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शासनस्तरावरून निधी मिळूनही तो खर्च करण्यात जिल्हा परिषद कमी पडली. या मुद्यावरून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जि. प.च्या कामकाजाचे चांगलेच वाभाडे निघाले. केवळ दहा टक्केच निधी खर्च झाल्याचे समोर आल्यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जि. प.च्या कामाकाजावर नाराजी व्यक्त केली. भुजबळ यांच्या नाराजीचा फटका आढावा बैठकीला बसल्याची चर्चा रंगली आहे. प्रभारी सीईओ असल्याचे कारण पुढे करत पालकमंत्री भुजबळ यांनी झेडपीची सोमवारची आढावा बैठक रद्द केली. नवीन सीईओ आल्यानंतरच झेडपीचा आढावा घेतला जाईल, असे भुजबळांनी स्पष्ट केले.

जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचा विकास निधी खर्च झालेला नसल्याचे जिल्हा नियोजन बैठकीत समोर आले. केवळ 10 टक्के निधी खर्च झाला असल्याचे निदर्शनास आल्यावर पालकमंत्री भुजबळ संतप्त झाले. काही काम झाले आहे की नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यातच खा. डॉ. भारती पवार यांच्यापासून सदस्य नूतन आहेर, डी. के. जगताप, यशवंत ढिकले, रवींद्र भोये, सिमंतिनी कोकाटे, विनायक माळेकर, दीपक शिरसाठ, महेंद्र काले, रमेश बोरसे, कविता धाकराव या सदस्यांनी अधिकार्‍यांकडे कामासाठी गेले की उडवाउडवीचे उत्तर दिली जातात अशा तक्रारी केल्या.

निधी येऊनही प्रशासकीय मान्यता दिली जात नाही अशा तक्रारी करत अधिकारी कामेच करत नसल्याचे सदस्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. पाणीपुरवठा योजनेचा दोन वर्षांपासून पडून असलेल्या प्रस्तावांवर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम ठाकूर यांना विचारणा केली असता त्यांची धांदल उडाली.

रस्त्यांचे 63 कोटींचे प्रस्तावच जि. प. बांधकाम विभागाने सादर केले नसल्याची बाब समोर आल्यानंतर अन् 12 कोटींचा अखर्चित निधी शासन दरबारी जमा झाल्यानंतर बांधकामचे कार्यकारी अभियंता दादाजी गांगुर्डे यांना भुजबळ यांनी खडेबोल सुनावले. तुम्हाला काम करायचे नाही का? अडचण असल्यास दुसर्‍या जिल्ह्यात जा, असे सुनावत भुजबळ यांनी थेट त्यांच्यावरील कारवाईचा प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश यंत्रणेला दिले.

नवीन सीईओ आल्यानंतरच आढावा

पालकमंत्री भुजबळ यांनी जिल्हा परिषदेची आढावा बैठक सोमवारी आयोजित केली होती. मात्र जिल्हा नियोजन समितीतील बैठकीतील जिल्हा परिषदेची खराब कामगिरी पाहून भुजबळ यांनी सोमवारची बैठक रद्द केल्याची चर्चा आहे. प्रभारी सीईओ असल्याने त्या काय आढावा देणार, असा प्रश्न उपस्थित करत भुजबळ यांनी बैठक ऐनवेळी रद्द केल्याची चर्चा जि. प. वर्तुळात आहे. नवीन सीईओ रुजू झाल्यानंतर कामकाजाचा आढावा घेतला जाईल, असे सांगण्यात येत आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!