Friday, April 26, 2024
Homeनाशिककृषी महोत्सवची सांगता : शेतीला विषमुक्त करा : गुरुमाऊली

कृषी महोत्सवची सांगता : शेतीला विषमुक्त करा : गुरुमाऊली

सरपंच मांदियाळीत ग्रामउत्कर्षावर विचार मंथन

नाशिक । प्रतिनिधी

- Advertisement -

शेतीमध्ये रासायनिक खते आणि किटकनाशकांचा अतिरेकी वापर केल्याने आज अनेक जीवघेणे आजार वाढले आहेत. सेंद्रिय शेती करून शेतीला विषमुक्त करून मानवजातीला रोगमुक्त करूया, असे आवाहन गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी केले. यासाठी सरपंच, ग्रामसेवक महत्त्वाची भुमिका बजावू शकतात, असा विश्वासहीं त्यांनी व्यक्त केला.

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्यावतीने आयोजित जागतिक कृषी महोत्सवाची सोमवारी (दि.28) सरपंच मांदियाळीने सांगता झाली. याप्रसंगी गुरुमाऊली बोलत होते. पाच दिवसांपासून शेतकरी, सेवेकरी, विद्यार्थी, नागरिक, अभ्यासक, शास्रज्ञ यांचा भरघोस प्रतिसाद लाभलेल्या या महोत्सवातील शेवटच्या दिवशी ग्रामविकासावर साधक बाधक चर्चा झाली. समारोपाप्रसंगी अण्णासाहेब मोरे, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आयोजक आबासाहेब मोरे, चंद्रकांत मोरे, ‘यशदा’चे वैशिष्ठ जगताप, ग्रामसेवक संघटनेचे एकनाथ ढाकणे, सरपंच संघटनेचे पुरुषोत्तम घागरे, बाळासाहेब पावशे, अमेरिकरीतील योगा तज्ज्ञ क्रूकर स्टीव्ह आदी उपस्थित होते.

समारोपप्रसंगी प्रयोगशील, संशोधक विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. डी. वाय. पाटील कॉलेज, पुणे, अमृतवाहिनी कॉलेज, संगमनेर, मातोश्री कॉलेज, नाशिक, संदीप इस्टिटूट, नाशिकच्या विद्यार्थ्यांचा त्यांनी शेतीशी संबंधित केलेल्या संशोधनाबद्दल सन्मान झाला. बांबू शेती, कमी खर्चात उत्तम शेती, सात्विक शेती, पर्यावरण, दुर्ग संवर्धन अशा अनेक विषयांवर झालेल्या चर्चासत्रांना उस्फुर्त लाभला. पाच दिवसातील सर्व चर्चा सत्रांप्रसंगी मुख्य मंडप खचाखच भरलेला दिसत होता. अनेक समाजोपयोगी उपक्रमाचं आयोजन झाले.

स्वयंरोजगार मेळाव्यात जावळपास पाच हजार युवकांनी नावनोंदणी केली. नोकरी बरोबरच छोटे, मोठे उद्योग कसे करता येतील याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. विवाह नोंदणी विभागाच्या उपक्रमास सुद्धा भरघोस प्रतिसाद लाभला. शेती व शेतकर्‍यांच्या उत्कर्षांसाठी झटणार्‍यांसाठी दिला जाणारा कृषी माऊली पुरस्कार राजेंद्र भट, आदिनाथ चव्हाण, गोपाळ सुतारीया, अनिल भोकरे, विजय औताडे, महेंद्र महाजन, हेमंत बेडेकर, बाळासाहेब म्हस्के, सोनाली यादव, वासंती पाटील, मनीषा भांगे, सचिन राहणे, अर्चना कुटे यांना देण्यात आला.

महत्त्वाचे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील महापुराच्या आपत्ती वेळी पाचशे लोकांचे जीव वाचवणारे कलाप्पा गेरडे यांचा खास सत्कार करण्यात आला. पहिल्या दिवसापासून कृषी महोत्सवातील प्रदर्शन, बारा बलुतेदार गाव, भारतीय गोवंश गोठा, सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली. जवळपास पाच लाख लोकांनी या महोत्सवात हजेरी लावल्याने हा एक विक्रमच झाला असे आयोजकांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या