Friday, April 26, 2024
Homeनाशिकशाळांना सुटी, सत्र लांबणार

शाळांना सुटी, सत्र लांबणार

नाशिक । प्रतिनिधी

‘करोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी व खासगी शाळा, महाविद्यालये, आयटीआयच्या तासिकांना 31 मार्चपर्यंत सुटी जाहीर करण्यात आली आहे. तालुका पातळीवर शाळा बंद राहतील. मात्र, ग्रामीण भागातील शाळा सुरू राहणार आहेत. या निर्णयामुळे शाळा, महाविद्यालयांचे शैक्षणिक सत्र लांबणार आहे.

- Advertisement -

राज्यात ‘करोना’च्या रुग्णांची संख्या वाढली आहे. खबरदारी म्हणून राज्यसरकारकडून विविध पावले उचलली जात आहेत. सरकारने शनिवारी मोठा निर्णय घेत शाळा, महाविद्यालयांना सुट्या जाहीर केल्या. मात्र, दहावी, बारावी आणि महाविद्यालयांच्या परीक्षा त्याच वेळापत्रकानुसार सुरू राहाणार आहेत.

या निर्णयामुळे शाळा व्यवस्थापनांमध्ये सायंकाळपर्यंत काहीसा संभ्रम होता. प्रशासकीय अधिकारी, सेवकांंकडे त्याबाबत अनेकजण विचारपूस करत होते. शासन निर्णयाप्रमाणे तालुका पातळीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू राहणार आहेत, असे स्पष्ट करण्यात आले.

उपाययोजनांवर भर

शासनाच्या निर्णयानुसार तालुकास्तरापर्यंतच्या शाळा बंद राहणार तर, ग्रामीण भागातील शाळा सुरू राहणार आहेत. शहरातील अनेक शाळांमध्ये परीक्षांचे नियोजन करण्यात आले तर, काहींच्या परीक्षा अर्धवट झालेल्या आहेत. काहींनी उपाय म्हणून परीक्षांचे वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले आहे. यासह करोनाबाबत शाळांमध्येही खबरदारी उपाय म्हणून विद्यार्थ्यांना मास्क लावण्यासह विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या