तो रुग्ण ठरला असता सायलेंट किलर; ग्रामस्थांचे प्रसंगावधान आणि पोलीस यंत्रणेचा तत्परतेमुळे वेळीच निदान

सिन्नर | वार्ताहर

तालुक्यातील पाथरे (वारेगाव) येथे आढळून आलेल्या 65 वर्षीय करोना बाधित व्यक्तीस वेळीच तपासणीसाठी दाखल केले नसते तर परिसरातील गावांसाठी तो सायलेंट किलर ठरला असता.

या रुग्णाच्या मालेगाव प्रवासाबद्दल ग्रामस्थांनी दाखवलेली समयसूचकता आणि पोलिसांची तत्परता यामुळे मोठा बाका प्रसंग टळला आहे. कारण सदर व्यक्तीमध्ये करोना ची कोणतीच पूर्व लक्षणे आढळून आली नसल्याचा दावा आरोग्य यंत्रणेने केला आहे. सर्वसाधारणपणे करोना बाधित व्यक्तीला खोकला, सर्दी, तापाचा प्रादुर्भाव होत असल्याचे सांगितले जाते.

मात्र पाथरे येथील सदर व्यक्तीला त्याबाबतची कोणतीही पूर्व लक्षणे आढळून न आल्याने तो करोना रुग्णांच्या सायलेंट किलर या सांकेतिक सूचित समाविष्ठ आहे. सदर रुग्णासह त्याच्या कुटुंबातील अन्य दोघांनी दोन वेळेस मालेगाव वारी केली. या दोन्ही वेळेस ते तिथे नातेवाईकांकडे मुक्कामी राहिले होते. या नातेवाईकांचे कनेक्शन मालेगावातील करोना बाधित रुग्णांशी असल्याचे बोलले जात आहे.

त्यामुळेच गावी परतल्यावर या व्यक्तीने आपले चालणे फिरणे नियमित ठेवले असते आणि ग्रामस्थांनी देखील त्याकडे दुर्लक्ष केले असते तर नाशिक – नगर जिल्ह्याच्या सीमेवरील दहा-बारा गावांना करोना चा जीवघेणा विळखा पडला असता. ग्रामस्थांच्या सांगण्यावरून वावी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेवकांनी सदर कुटुंबियांना तपासणी करून घेण्याची विनंती केली असता त्यांनी ती धुडकावून लावली होती. त्यामुळे वावी पोलिसांची मदत घेण्यात आली.

संबंधित रुग्ण व त्याचे नातेवाईक आम्ही मालेगाव येथे गेलोच नसल्याचे ठणकावून सांगत असले तरी संशयाची पाल चुकचुकल्याने पोलिसांनी त्यातील एकाचे मोबाईल लोकेशन ट्रॅक केले होते. त्या नोंदीनुसार हे सर्वजण गेल्या आठवड्यात दोन वेळेस मालेगावला जाऊन आल्याचे उघड झाले होते.

करोना साथ रोगाच्या काळात स्वतःच्या आरोग्या प्रती निष्काळजीपणा दाखवत व संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करत नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मालेगाव वारी करणाऱ्या तिघांच्या विरोधात ग्रामविकास अधिकाऱ्याने पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिस यंत्रणेने हस्तक्षेप करत त्या कुटुंबातील सहा जणांना नाशिक येथे वैद्यकीय तपासणीसाठी हलवले होते. तेथेच दोन दिवसानंतर तपासणी अहवाल आल्यानंतर एकास करोना ची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.