Tuesday, April 23, 2024
Homeनाशिककोरोनाची भीती : जिल्हा मजूर संस्थाना कामगार मिळेनात!

कोरोनाची भीती : जिल्हा मजूर संस्थाना कामगार मिळेनात!

नाशिक । प्रतिनिधी

‘कोरोना’च्या भितीमुळे जिल्हा मजूर संस्थाना कामगार मिळत नाही अशी परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. त्यामुळे असंख्य कामे प्रलंबित राहिलेली आहेत. त्यातच मार्च अखेर जवळ आला असताना निर्धारीत वेळेत कामे पूर्ण होतील की नाही याबाबत साशंकता आहे. यामुळे नाशिक जिल्हा मजूर संस्थेने मार्चखेरची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्याकडे केली आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. सयाजी गायकवाड, मजूर संस्थेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत आव्हाड, अजित सकाळे यांनी सीईओ बनसोड यांना याबाबतचे निवेदन दिले आहे.

- Advertisement -

जिल्हा मजूर संस्थांचा सहकारी संघातर्फे जिल्ह्यात कोट्यवधींची कामे केली जातात. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मजूर संस्थांची कामे सुरु असून, मार्च अखेर त्यांना कामे पूर्ण करण्याची सक्ती केली जाते. त्याशिवाय अंतिम देयके मिळत नाहीत. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर मजूर संस्थांना मजूरच मिळत नसल्याचे चित्र सद्या जिल्ह्यात दिसून येत आहे. परिणामी अनेक कामे रखडली आहेत. अंतिम स्तरावर आलेली कामे आता मजूरांअभावी प्रलंबित आहेत.

अशा परिस्थितीत मार्च अखेर संपल्यास अंतिम देयके मिळणार की नाही, याविषयी ठेकेदारांच्या मनात साशंकता आहे. त्यामुळे या परिस्थितीत मार्च अखेरचा कालावधी वाढवून द्यावा. अखर्चित निधी तत्काळ शासनाकडे न पाठवता, मुदत वाढवून देण्याची विनंती शासनाकडे करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, सद्यस्थितीला मार्च अखेरच्या स्वरुपात कामे केली जातील. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर वाढीव मुदतीची मागणी राज्य शासनाकडे केली जाईल, असे आश्वासन बनसोड यांनी यावेळी दिले.

जिल्हा मजूर संघाने केलेली मागणी परिस्थिती सदृश्य असल्यामुळे त्याविषयी प्रशासनाने गांभीर्याने विचार करायला हवा. मजूर मिळत नसल्याने कामे प्रलंबित राहिली आहेत. त्यामुळे मार्चअखेरच्या मुदतीत वाढ केली पाहिजे.

  • बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष (जिल्हा परिषद)
- Advertisment -

ताज्या बातम्या