Friday, April 26, 2024
Homeनाशिकवितरक व उत्पादकांनी चांगल्या दर्जाचे सॅनिटायझरची विक्री करावी : डॉ. राजेंद्र शिंगणे

वितरक व उत्पादकांनी चांगल्या दर्जाचे सॅनिटायझरची विक्री करावी : डॉ. राजेंद्र शिंगणे

नाशिक | प्रतिनिधी

कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी नागरिकांमध्ये मास्क व सॅनिटायझरची मागणी वाढत असून जादा दरात त्यांची विक्री केल्याच्या तक्रारी अन्न व औषधे प्रशासन विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. तरी वितरक व उत्पादकांनी चांगल्या दर्जाचे व ठरवून दिलेल्या किंमतीत सॅनिटायझरची विक्री करावी अशी सूचना, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केली.

- Advertisement -

शासकीय विश्रामगृह येथे आयोजित जिल्ह्यातील मास्क व सॅनिटायझरच्या मुख्य वितरक व उत्पादनकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सहआयुक्त (औषधे) डी. एम. भामरे, (अन्न) सी. डी. सांळुखे, सहाय्यक आयुक्त (अन्न) सी.डी. राठोड, औषध निरीक्षक एस. एस. देशमुख, सी. ए. मोरे, जे. डी. जाधव, केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष गोरख चौधरी उपस्थित होते.

शिंगणे म्हणाले, कोरोनाच्या धर्तीवर मास्क व सॅनिटायझरची मागणी वाढत असून पुरवठा कमी होत असल्याने जास्त दरात विक्री केली जात असल्याचे निर्देशनास आले आहे. त्यानुसार वितरक व उत्पाकदांनी ठरवून दिलेल्या किंमतीतच त्याची विक्री करावी अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले. वितरक व उत्पादकांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यात उपलब्ध साठा व नागरिकांच्या असणाऱ्या मागणीचा त्यांनी यावेळी आढावा घेतला.

जिल्ह्यात जवळजवळ 25 ते 30 % वाढीव मागणी असल्याचे निदर्शनास आले आहे. नागरिकांना लवकरात लवकर सॅनिटायझरचा पुरवठा होण्यासाठी उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी स्थानिक पातळीवर सॅनिटायझरची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करावे. त्यासाठी लागणाऱ्या परवानग्या, कच्चा मालाचा पुरवठा करण्यास शासन संपुर्ण मदत करण्यास सकारात्मक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. गुटखाकिंग यांचे मार्फत मास्क व सॅनिटायझरची अवैध पध्दतीने विक्री केली जात असल्याचे केमिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभागाने खबरदारी घेवून कारवाई करावी असे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मोठ्या प्रमाणात सॅनिटायझरचे उत्पादन वाढवावे जेणेकरुन नागरिकांना त्याचा तुटवडा भासून नये अशी सूचना त्यांनी वितरक व उत्पादकांनी केली. तसेच वितरक व उत्पादकांच्या सॅनिटायझर उत्पादनाला कॉस्मेटिकच्या माध्यमातुन परवानगी मिळावी ह्या मागणीला मंत्रिमंडळ स्तरावर निर्णय घेण्यात येईल तसेच सॅनिटायझरच्या उत्पादन वाढीसाठी देण्यात येणाऱ्या परवानग्यांना करोनाच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी फाटा देवून तातडीने परवानग्या देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

अल्कोहोल विरहीत सॅनिटायझर निर्मितीसाठी ज्या कंपन्यांनी तयारी दाखविली असून परंतु अल्कोहोल विरहीत सॅनिटायझर किती परिणामकारक आहे याची खात्री करुनच परवानगी दिले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सॅनिटायझच्या निर्मितीसाठी लागणारे अल्कोहलचा पुरवठा तातडीने करण्यात येणार आहे.

कोरोना आजारवर अजूनही औषध सापडले नाही तरीही सोशल मिडीयावर पसरणाऱ्या कोणत्याही भूल थापाना नागरिकांनी बळी पडू नये. कोरोना आजाराच्या बचावासाठी जनजागृती करणे आवश्यक असून प्रत्येकाने आपल्या स्तरावर नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश पोहचविण्यासाठी हातभार लावावा. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे तसेच मास्क ऐवजी रुमालाचा वापर करावा, सॅनिटायझरने आपले हात स्वच्छ धुवावे अशा सूचना त्यांनी यावेळी केल्यात. तसेच बैठकीस वितरक व उत्पादक यांचे शंकाचे निरसन केले. बैठकीस सर्वश्री मिलिंद कटारिया, रमेश कांकरिया, अमित बच्छाव, रिजवान शेख, सुरेश पाटील राजेंद्र धामणे आदी मास्क व सॅनिटायझर वितरक व उत्पादक उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या