Wednesday, April 24, 2024
Homeनाशिककष्टकर्‍यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द : पालकमंत्री

कष्टकर्‍यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द : पालकमंत्री

पदक विजेत्या पोलिसांचा गौरव; शिस्तबद्ध संचलनाने फेडली डोळ्यांची पारणे

नाशिक । प्रतिनिधी

- Advertisement -

शेतकरी व कष्टकर्‍यांचे प्रश्न सोडविण्यासाठी हे शासन कटिबध्द आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

भारतीय प्रजासत्ताकाच्या 70व्या वर्धापन दिनानिमित्त शहरातील पोलीस कवायत मैदान येथे आयोजित राष्ट्रध्वज वंदन आणि संचलन समारंभात पालकमंत्री यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरिक्षक छेरिंग दोरजे, पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. आरती सिंह, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या संचालक अश्वती दोरजे, सहायक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरीक उपस्थित होते.

कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र शेतकर्‍यांचे आधार लिंकिंग करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कमी वेळेत कार्यवाही पूर्ण केली असून जिल्ह्यातील एक लाख 36 हजार शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत, असे भुजबळ यांनी सांगितले. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी विभागीय स्तरावर ‘मुख्यमंत्री सचिवालय कक्ष’ कार्यान्वित करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांच्या समस्यांचे निराकरण विभाग पातळीवर कमी वेळात होणार आहे, असे त्यांनी सांंगितले. कार्यक्रमात पालकमंत्र्यांच्या हस्ते पोलिस विभागाच्या मॅरेथॉन वेबसाईटचे अनावरण करण्यात आले.

यावेळी परेड कमांडर सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या शानदार पोलीस संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. संचलनात शहर पोलीस आयुक्तालय, जिल्हा पोलीस अधीक्षक, ग्रांमिण, होमगार्ड, शहर वाहतूक शाखा, वनविभाग, अग्नीशामक दल, भोसला मिल्ट्री स्कुलचे आर्मी, नेव्हल विंग व एअर विंग तसेच अश्वदल, राज्य उत्पादन शुल्क, पर्यटन वाहन, वरुण वाहन, वज्र वाहन, पोलीस बँड, श्वान पथक, जलदप्रतिसाद पथक, महिला व बाल विकास विभाग आदी पथकांनी सहभाग घेतला.

विविध पुरस्काराचे वितरण

छगन भुजबळ यांच्या हस्ते गुणवंत क्रीडा संघटक मिनाक्षी गवळी व आदिती सोनवणे, सुलतान देशमुख, सागर बोडके, मिताली गायकवाड यांना गुणवंत खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. शहर पोलिस आयुक्तालयाच्यावतीने गुणवत्ता पूर्ण सेवेसाठी पोलीस पदक देऊन सहाय्यक उपनिरीक्षक मेहबुब अली सैय्यद, हवालदार संजय वायचळे व गडचिरोली येथे विशेष सेवा दिल्याने विशेष सेवा पदक सुकदेव सुतार यांना देऊन गौरविण्यात आले. राष्ट्रपती पदक पुरस्कार विजेते उपअधिक्षक समिरसिंह साळवे, सहा. उपनिरीक्षक विष्णू गोसावी व पोलीस निरीक्षक स्वप्नील कोळी यांना सन्मानित करण्यात आले. प्रशिक्षण संस्थेत उत्कृष्ट सेवा बजाविल्याने पोलीस प्रशिक्षक पदक व प्रशस्तीपत्रक देऊन पोलिस नाईक सुनिल कनोजिया व पोलीस हवालदार देविदास वाघ यांना सन्मानित करण्यात आले.

सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

ध्वजारोहणानंतर देशाच्या संस्कृती आणि राष्ट्रभक्तीचे दर्शन घडविणार्‍या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यात सेंट लॉरेन्स हायस्कुल अ‍ॅण्ड ज्युनि. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समुहनृत्य व समुहगीत सादर केले. आदर्श माध्यमिक विद्यालयाने देशभक्तीपर समुहनृत्य सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.

- Advertisment -

ताज्या बातम्या