Friday, April 26, 2024
Homeनाशिकचिंचखेड : शिवजयंतीनिमित्त चिंचखेड फेस्टिवलमध्ये रंगला नृत्यांचा अविष्कार

चिंचखेड : शिवजयंतीनिमित्त चिंचखेड फेस्टिवलमध्ये रंगला नृत्यांचा अविष्कार

चिंचखेड | वार्ताहर

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ. स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ. स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.

- Advertisement -

दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे शिवजयंती अनोख्या प्रकारे साजरी करण्यात आली. डीजे सारख्या साधनांना मागे सरसावून समस्त चिंचखेड ग्रामस्थ आणि चिंचखेड गाव आणि परिसरातील सर्व शालेय समित्यांनी एकत्र येत यावर्षी शिवाजी महाराजांच्या जयंतीला आकर्षक रूप देऊन महाराजांची जयंती साजरी करण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

सकाळी आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांची संपूर्ण चिंचखेड गावातून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्यावर शिवाजी महाराजांची आरती सादर केली. चिंचखेड ग्रामस्थ आणि सर्व शालेय समित्यांनी एकत्र येत यावर्षी शिवजयंती निमित्त शालेय विद्यार्थ्यांना चिंचखेड फेस्टिवल साठी हक्काचे स्टेज उपलब्ध करून देण्यात आले. याच स्टेजवर शिवाजी महाराजांच्या गीतांवर शालेय विद्यार्थ्यांचा नृत्याचा अविष्कार बघायला मिळाला.

चिंचखेड फेस्टिवलमध्ये चिमुकल्यांपासून ते दहावीच्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वच विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांवर आधारित गीतावर नृत्य करत कार्यक्रमास रंगत आणली. शिवजयंतीनिमित्त चिंचखेडला संपूर्ण भगवेमय वातावरण तयार झाले होते. या कार्यक्रमास हजारो महिला आणि पुरुषांनी उपस्थिती दर्शवली.

सध्या भारतामध्ये डीजे प्रथा आली आहे कुठलाही सण असो डीजे लावणे व त्यामध्ये वेगवेगळ्या गाण्यावर बेधुंद होऊन नाचणे असा एक ट्रेंड सगळीकडे रूढ होतोय या ट्रेंडला थांबवण्याचे काम चिंचखेड गावामध्ये शिवजन्मोत्सव समिती आणि शालेय व्यवस्थापन समित्या व ग्रामस्थांनी केले आहे.

ज्या महापुरुषाचे नाव घेताच अंगावर शहारे येतात त्या महापुरुषाचा कार्यक्रमाला मात्र आपण त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालू ठेवता बेधुंद अवस्थेमध्ये नृत्य करतो ही खरोखरच लाजिरवाणी बाब आहे पण चिंचखेड वासियांनी या डीजे प्रथेला तिलांजली देऊन सर्व ग्रामस्थ आणि शालेय समित्यांनी एकत्र येत शिवजयंतीनिमित्त बुधवारी वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

चिंचखेड फेस्टिवल या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या कला गुणाला तसेच त्यांच्या सर्वांगीन विकासाला चालना मिळण्यासाठी हातभार लावला गेला. चिंचखेड करांनी यावर्षी शिवजयंतीनिमित्त अशा प्रकारचे अनोखे कार्यक्रम करून शिवाजी महाराजांच्या विचारांना सलाम आणि मानवंदना दिली. चिंचखेड फेस्टिवल या कार्यक्रमात शेतकरी आत्महत्या बद्दल देखील संदेश देण्यात आले, ‘खेळ मांडला’ या गाण्यातून बळीराजाच्या भावना दाखवण्याचा प्रयत्न विद्यार्थी आणि विद्यार्थिनींतर्फे करण्यात आला. चिंचखेड येथे साजरी झालेली शिवजयंती ही नाशिक जिल्ह्यातील सर्वांत आकर्षक आणि आगळीवेगळी शिवजयंती ठरली. या कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने बक्षिसे देखील मिळाली.

कार्यक्रमाच्या पडद्यामागील शिक्षक

चिंचखेड फेस्टिवल ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी चिंचखेड येथील शालेय शिक्षकांची प्रचंड मेहनत आहे. कमी कालावधीत विद्यार्थ्यांना चिंचखेड फेस्टिवल मध्ये योग्य परफॉर्मन्स करण्यासाठी शिक्षकांनी ऊर्जा दिली. विद्यार्थ्यांच्या नृत्यातून शिक्षकांचे भाव दिसत होते,

जिल्ह्यातील आगळी-वेगळी शिवजयंती

चिंचखेड येथे साजरी झालेली शिवजयंती ही नाशिक जिल्ह्यातील सर्वांत आकर्षक आणि आगळीवेगळी शिवजयंती ठरली. या कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने बक्षिसे देखील मिळाली. कार्यक्रमाला चिंचखेड ग्रामस्थ तसेच परिसरातील आणि आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाला प्रोत्साहन दिले.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न

शिवजयंती निमित्त चिंचखेड फेस्टिवल कार्यक्रमा अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न चिंचखेड येथील सर्व शालेय समित्या आणि ग्रामस्थ मार्फत करण्यात आला. शिवजयंतीनिमित्त अशाप्रकारे कार्यक्रम राबविल्याने नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे धडे विद्यार्थ्यांना माहिती होण्यास मदत होईल. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार विद्यार्थ्यांच्या मनावर कोरले जाऊन एक आदर्शवत महाराष्ट्र घडविण्यास हातभार लागेल. कार्यक्रमाचे आयोजक आणि सर्व चिंचखेड शालेय समित्यांचे चिंचखेड ग्रामस्थांच्या वतीने आभार मानण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या