सिन्नर घाटात बस चालकाला मारहाण

jalgaon-digital
1 Min Read

सिन्नर | वार्ताहर

नाशिक-पुणे महामार्गावर मोहदरी घाटात आज (दि. ५) सकाळी ०७:४५ वाजेच्या सुमारास तीन ओमनी कार मधील प्रवाशांनी सिन्नर आगाराच्या बस चालकाला मारहाण केल्याचा प्रकार घडला.

नाशिकहून सिन्नरकडे येणारी एम.एच १४ बीटी १३३३ ही बस मोह गावच्या शिवारात हॉटेल सूर्याजवळ आली असता अचानक दुचाकीस्वार रस्त्यात आडवा आला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाने ब्रेक लावून बस थांबवली. या बसमागे असणाऱ्या ओमनी कार चालकाची त्यामुळे धांदल उडाली. याचा राग आल्याने सदर कार चालकाने सोबतच्या इतर दोन कार समवेत पाठलाग करत बस घाटातील गणपती मंदिराजवळ थांबवली.

या तीनही कारमधील पुरुष प्रवाशांनी खाली उतरत शिवीगाळ करत चालकाला मारहाण केली. दरम्यान, हा प्रकार घडत असताना काही प्रवाशांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता कारमधील प्रवाशांनी त्यांना देखील शिवीगाळ केली. बसच्या वाहकाने या तीनही कारचे नंबर नोंदवून घेत सिन्नर आगारात माहिती दिली.

याप्रकरणी बस चालक बाबुराव काकड (वय ३३) रा. सिन्नर यांच्या फिर्यादीवरून तीन कारमधील अज्ञात प्रवाशां विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी तीनही कारच्या मालकांना व मारहाण करणाऱ्या दोघांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतल्याचे समजते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *