Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

दहावी पाठोपाठ बारावी नापासांच्या गुणपत्रिकेवरून ‘अनुत्तीर्ण’ शेरा हद्दपार

Share

पुनर्परीक्षेत दोनपेक्षा अधिक विषयात अनुत्तीर्ण झाल्यास कौशल्य विकास अभ्यासक्रमासाठी पात्रचा शेरा

नाशिक । प्रतिनिधी

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्री बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची मानली जाते. या परीक्षेतील यशापयशावर विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक भवितव्याची दिशा ठरत असते. या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास परीक्षार्थीच्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्यावर परिणाम होतो. त्यामुळे सरकारने अशा विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी बारावीच्या गुणपत्रकावरून फेल किंवा अनुत्तीर्णचा शेरा हटविण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार एक किंवा दोन विषयांत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकावर ‘पुनर्परीक्षेस पात्र’ तर तीनपेक्षा अधिक विषयांत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकावर ‘कौशल्य विकास कार्यक्रमास पात्र’ असा शेरा देण्यात येणार आहे. नियमित परीक्षेत तीन पेक्षा अधिक विषयात अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेसाठी एकसंधी संधी देण्यात येणार आहे.

ऑगस्ट २०१६ च्या शासन निर्णयानुसार दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर अनुत्तीर्ण (फेल) हा शब्द न वापरता विद्यार्थी पुरवणी परीक्षेत श्रेणी विषयासह तीन किंवा त्यापेक्षा अधिक विषयात अनुत्तीर्ण असल्यास ‘ इलिजिबल फॉर ओनली स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम ‘ असा शेरा देण्यात येतो. त्याच धर्तीवर कौशल्य विकास व उद्योजकता विभागाकडून निर्गमित करण्यात आलेल्या आदेशानुसार बारावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकावर सुधारित शेरे नमूद करण्यात येणार आहेत.

या अनुषंगाने सुधारित शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी ) परीक्षेच्या जुलै / ऑगस्ट २०२०च्या पुरवणी परीक्षेपासून व सन २०२० पासून घेण्यात येणाऱ्या नियमित परीक्षेला (फेब्रुवारी/मार्च) प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत अनुत्तीर्ण (फेल) हा शब्द वापरण्यात येणार नाही. नवीन निर्णयानुसार विद्यार्थी नियमित परीक्षेतील सर्व विषयात उत्तीर्ण असल्यास ‘उत्तीर्ण ‘, एक किंवा दोन विषयात अनुत्तीर्ण असल्यास पुनर्परीक्षेसाठी पात्र, तर तीन किंवा त्यापेक्षा अधिक विषयात अनुत्तीर्ण असल्यास देखील पुनर्परीक्षेसाठी पात्र असा शेरा गुणपत्रिकेवर देण्यात येणार आहे.

तर पुरवणी परीक्षेत तीनपेक्षा अधिक विषयात अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘एलिजिबल फॉर स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम’ असा शेरा असणार आहे. अशा प्रकारचे शेरे असणारे विद्यार्थी उत्तीर्ण कि अनुत्तीर्ण हे दोन शब्दात सांगायचे झाल्यास या दोन्ही शब्दांचा सरळ अर्थ अनुत्तीर्ण असाच असणार आहे असे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या आदेशात म्हटले आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!