आज बाशिंगे वीरांची मिरवणूक

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक । प्रतिनिधी

शहराला परंपरा लाभलेल्या वीरांची मिरवणूक आज विविध भागांतून निघणार असून, ज्यांच्या घरात वीरांचे टाक आहेत त्यांनी जय्यत तयारी केली आहे. फाल्गुन वैद्य प्रतिपदेला दाजीबा महाराज बाशिंगे वीरांची कथा आहे.

या धूलिवंदनाचे दिवशी शहरामध्ये वीरांची मिरवणूक काढली जाते. देवादिकांंचे अवतार धारण करून हे वीर गंगाघाटावर वाजतगाजत मोठ्या थाटात मिरवले जातात. त्यातही अत्यंत प्रभावी असलेले ‘बाशिंगे वीर’ हे नागरिकांत प्रसिद्ध आहेत. दिंडोरी तालुक्यात जानोरी गाव आहे. तिथे सधन गवळी राहत असे. त्याने खंडेरावांची भक्ती करण्याचे अंंगी बाणले होते. त्याचा गाई-म्हशीचे दूध विकणे हाच व्यवसाय होता. काम झाल्यावर ईश्वर सेवा करायची असा नित्यक्रम होता.

डोक्याला भरजरी वस्त्रे, कानात सोन्याच्या पगड्या, गळ्यात सरी, हातात सोन्याचे कडे, पायात मारवाडी जोडा, कंबरेला धोतर असा बादशाही राहणारा जवान शरीराने ही निधड्या छातीचा होता. वयाच्या 16 व्या वर्षी लग्नाची मागणी येते व 5 व्या मांडवी लग्न ठरते. 5 दिवस आधी अंगाला हळद लागते. काळाची चाहूल लागते न लागते तोच 7 ते 8 चोर त्यांच्यावर चाल करतात. एका तासाच्या धूमश्चक्रीत चोरांकडून खूप मार मिळतो व त्यातच शेवट होतो. चोरटे, माल घेऊन फरार होतात. आपला धनी जमिनीवर घायाळ पडल्याचे पाहून ते कुत्रे दुपारची न्याहारीची गाठोडे घेऊन परत घरी येते. कुत्रे एकटेच आलेले पाहून लग्न घरची मंडळी घाबरून जाते. कुत्र्यावरही जखमा असतात.

कुत्र्याला घेऊन धनी पडला आहे, तिथे सर्व मंडळी पोहोचतात. त्यानंतर कुत्रेही प्राण सोडते. मंडळींना अतिशय दु:ख होते. तर याच ठिकाणी धन्यास मूठमाती देतात व दुःखी होऊन घरी जातात. जीव जातांना लग्नाची मनापासून इच्छा राहून जाते. तर, मंडळी वेशीपासून आत येण्यास सुरुवात झाल्यावर एक विचित्र चमत्कार घडतो. महाराज ज्या ठिकाणी स्वत: खंडेरावाची पूजा करीत असत त्या जागेवर त्यांची पूर्ववत प्रतिमा दिसू लागली व बोलू लागली की, जो कोणी माझी राहिलेली इच्छा पूर्ण करील त्याचे मी काम करील. त्या महाराजांकडे कोणीही गार्‍हाणे सांगितल्यास त्यांचा निवारा होऊ लागला. परंतु, त्यांची मात्र इच्छा अपूर्ण राहिली. म्हणून हळदीचा नवरदेव बाशिंग लावून दरवर्षी आपल्या बायकोच्या शोधात फिरतोय. या फिरण्यात मात्र लोकांचेच राहिलेले प्रश्न सोडवितात अशी यांची आख्यायिका आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *