Type to search

Breaking News नाशिक ब्लॉग मुख्य बातम्या

राष्ट्रीय युवा दिन : तरुण धुमसतो आहे!

Share
जागतिक युवा दिन : तरुण धुमसतो आहे! Latest News Nashik National Youth Day Celebrate Swami Vivekanandas Birth Anniversary

र्षाच्या सुरुवातीलाच देशातील वातावरण ढवळून निघाले ते तरुण रक्तामुळे. भारत हा तरुणांचा देश मानला जातो. सुमारे २५% लोकसंख्या ही उसळत्या रक्ताची असल्याने देशाचा रथ हाकतांना या तरुणाईला दुर्लक्षित करून चालणार नाही, अशी शिकवण यंदाचे दशक घेऊन आले आहे. एनआरसी, सीएएच्या विरोधात रस्त्यावर उतरलेली तरुणाई न पटणाऱ्या नियमांना आम्ही धुडकावून लावू, असे सांगू पाहते आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी जेएनयूसारख्या प्रतिष्ठित आणि पुरोगामी विचारांचा वारसा लाभलेल्या विद्यापीठाच्या आवारात झुंडशाहीला बळ देणाऱ्या गुंडांकडून झालेला भ्याड हल्ला यंत्रणेचे साफ अपयश आहे तसेच देशातील सुरक्षाव्यवस्था मोडीत निघाल्याचा पुरावा देखील आहे. जेएनयूच्या विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ वेगवेगळ्या राज्यांतील विद्यार्थी रस्त्यांवर उतरले. हल्ल्याचे पडसाद देशभर उमटले. यांतून एक स्पष्ट होते, की आजचा तरुण सक्रिय आहे. आसपास घडणाऱ्या प्रत्येक घटनेबद्दल त्याचे काहीतरी मत आहे. देशातील विविध समस्यांविरोधात तरुणाईचा आवाज घुमणे जागृत लोकशाहीचे लक्षण आहे. कारण या आवाजात क्रांतीचा हुंकार असतो. परिवर्तन घडवून आणण्याची ताकद असते.

मात्र हे गरम रक्त आवेशाच्या भरात अनेकदा चुकीचे पाऊल टाकते. अति आवेगात हिंसाचाराला वाचा फुटते. अशावेळी राजकारणी आपापली पोळी भाजून घेतात. उसळत्या रक्ताला भडकवण्याइतके सोपे दुसरे काही नसते, हे राजकारण्यांना ठाऊक असते. त्यामुळे तरुणांना आंदोलने करण्यास भाग पाडून राजकारणी आपला कार्यभाग साधतात, हे जणू सवयीचे झाले आहे. हिंसक आंदोलनांच्यावेळी नकळत भिरकवलेल्या एका दगडाची किंमत राज्यातील शेकडो तरुण आजही भोगत आहेत. अशावेळी अनेकदा त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल होतात. एका आंदोलनापायी अख्खे भविष्य टांगणीला लागते. ठराविक लोकांचा स्वार्थ साधण्यासाठी केलेल्या आंदोलनांमुळे गुन्हा दाखल झालेल्या सामान्य कार्यकर्त्यांचा नाहक बळी जातो.

सध्या जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळ जमलेल्या तरुणांपैकी मेहक मिर्झा प्रभू या तरुणीने ‘फ्री काश्मीर’ लिहिलेले पोस्टर झळकविले. परिणामी, तिच्यावर १५३ ब अंतर्गत निरनिराळा धार्मिक, वांशिक, प्रादेशिक, जातीय गट निर्माण करून त्याद्वारे एकोपा टिकण्यास बाधित होईल असे कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. यासोबत सुवर्णा साळवे, फिरोज मिठीबोरवाला, उमर खालिद यांच्यासह ३१ तरुणांवर गंभीर गुन्हे नोंदविण्यात आले. जेएनयूतील विद्यार्थ्यांवर हल्ला करणारे गुंड अजूनही पोलिसांच्या हाती आले नसून ज्यांच्यावर हल्ला केला गेला त्या २० पीडित तरुणांवर मात्र पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. ही भीषण परिस्थिती हा लेख प्रकाशित होईपर्यंत बदलेली असेल, ही किमान अपेक्षा.

या आणि आधीच्याही अनेक आंदोलनांमध्ये गुन्हा दाखल झालेल्या तरुणांची हजारोंनी संख्या असेल. कोणीतरी दादा, तात्या दगडफेक, तोडफोड करायला लावणार; मनगटात रग आणि डोक्यात गुर्मी असणारी तरुण पिढी त्या दादाची दादागिरी शिरसावंद्य मानणार, हे मोठ्या प्रमाणात आजच्या तरुणाईचे खेदजनक वास्तव आहे. मुळात गुन्हेगारी वृत्तीचे नसणारे मात्र भावनेच्या भरात चुक करणारे अनेक तरुण आज दाखल झालेल्या गुन्ह्यांपायी सरकारी नोकरी, पासपोर्टला मुकले आहेत. अशा वेळी गुन्ह्याचा बट्टा पुसला जावा म्हणून कोर्टकचेऱ्यांचे उंबरठे झिजवण्यापलीकडे काही उरत नाही.

आंदोलनांची ही दुसरी बाजू तरुणांपर्यंत पोहचणे आज गरजेचे झाले आहे. स्वतःच्या हक्कांसाठी भांडण्यात गैर नाहीच, मात्र मार्ग सदनशीर असल्यास नुकसान टळते आणि यशाच्या शक्यता वाढतात. त्यासाठी तरुणांचा सरकारवर विश्वास असणे गरजेचे आहे. तरुणांमध्ये स्वतःबद्दलची विश्वासार्हता वाढविणे ही सरकारची जबाबदारी आहे.

देशातील तरुणांची ऊर्जा आंदोलने, दंगली यांपेक्षा विधायक कार्यांकडे वळविल्यास प्रगतीचा वेग नक्कीच वाढेल. आजचे तरुण भविष्यासाठी केलेली गुंतवणूक आहे, हे सरकारने लक्षात घेणे गरजेचे आहे. तसेच दुसरीकडे, गेलेली वेळ आणि घडलेला गुन्हा मागे घेता येत नाही याचे भान राखून धुमसणाऱ्या तरुणांनी सक्रियता दाखविल्यास खऱ्या अर्थाने म्हणता येईल, ‘चिर कलेजा घिर आयेगी फिर भारत की तरुणाई, जिसमे शोणित सत्य बहेगा, संस्कृति होगी समाई’.

-प्राजक्ता नागपुरे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!