Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

सिन्नर : पाथरे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने वानराचा मृत्यू

Share

पाथरे : सिन्नर-शिर्डी महामार्गावरील पाथरे जवळील महानुभव आश्रमा समोर अज्ञात वाहनाच्या धडकेने एका वानराचा मृत्यू झाला.

हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळीच पाथरे गावात सहा वानरांचा समूह आला होता. गावात दोन दिवसाचा पाहुणचार चार घेतल्यावर ही वानरे महामार्गाच्या पलीकडे एकत्रित जात असताना अज्ञात वाहनाची धडक लागून एक वानर जागीच ठार झाले. आपला सवंगडी रस्त्यावर पडलेला पाहून बाकीची पाच माकडे त्याला उठवण्याचा प्रयत्न करत होते. हे दृश्य रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांनी बघितले आणि घटनेची खबर गावात पोहोचली.

गावातील मोजक्या तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. गर्दी होऊ नये म्हणून काही कार्यकर्त्यांनी गर्दीला रोखले. या घटनेची बातमी वनविभागाला तसेच पशुवैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आली. वनविभागाचे कर्मचारी नारायण वैद्य यांनी पंचनामा केला तर वावीचे पशुधनवैद्यकीय अधिकारी अविनाश पवार यांनी वानराचे शवविच्छेदन केले. मृत वानराचा मृतदेह गावात हनुमान मंदिरात आणण्यात आला. वानराचे हनुमान मंदिराजवळील मोकळ्या जागेत ग्रामस्थांनी विधीवत पूजा करून या वानराचे दफन केले.

त्यावेळी बाकीचे शोकाकुल वानरं मंदिराच्या आजुबाजूला असलेल्या झाडांवर बसून होते. मुक्या प्राण्यांची चलबिचलने वातावरण गहिवरून गेले. या घटनेची खबर गावात पोहचताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी प्रत्यक्ष हनुमंतरायाने गावाला दर्शन दिले अशी ग्रामस्थांची, प्राणी मित्रांची भावना झाली. करोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे वानराची दफन करताना मोजक्याच जणांनीच त्यामध्ये सहभाग घेतला.

प्राणी मित्र, ग्रामस्थ मोजक्याच संख्येने याठिकाणी उपस्थित होते. पण जमावबंदी आदेशामुळे कोणीही एकत्र येण्यास धजावत नव्हते. सर्वजण हनुमान मंदिरासमोर पटांगणावर विशिष्ट अंतर ठेवून एकटे एकटे बसले होते. अखेरचा प्रणाम करून त्याचा दफनविधी झाल्यानंतर प्रत्येक जण आपापल्या घरी निघून गेला मात्र भविष्यात वानर दफन केलेल्या जागेवर वानराचे मंदिर बांधण्याचा सूर उपस्थितांमध्ये ऐकू येत होता.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!