Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

26 लाख झाडे कोमेजली; वनविभागाचे साडेबारा कोटी पाण्यात

Share
26 लाख झाडे कोमेजली; वनविभागाचे साडेबारा कोटी पाण्यात latest-news-nashik-million-of-saplings-seedlings-damaged

नाशिक । राज्यातील मागील भाजप सरकारने राबविलेल्या वृक्ष लागवड मोहीमेचा राज्यभरात फज्जा उडाला आहे. नाशिक जिल्ह्यातही यापेक्षा फारसे वेगळे चित्र नाही. सन 2017 – 18 या वर्षात जिल्ह्यात 78 लाख 48 हजार 282 वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यापैकी 25 लाख 65 हजार रोपे संगोपनाअभावी कोमेजली आहेत. एक रोप लागवडीसाठी साधारणत: 50 ते 55 रुपये इतका खर्च येतो. मृत झालेल्या रोपांची संख्या बघता वृक्ष लागवडीसाठी झालेला साडेबारा कोटींचा खर्च पाण्यात गेला आहे. एकूण वृक्ष लागवडीपैकी फक्त 67 टक्के वृक्षच तग धरु शकली आहेत.

महाराष्ट्र हिरवागार करण्याचे स्वप्न बाळगत तत्कालीन सरकारमधील वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मागील पाच वर्षात 50 कोटी वृक्ष लागवडीचे ध्येय बाळगले होते. त्याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्याला वृक्ष लागवडीचे विशिष्ट उदिष्ट देण्यात आले होते. 2017 – 18 या वर्षात जिल्ह्याला एक कोटी वृक्ष लागवडीचे टार्गेट देण्यात आले होते. वनविभाग, वनविकास महामंडळ, जिल्हापरिषद, कृषी विभाग यांसह 35 विभागांनी वृक्ष लागवड मोहीमेत सहभाग घेतला. दिलेल्या उदिष्टांपैकी 78 लाख 48 हजार वृक्षांची जिल्ह्यात ठिकठिकाणी लागवड करण्यात आली.

15 जुलै ते 15 सप्टेंबर या मान्सूनच्या कालावधीत वृक्षा रोपण करण्यात आले. वृक्षांनी तग धरणे व त्यांचे नैसर्गिरीत्या संगोपन होणे हा प्रमुख उद्देश असतो. गतवर्षी एकूण लावण्यात आलेल्या वृक्षांपैकी फक्त 52 लाख 83 हजार वृक्षच तग धरु शकली आहेत. संगोपन व दुर्लक्षामुळे तब्बल 25 लाख 65 हजार वृक्षांनी मान टाकल्याचे आकडेवारीरुन समोर येत आहे. यंदाच्या तुलनेत गतवर्षी जिल्ह्यात पर्जन्याचे प्रमाण अत्यंत कमी होतेे. त्यामुळे अनेक तालुक्यांमध्ये नोव्हेंबर महिन्यानंतरच दुष्काळाचे चटके जाणवायला लागले होते.

पाण्याची कमतरता व दुष्काळामुळे अनेक ठिकाणी लावण्यात आलेली वृक्ष जळाली. तर, काही ठिकाणी स्थानिकाकडून शेतीसाठी वृक्षांना वणवा लावला जातो. मानवनिर्मित वणव्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात वृक्ष जाळण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. वनविभागाकडून लावण्यात आलेल्या वृक्षांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण कुंपण नसते.

त्यामुळे जनावरांकडून ती तुडवली जातात किंवा खाल्ली जातात. या सर्व आपत्तींमुळे वृक्ष लागवडीनंतर ती जिवंत राहण्याचे प्रमाण घटल्याचे वनविभागाकडून सांगण्यात येत आहे. एकूणच या मोहीमेचा जितका गाजावाजा करण्यात आला त्यापेक्षा तिचे अपयश मोठ्या प्रमाणात असल्याचे समोर येत आहे.

12 कोटी 50 लाखाचा चुराडा
वृक्ष लागवडीसाठी खड्डा खोदणे, वाटिकेतून रोप विकत घेणे व त्याची लागवड करणे यासाठी साधारणत: 50 ते 55 रुपये इतका खर्च येतो. गतवर्षी लागवड करण्यात आलेल्यांपैकी 26 लाख वृक्षांनी मान टाकली आहे. एक वृक्षासाठी 50 रुपये खर्च धरला तरी मृत झालेल्या वृक्षांची आकडेवारी बघता 12 कोटी 50 लाख रुपये खर्च वाया पाण्यात गेला आहे.

वृक्ष लागवडीनंतर त्यांचे संरक्षण व संवर्धन करण्यास मर्यादा येतात. नैसर्गिक व मानवनिर्मित दोन्ही समस्या असतात. गतवेळी लावण्यात आलेल्या 67 टक्के वृक्षांनी तग धरला आहे. ड्रोनद्वारे वृक्षांची मोजणी केली जाणार होती. पण त्यासांठी आर्थिक तरतूद नसल्याने वृक्षांची मोजणी करुन त्यांचे फोटो व व्हिडीओ वनविभागाला पाठविण्यता आले आहे.
– शिवाजी फुले, उपवनसंरक्षक पश्चिम वनविभाग

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!