Type to search

Breaking News ब्लॉग मुख्य बातम्या

Blog : कामगार दिवस : कामगारांचे कैवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Share

देशातील प्रत्येक नागरिक स्वतःचा व कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी काहीना काही काम करीत असतो. म्हणजे प्रत्येक जण हा एक प्रकारचा कामगारच आहे. काही लोक स्वतःचा व्यवसाय सुरू करून काम करतात तर काही लोक हे इतरांच्या व्यवसायात किंवा कारखान्यात काम करून उदरनिर्वाह करत असतात. एक कामगार म्हणून आज आपल्याला भरपूर सोयी सवलती मिळत असतात.

म्हणजेच योग्य वेतन, विविध रजा, दिवाळीच्या सुट्ट्या, आजारीपणाच्या सुट्ट्या, भविष्य निर्वाह निधी,विमा आणि अशा बर्याच सवलती आहेत. परंतु या सवलती किंवा सुविधा कशा मिळाल्या,या मिळण्यामागे काय कारणे होती,त्या मिळवून देण्यासाठी कोणाचे योगदान होते ह्या कोणत्याच गोष्टी आपल्याला कदाचित माहिती नसतील याच गोष्टींची माहिती आज आपण मिळवूयात.

आज १ मे म्हणजे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन. सर्वप्रथम सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

आजच्या कामगार दिनाच्या शुभेच्छा देत असताना एका महान व्यक्तीची आज येथे प्रामुख्याने आठवण होते. ती अशी व्यक्ती की ज्याने कामगारांचे प्रश्न, त्यांची परिस्थिती, समस्या, व्यथा जवळून बघितल्या होत्या. आणि हे प्रश्न किंवा समस्या सोडवण्यासाठी आणि कामगारांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी नेहमी लढा दिला व कामगारांना न्याय मिळवून दिला. आणि ती व्यक्ती आहे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर. आता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची कामगारांविषयी भूमिका कशी होती? नेमके काय योगदान त्यांनी कामगारांसाठी दिले? हे आपण पुढे बघूया.

१९ व्या उत्तरार्धात शतकाच्या उत्तरार्धात आधुनिक कामगार वर्ग उदयास आला.भारतामध्ये जसजसा औद्योगिक विकास होत गेला तसतसे नवीन नवीन यंत्रांचा वापर सुद्धा वाढू लागला. त्याचप्रमाणे कामगार संख्या सुद्धा वाढू लागली, त्या काळात पाहिजे तेवढे प्रभावी कामगार कायदे अस्तित्वात नव्हते. त्यामुळे कामगार आणि मालक,भांडवलदार यांच्याकडून कामगारांचे शोषण होऊ लागले. कारखाना मालकांच्या स्वार्थी वृत्तीमुळे कामगार आणि मालक यांच्यात भांडण, तंटे, वाद होऊ लागले. औद्योगिक विकासामुळे खेड्यातील लोक सुद्धा मोठ्या प्रमाणात शहरात येऊ लागले होते त्यामुळे कामगारांची संख्या वाढली. मुबलक प्रमाणात कामगार मिळू लागले. त्यामुळे कामगारांची किंमत सुद्धा कमी झाली.कारखाना मालक यांच्या लक्षात आले की यंत्रसामग्री बिघडली की दुरुस्तीसाठी खर्च करावा लागतो,परंतु कामगाराला इजा झाली तर ते अपंग होतील. त्याऐवजी आपण दुसरा मजूर नेमू शकतो त्यात खर्चही करण्याची गरज नाही अशा प्रवृत्तीमुळे कारखानदार अधिक श्रीमंत होत गेला तर कामगार वर्गाची अजून दयनीय अवस्था होत गेली.

काम करताना कामगाराला अपघात झाला तर त्या कामगाराला विमा मिळत नव्हता, तशी सोय नव्हती, आरोग्यविषयक सुविधा नव्हत्या, विश्रांतीगृहे नव्हती. उपहारगृहे नव्हती कल्याणकारी योजना नव्हत्या पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती कामाचे तास निश्चित नव्हते ज्यादा श्रमाचा मोबदला दिला जात नव्हता. आठ पर्यंत कामगारांना दररोज 15 ते 16 तास काम करावे लागायचे कारखान्यात सुद्धा अपुरी जागा, यंत्रसामग्रीना सुरक्षितता नाही, स्वच्छता नाही प्रदूषण अशा प्रकारचे वातावरण कारखान्याचे होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार कल्याणाचा मार्ग खऱ्या अर्थाने मोकळा केला असे म्हणता येईल कारण कामगारांच्या अन्याय अत्याचाराविरुद्ध लढा देऊन अन्यायाला वाचा फोडली आणि आजच्या कामगाराला खरा न्याय मिळवून दिला. त्याच्या मागचे कार्यही महत्वाचे आहे.

खेडेगावातून शहरात येणाऱ्या कामगारांची संख्या वाढत होती यामध्ये दलित,आदिवासी आणि मागास समाजातील लोक होते.त्यातही कारखान्यात कामगाराला कामावर घेताना स्पृश्य-अस्पृश्य भेदभाव तर होताच. जरी कामावर घेतले तरी अन्यायकारक वागणूक कामगाराला दिली जात होती. तेव्हा कामगाराच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एखादी कामगारांची संघटना असावी असे बाबासाहेबांना वाटत होते.१९३४ सालापासून बाबासाहेब म्यूनिसिपल कामगार संघात सामील झाले.आणि मुंबई महापालिकेच्या कामगारांच्या प्रश्नांत त्यांनी स्वतः लक्ष घातले. आंबेडकरांना कामगारांविषयी आपुलकी व तळमळ होतीच. म्हणून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी बाबासाहेबांनी दिनांक १५ ऑगस्ट १९३६ ला स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. बाबासाहेबांनी हा पक्ष केवळ मजूर कामगार कष्टकरी वर्गाच्या कल्याणासाठीच स्थापन केला होता म्हणून त्यांनी पक्षाच्या नावातच ‘मजूर’ हा शब्द वापरला. त्यांचे असे म्हणणे होते की कामगार हा शब्द खूप व्यापक आहे यात जात धर्म वंश लिंग हे सर्व वर्ग आहेतच म्हणजेच मजूर या वर्गात सर्वच कामगार आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० जुलै १९४२ रोजी मजूर मंत्री म्हणून सूत्रे हातात घेतली १९४२ ते १९४६ या कालावधीत ते या पदावर कार्यरत होते. या काळामध्ये बाबासाहेब कामगारांच्या हितसंबंधाचे संरक्षक व उद्धारक ठरले. बाबासाहेबांनी कामगारांचे प्रश्न, अडचणी, व्यथा, व परिस्थिती जवळून बघितली त्यामुळे कामगारांविषयी त्यांना जाणीव होती.

कामगार व मालक यांच्यामध्ये नेहमी वाद, भांडण होत होते, त्यामुळे ताणतणाव वाढायचा. कामगार आणि मालक या दोघांमधील ताण तणाव कमी करण्यासाठी आपापसात चर्चा होणे गरजेचे आहे त्यासाठी एखादी परिषद असावी असा विचार प्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला व त्यांनी मालक,कामगार व इंडियन कौन्सिल लेबर यांनी एकत्र येऊन चर्चा करावी व आपसातील मतभेद दूर करून चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे असे सांगितले व त्रिपक्ष कामगार परिषद स्थापन केली.

बाबासाहेबांनी कामगार युनियन च्या बाबतीत धोरण ठरविताना मालकाने कामगारांच्या युनियनला मान्यता दिली पाहिजे,योग्य पूर्तता केली पाहिजे.आणि जर मालक मान्यता देत नसेल तर अशा कारखानदारांवर दंडनीय गुन्हा दाखल केला जावा अशा प्रकारचे विधेयक मांडून कामगार कल्याणाचे महत्त्वाचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले.

१ नोव्हेंबर १९४४ रोजी कारखाना कायद्यांमध्ये अनेक दुरुस्त्या करण्यात आल्या त्या प्रामुख्याने महागाई भत्त्यात वाढ करणे,ज्यादा कामाचा योग्य मोबदला देणे, कारखाना बंद झाल्यास कामगारांचे नुकसान झाल्यास कामगारांना नुकसान भरपाई देणे, कामगारांना न्यायालयाच्या परवानगीशिवाय कामावरून काढून टाकू नये, आजारपण, अपघात व अधिकृत रजा ९० दिवस कराव्यात. त्यातच कामगारांविषयी महत्त्वाचे म्हणजे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज (सेवायोजन कार्यालयाची) स्थापना करणे होय. आंबेडकरांनी मजुरांसाठी कामाचे, तास भविष्य निर्वाह निधी,आरोग्यविषयक विमा,मालकाची जबाबदारी,नुकसान भरपाई अशा महत्त्वपूर्ण बाबी कायद्यात आणल्या.

भारत स्वतंत्र झाल्यानंतर बाबासाहेब कायदेमंत्री झाले होते तेव्हा कामगारांच्या कल्याणासाठी अनेक कायदे त्यांनी केले संप, टाळेबंदी, भांडण, कोर्टकचेऱ्या या कोणत्याही मार्गातून कामगार व मालक यांच्यातील वाद संपणार नाही.तेव्हा यासाठी १९४७ मध्ये औद्योगिक कलह कायदा आणला.या कायद्याचा मुख्य उद्देशच हा होता की कामगार व मालक यांच्यातील वाद शांततेने व विचारविनिमय करून सोडवता यावा.

१९४८ साली कारखाना कायदा करण्यात आला.तसेच त्याच वर्षी किमान वेतन कायदा हा सुद्धा मजुरांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा कायदा केला की ज्यानुसार शासनाने ठरवून दिलेले किमान वेतन मजुरांना मिळाले पाहिजे. त्यापेक्षा कमी वेतन देऊ नये असे बंधन कारखान्यावर किंवा व्यवसाय संघटनेवर घालण्यात आले.त्याचप्रमाणे कामगारांच्या जीवनात सुरक्षितता मिळावी,काम करताना अपघात झाला किंवा अपंगत्व आले तर त्यासाठी उपाय म्हणून १९४८ मध्ये कर्मचारी राज्य विमा कायदा निर्माण केला.यासारखे अनेक कायदे व मजुरांना न्याय मिळवून देणाऱ्या अनेक शिफारशी प्रत्यक्ष कायद्यात उतरविल्या.

स्त्री कामगारांना न्याय.मजूर मंत्री असताना खाणीमध्ये काम करणाऱ्या स्त्री कामगारांना बाळंतपणासाठी पूर्वीच्या चार आठवड्याच्या काळात प्रसूती भत्ता मिळण्याचा हक्क मिळाला. स्त्रियांनासुद्धा पुरुषाने एवढाच पगार मिळवण्याचा हक्क दिला.प्रसूतीनंतर चार आठवडे विश्रांती व मोबदला सुद्धा मिळवण्याचा हक्क आंबेडकरांनी स्त्रियांना दिला.आज आपण बघतो की महिलेला प्रसूतीसाठी पगारी सुट्ट्या मिळतात,आपल्यासोबत काम करणाऱ्या महिलेला आपल्या एवढाच पगार मिळतो ही बाबासाहेबांचीच पुण्याई आहे समस्त स्त्रियांवर.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कामगारांसाठी काही निवडक कार्ये

बाबासाहेब आंबेडकरांवर देशाची राज्यघटना लिहिण्याची जबाबदारी आली होती. तेव्हा कामगारांच्या अनेक प्रश्नांचा खोलवर अभ्यास करून कामगारांसाठी समान संधीचा आणि समानतेचा विचार संविधानात मांडला.
प्रत्येक व्यक्तीला त्याच्या योग्यतेनुसार आणि गुणांनुसार व कार्यानुसार योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे अशी योजना घटनेत केली.

कष्टकरी,मजूर,शोषित,पीडित,समाजाच्या उद्धारासाठी राज्यघटनेत योग्य ते कायदे केले आहेत. भांडवलदार आणि श्रीमंत यांना भेदभावाची वर्तणूक करण्यापासून रोखण्याचे अतिशय महत्वाचे आणि अवघड काम डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या कायद्यानुसार केले आहे.

समस्त कामगार, शेतकरी, शोषित, पीडित, विद्यार्थी अशा सर्वानाच बाबासाहेब आंबेडकर यांनी कायद्याच्या माध्यमातून संरक्षण दिले आहे त्यामुळे आजच्या या कामगार दिनानिमित्त महामानवास अभिवादन करावे असे प्रत्येकाला वाटल्याशिवाय राहणार नाही.

आपण करत असलेल्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करणे,आणि एकमेकांना पुढे घेऊन जाणे हेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खरे अभिवादन असेल.

– प्रा.मिलिंद साळीकराम पाडेवार
भोंसला मिलिटरी महाविद्यालय, नाशिक

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!