Thursday, April 25, 2024
Homeनाशिकवावी क्वारंटाईन सेंटरमध्ये जेवणाची हेळसांड; किराणा साहित्याचा अभाव

वावी क्वारंटाईन सेंटरमध्ये जेवणाची हेळसांड; किराणा साहित्याचा अभाव

सिन्नर : करोना संसर्ग टाळण्याच्या उपयोजनाअंतर्गत तालुक्यातील वावी येथे गोडगे पाटील स्कूलच्या वसतिगृहात सुरू करण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटरमधील व्यक्तींना दोन वेळच्या पुरेशा जेवणाची भ्रांत असल्याचा प्रकार समोर आला आहे. शासनाकडून मिळणारा आहार स्थानिक बचत गट शिजवून देतात. मात्र हा आहार अपुरा असल्याने तेथे ठेवण्यात आलेल्या परप्रांतीय नागरिकांसह स्थानिक व्यक्तींना अर्धपोटी रहावे लागत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या संचारबंदी आदेशाचा भंग करणाऱ्या, तसेच परत जिल्ह्यातून नाशिक जिल्ह्यात बेकायदा येणाऱ्या प्रवाशांवर गुन्हे दाखल करून त्यांना इन्स्टिट्यूट क्वारंटाईन करण्यात येत आहे. त्यासाठी गेल्या एक महिन्यापासून प्रशासनाने वावी येथे गोडगे पाटील पब्लिक स्कूलच्या वसतिगृहामध्ये सेंटर कार्यान्वित केले आहे. या ठिकाणी आजघडीला सुमारे ४० लोकांचे वास्तव्य असून गेल्या आठ दिवसांपासून या लोकांच्या जेवणाची परवड सुरू आहे.

- Advertisement -

प्रशासनाकडून गावातील स्थानिक बचत गटांना अन्न शिजवून देण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, यासाठीचा शिधा शासनाकडूनच पुरेसा दिला जात नसल्याने एवढ्या लोकांसाठी पुरेसे अन्न द्यायचे कसे असा प्रश्न या बचत गटांसमोर आहे. क्वारंटाईन सेंटर सुरू झाल्यानंतर सिन्नर मधील एका पतसंस्थेने जेवणाचे डबे पोहोच केले होते.

त्यामुळे गेल्या आठवड्यापर्यंत या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्याना दोन वेळचे पोटभर जेवण मिळत होते. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून गटविकास अधिकार्‍यांकडून उपलब्ध होणाऱ्या शिधा पुरवठ्यावरच सदर बचत गटास अवलंबून राहावे लागत आहे.

प्रशासनाकडूनच अपुरा शिधा मिळत असल्याने तेवढ्यातच अन्न शिजवून पुरवावे लागते. परिणामी क्वॉरेंटाईन असणाऱ्या व्यक्तींना पोटभर जेवण मिळत नाही. गेल्या आठवड्यात तर तांदूळ नसल्याने या लोकांना भात पुरवता आला नाही. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात एक पातळ भाजी आणि दोन चपात्या एवढेच अन्न मिळत असल्याने प्रशासनाच्या नियोजनाबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत होती.

बरे अर्धवट मिळणारे हे जेवण देखील दुपारी 2 वाजता तर रात्री 10 वाजेनंतर देण्यात येते. या दोन जेवणाच्या दरम्यान सकाळी चहा सोडला तर काहीच मिळत नसल्याने या केंद्रावरील व्यक्तींची उपासमार सुरू असल्याचे यावरून दिसून येते.

स्थानिक ग्रामपंचायतींचे सहकार्य नाही

वावी येथील केंद्रात क्वॉरेन्टाईन करण्यात आलेल्या लोकांसाठी गेल्या आठवड्यात पुरेसे जेवण नव्हते ही बाब खरी आहे. शासनाकडून मिळणारा शिधा आणि परिसरातील ग्रामपंचायतींकडून मदत घेऊन याठिकाणी जेवणाची व्यवस्था होणे आवश्यक आहे. मात्र, कोणतीच ग्रामपंचायत यासाठी पुढे आली नाही. क्वारंटाईन सेंटर वावी गावात असल्याने तेथिल ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून मदतीची अपेक्षा होती. मात्र , जेवण पोहचवायला देखील सहकार्य केले जात नाही.
डॉ. लता गायकवाड, गटविकास अधिकारी सिन्नर पं. स.

- Advertisment -

ताज्या बातम्या