Saturday, April 27, 2024
Homeब्लॉगBlog : संचारबंदीतील डायरी | वाट चढउतारांची…

Blog : संचारबंदीतील डायरी | वाट चढउतारांची…

कित्ती कित्ती बदलत जातो नाही आपण? अगदी अंतरबाह्य तेही न ठरवता नकळत. वयाचा आणि अनुभवलेल्या उन्हाळ्या-पावसाळ्यांचा आकडा बदलत जातो. स्वभाव-प्रभावही बदलत राहतात. प्रवास सुरु असतो, थांबे येत राहतात. नाना प्रसंग येतात, नाना वृत्ती-प्रवृत्तीची माणसं भेटतात. कुणाला जवळ करायचं वा कुणाला दूर लोटायचं हेही कळत जातं. एकदम अशी माणसं वाचता येत नसतात म्हणूनच तर खूपदा आपण फसतो, वेड्यात निघतो, ठेचा लागून जखमी होतो. हळूहळू माणसं कळू लागतात, त्यांना वाचण्याचा प्रयत्न तर नक्कीच करतो आपण मागील अनुभवांवरून!

हवी असणारी माणसं हात सोडून निघून जातात ,आपल्याला ती हवी असली तरी त्यांच्या प्राधान्यक्रमात आपण नव्हतो हे बरेच उशिरा लक्षात येते. मग उगाच अट्टहास होता आपला ‘ती व्यक्ती ‘माझी’ असावी’ हा. हे उमगते तेव्हा थोडे ‘मोठे’ही झालेलो असतो आपण किंवा हे कळू लागलेलं असतं म्हणून ‘मोठे’ झालो असे समजू या, फक्त समजायला काय जातं?

- Advertisement -

सुख-दुःख ,अपमान,सन्मान, अवहेलना, वंचना सारेच काही अनुभवायला लागतो आपण कारण जगण्याच्या खऱ्या प्रवाहात आता आपण प्रवेश केलेला असतो. आई- वडिलांच्या प्रेमळ, ऊबदार पंखाखालून निघत दुनियादारीच्या अफाट विश्वात पाऊल ठेवतो आणि वास्तव ‘दुनिया’ कळत जाते. इथे तुम्हाला कुणीही ओळखत नसतं. तुम्ही ‘कुणीतरी’ असता, सर्वसामान्य असता. या वयात एक कमालीची ऊर्जा, अस्वस्थता असते तुमच्या आत. तिचा वापर करून ‘कुप्रसिद्ध’ ही होता येते आणि ‘सुप्रसिद्ध’ देखील. ‘बदनाम हुये तो क्या हुआ नाम तो हुआ!’ हा मूर्खपणा या वयात असण्याची शक्यता अधिक पण तो नसणं हे घरातल्या संस्कार आणि वडीलधाऱ्यांची भीती यामुळे शक्य होते. नाव अधोरेखित व्हावं , दखलपात्र व्हावं म्हणून कुठल्यातरी क्षेत्रात धडपड सुरु होते. नावानिशी कुणीकुणी ओळखूही लागतं आपल्याला. सखेसोबती, मित्रमंडळ कोण आहे?कसे आहेत? यावरही खूप काही अवलंबून असतं. भरकटणं वा योग्य मार्ग सापडणं यात या मित्रांचा वाटा जेवढा मोठा तेवढाच आपल्या अस्थिर मनाचाही असतोच.

काही वर्षांपूर्वी आजसारखी मनोरंजनाची ढीगभर माध्यमे नव्हती, होती ती एवढी स्वस्तही नव्हती , पैशाला किंमत असण्याचा तो काळ. मला आठवतंय, सहा भावंड आम्ही पण परीक्षा फी भरायलाही वेळेवर पैसे मिळायचे नाही तर इतर मौजेची तर बोंबच होती. पैसे भरून सहल जायची तर घरीसुद्धा सांगितलं नाही कधी कारण उत्तर काय असणार ते माहिती असायचं. एका ताग्यात पाच जणी साजऱ्या होत असु. सहावा भाऊ म्हणून त्याला वेगळा पोशाख असायचा एवढेच नाहीतर त्यालाही ताग्यातला गणवेश चुकला नसता.

सभोवताल सारा सारखाच. घरोघरी सारखीच कथा असायची त्यामुळे मर्यादित गरजा असणारे आम्ही समवयस्कर वयापेक्षा अधिक समंजसपणे वागायचो. तो समंजसपणा तर हल्ली मुलांचे हट्ट, अपेक्षा आणि चिडचिड बघून तर अधिक ठळक होतो, कित्येकदा तुलनाही होते. अभावाचे बालपण इतक्या प्रखरतेने मनावर बिंबले होते की, कुठला हट्ट , मागणी करण्याची हिंमतच झाली नाही. वह्या संपल्यावर नवीन वही पाहिजे हे दादांना सांगायचीही भीती वाटायची. पेन-रिफिलचे तर किती जुगाड केले असतील आम्हालाच माहीत, आता आठवलं तरी कसंनुसं वाटतं, हसूही येतं.

वर्षातून एक-दोनदा चप्पल मिळायची. फार जपून वापरत असू. आज दाराबाहेर मुलांच्या बूट-चपलांनी गर्दी झालेले शु-रॅक बघते तेव्हा अभावाचं अनवाणी बालपण आठवतं अगदी आठवीपर्यंतचं…

काही आठवणी नकोही वाटतात. १५ ऑगस्टसाठी शालेय गणवेश धुवायला टाकायचा शिरस्ता होता. मग १४ ऑगस्टला रंगीत कपडे घालायचे म्हंटले की मोठा प्रश्न समोर असायचा. इतरांच्या उंची, सुंदर कपड्यात आपलेच कपडे गबाळे दिसणार कल्पना असायची त्यामुळे हा एक न्यूनगंड असायचा. १४ ऑगस्टला शाळेतच जाऊ नये असे वाटे. इतर सर्व दिवशी सर्वांचा सारखाच गणवेश असायचा म्हणून बरे वाटे.

दिवस तसेच राहात नाहीत, बदलतात-खूप बदलतात. स्वतःच्या मालकीची आख्खी १०० रु.ची नोट असली तर मी काय काय खरेदी करेन? असे मी इयत्ता १० वीत बघितलेले स्वप्न. अर्थात ते पूर्ण व्हायला मला डी. एड. उत्तीर्ण होऊन एका विनाअनुदानित शाळेत नोकरी करावी लागली. ह्या नोकरीनेही खूप काही शिकवलं. वडील गेल्यावर पाठीशी कुणी भक्कमपणे उभं राहणारं नव्हतं आणि आपल्या मागे जेव्हा असं कुणी नसतं तेव्हा आपणच आपसूक भक्कम होऊ लागतो किंबहुना आपल्याला तसं व्हावंच लागतं नाहीतर या जगात तुमचा टिकाव लागणं कठीण असतं!हे परिस्थितीने शिकवलं.

‘शब्दाला मोल असतं, शब्द जगवतात-तगवतात’ हे प्रथमच आयुष्यात समजलं जेव्हा मी बोलू लागले, लिहू लागले. निबंध लेखन स्पर्धा, कविता वाचन, वक्तृत्व स्पर्धा यात भाग घेऊ लागले. प्रोत्साहन मिळे आणि रक्कम स्वरूपात बक्षीसदेखील. या स्पर्धा जिंकत गेलो की एक प्रकारचा आत्मविश्वास वाढतो आणि सतत स्पर्धेत उतरण्याचा कैफही कायम असतो. हे सारं करताना आपली मतं तयार होतात, विचारपूर्वक आपली भूमिका ठामपणे निवडता येते, सुनावता येते. या साऱ्या प्रवासात मात्र घडण्या- बिघडण्याची सीमारेषा डोळसपणे पाळावी लागते कारण ती अगदीच पुसट असते हं! ज्यांना ती पाळता येते ते ‘विशेष’ बनतात , प्रवासाच्या एका टप्प्यावर संतुष्ट-स्थिर होतात.

आज मागे वळून पाहते तेव्हा चढउताराची केवढी वाट चालत आलो आपण? नवलही वाटते आणि हायसेदेखील! निम्म्यावर आलोय पुढचा थांबा कुठे कधी येईल माहीत नाही तेच बरं, तोवर ‘अजुनी चालतोची वाट….!

गंमत बघा! वीस वर्षांपूर्वीच्या फोटोंसाठी दोन ओळींचे शीर्षक लिहायला गेले आणि बोटं मोबाईलच्या की-बोर्डवर सुसाट धावत सुटली सकाळी सकाळी! आणि उमटत गेली वाट चढ-उतारांची…
———————–

डॉ.प्रतिभा जाधव
लासलगाव, नाशिक
[email protected]

- Advertisment -

ताज्या बातम्या