Friday, April 26, 2024
Homeनाशिकसिन्नर : शिवडे येथे बिबट्याचा वासरावरील हल्ला सीसीटीव्हीत कैद

सिन्नर : शिवडे येथे बिबट्याचा वासरावरील हल्ला सीसीटीव्हीत कैद

शिवडे : बिबट्याने वासरावर हल्ला केल्याची घटना पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास शिवडे येथील चव्हाणके वस्तीवर घडली. यावेळी कुटुंबातील सदस्यांनी बाहेर येऊन आरडाओरड व प्रतिकार केल्याने बिबट्याने जखमी वासराला घटनास्थळी टाकून पळ काढल्याचा प्रकार वस्तीवर बसवलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

सिन्नर तालुक्याच्या पश्‍चिम पट्ट्यातील शिवडे येथे भाऊसाहेब चव्हाणके यांची भैरवनाथ मळा परिसरात वस्ती आहे. गेल्या दोन महिन्यापासून या वस्तीवर बिबट्याचा संचार होता. त्यामुळे चव्हाणके यांनी वस्तीवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहे. दररोज येणाऱ्या या बिबट्याने चव्हाणके यांच्या कुत्र्यावर यापूर्वी ताव मारला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून चव्हाणके कुटुंब बिबट्याच्या दहशतीखाली होते.

- Advertisement -

चव्हाणके कुटुंबीयांनी वस्तीवरील पडवीत सीसीटीव्ही लावून बिबट्या वर नजर ठेवली होती. चव्हाणके त्यांनी एक वासरू व बैल वस्ती बाहेर झाडाला बांधले होते. पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास बिबट्याने वस्तीवर प्रवेश केला. दबा धरुन आलेल्या बिबट्याने वासरा वर हल्ला चढवला.

वासराने दोरखंड तोडून पळण्याचा करण्याचा प्रयत्न केला मात्र बिबट्याने जोरदार हल्ला करत वासराची मान व पाय धरला. बैल व वासराच्या ओरडण्याचा आवाजाने भाऊसाहेब चव्हाणके व त्यांची दोन मुले घरातून बाहेर पळत आली. त्यांनी आरडाओरड करीत बिबट्याच्या दिशेने दगड भिरकावले. यानंतर बिबट्याने जखमी वासराला सोडून धूम ठोकली.

दरम्यान, घटनेची माहिती वनविभागाला दिल्यानंतरही वनविभागाचे कर्मचारी पंचनामा करण्यासाठी बुधवारी दुपारपर्यंत आले नसल्याची माहिती चव्हाणके यांनी दिली.

या परिसरात गेल्या काही दिवसापासून बिबट्याचा वावर असून वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या