Thursday, April 25, 2024
Homeनाशिकशिवभोजन थाळीला नागरिकांची वाढती मागणी; 150 थाळीची मर्यादा तोकडी

शिवभोजन थाळीला नागरिकांची वाढती मागणी; 150 थाळीची मर्यादा तोकडी

नाशिक । महाविकास आघाडीने सुरू केलेल्या शिवभोजन थाळीला 15 दिवसांचा कालावधी लोटला असून थाळीला नागरिकांची पसंती मिळत आहे. जिल्ह्यातील चारही केंद्रांवर थाळीसाठी रांगा लागत आहे. 150 थाळ्यांची मर्यादा तोकडी ठरते आहे. त्याहून दुप्पट लोक केंद्रांवर गर्दी करीत असून अनेकांना लाभाविनाच माघारी परतावे लागते आहे. त्यामुळेच थाळ्यांची मर्यादा वाढवून द्यावी अशी मागणी या केंद्र चालकांकडून केली जात आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक जाहीरनाम्यात सत्तेत आल्यास दहा रुपयात जेवण देऊ असे आश्वासन दिले होतेे. प्रत्येक गरीब आणि गरजू व्यक्तीला माफक दरात पोटभर अन्न मिळावे हा त्याचा उद्देश होता. सत्तेत आल्यानंतर ठाकरे यांनी शिवथाळी योजनेची राज्यभरात अंमलबजावणी सुरू केली आहे. नाशिकमध्येही शहरात तीन तर मालेगावात एका ठिकाणी या केंद्राची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून तेथे शिवथाळीचा लाभ घेण्यासाठी पहिल्या दिवसापासूनच नागरिकांची गर्दी होते आहे.

- Advertisement -

प्रत्येक केंद्राला 150 थाळ्यांची मर्यादा घालून देण्यात आली आहे. परंतु या थाळ्या दुपारी एक ते दीडपर्यंतच संपत असून तेवढ्याच नागरिकांना लाभाशिवाय माघारी पाठवावे लागत असल्याची कैफियत केंद्र चालकांकडून मांडण्यात येते आहे. नागरिकांची मागणी लक्षात घेऊन थाळ्यांची संख्या वाढवावी अशी मागणी केंद्र चालकांनी जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर यांच्याकडे केली आहे. परंतु याबाबतचा निर्णय धोरणात्मक असून तो राज्य सरकारच्या पातळीवरच घेतला जाऊ शकतो असे नरसीकर यांनी स्पष्ट केले आहे.

ही योजना प्रायोगिक स्तरावर राबविण्यात येत असून तीन महिन्यांत काय अनुभव येतो याबाबतची निरीक्षणे नोंदवून ठेवण्याच्या सूचना सरकारने जिल्हा प्रशासनांना दिल्या आहेत. 26 जानेवारीला या योजनेचा श्रीगणेशा झाला. त्यामुळे 26 एप्रिलपर्यंत निरीक्षणे, त्रुटी, अपेक्षा नोंदविल्या जाणार आहेत. त्यानंतरच या योजनेच्या विस्ताराबाबत सरकारकडून पाऊले उचलली जाणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या