दिंडोरी : मातीच्या चुलींना सुगीचे दिवस; महिलांच्या हातांना रोजगार

दिंडोरी : मातीच्या चुलींना सुगीचे दिवस; महिलांच्या हातांना रोजगार

पालखेड बं. । काही दिवसांपूर्वी गॅस सिलिंडरचे दर वाढवण्यात आल्यामुळे ग्रामीण भागामध्ये गावोगावी मातीच्या चुलींना सुगीचे दिवस आले आहे.  धुरापासून मुक्ती मिळावी, यासाठी केंद्र सरकारने उज्वला योजना सुरू केली होती. या योजनेला ग्राहकांचा प्रतिसादही चांगला मिळाला होता. 100 रुपयांत गॅस़ जोडणी मिळत असल्याने सुरुवातीला या योजनेला ग्राहक वर्गाने भरभरून दाद दिली.

मात्र या गॅस जोडणीनंतर सिलिंडरची मागणी हळूहळू कमी होत गेली. याला पर्याय म्हणून पुन्हा एकदा ग्रामीण गृहिणी मातीच्या चुलीकडे वळाल्या आहेत. चुलीही आता धूर ओकू लागल्या आहे. उज्वला योजना सुरू झाल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र थोड्या-थोड्या अंतराने सिलिंडरच्या किमतीही वाढल्या, अनुदानित असणार्‍या या सिलिंडरच्या किमतीही आवाक्याबाहेर गेल्याने पूर्वीसारखी आपली चूल बरी, अशी भावना तयार होऊन गरीब कुटुंबातील गृहिणी चुलीकडे वळू लागल्या आहेत.

या मातीच्या चुलींना सरपण मिळणे कठीण असले तरी कोणत्या ना कोणत्या कारणाने दिवसभर शेतात राबून एक वेळेची सांज धकेल, या हेतूने लाकूड फाटा आणण्यासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या काटेरी बाभळी व इतर झुडपांचा सरपण म्हणून विना पैशांच्या फांद्या काड्या-कुड्या जमा करून एक वेळ धकून नेत आहे. याशिवाय गावागावी दुकानांमध्ये मिळणारे रॉकेलही आता मिळत नसल्याने मोठी तारांबळ होत असल्याने मातीची चूल हाच एक पर्याय म्हणून निवडला आहे.

यासाठी लागणार्‍या पशुधनांच्या गोवर्‍या व लाकडे तसेच द्राक्षेबागेचेही सरपण वर्षभर साठवून त्याचाही चुलीसाठी उपयोग करून घेतात. सध्या या मातीच्या चुलींना गावोगावी मागणी वाढत असून यामध्ये अवलाची चूल व सडीची चूल यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. या चुली 100 ते 200 रु. पर्यंत विकल्या जात आहे. त्यामुळे इंधनावरील होणारा खर्च वाचत आहे.

काही दिवसांपूर्वी घरगुती गॅस सिलिंडरचे अनेक वेळा दर वाढत असल्याने हा घरगुती गॅस नागरिकांना परवडत नसल्याने महिला वर्गांमध्येही नाराजी व्यक्त होत आहे. सध्या ग्रामीण भागातील महिला दिवसभर शेतात राबून रस्त्यालगतच्या काटेरी झुडपे, गोवर्‍या व द्राक्षबागेचे सरपण यांचा वापर करतात. त्यामुळे आता मातीच्या चुलींना पूर्वीसारखेच दिवस येत असून यामुळे रोजगार उपलब्ध होत आहे. या मातीच्या चुलींमध्ये दोन प्रकार आहेत. त्यात सडीची चूल व दुसरी आवलाची चूल या चुलींना महिलावर्ग पसंती देत आहे. 100 ते 200 रुपयांपासून या मातीच्या चुलीचे दर आहेत.
-सत्यभामाबाई सोनवणे, पालखेड बं.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com