इगतपुरी-पहिणे- त्र्यंबकेश्वर होणार टुरिस्ट स्पॉट

इगतपुरी-पहिणे- त्र्यंबकेश्वर होणार टुरिस्ट स्पॉट

नाशिक । प्रशांत निकाळे
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) निसर्गाचे कोंदण लाभलेले इगतपुरी व त्र्यंबकेश्वरचा पर्यटनाच्यादृष्टीने विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटन विभागाकडून याबाबत सर्वेक्षण सुरु आहे. वरील ठिकाणे भविष्यात टुरिस्ट स्पॉट म्हणून विकसित केली जाणार आहेत. केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेत त्र्यंबकेश्वरचा समावेश आहे. लवकरच धार्मिक पर्यटनाला चालना मिळावी यावर काम सुरु आहे. मंत्रीमंडळात भुजबळांचा समावेश झाल्याने नाशिकच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

मागील सरकारच्या कालावधीत पर्यटनाच्यादृष्टीने नाशिककडे दुर्लक्ष झाले होते. नाशिक जिल्हा हा साहसी पर्यटन याबरोबरच, वैद्यकीय पर्यटन, कृषी पर्यटन, मान्सून पर्यटन, धार्मिक पर्यटनाचा अमर्याद क्षमता आहे. मात्र, ते विकसित करण्यावर अपेक्षेप्रमाणे काम होऊ शकले नाही. शहरातही पर्यटनाला चालना देण्यासाठी अनेक प्रकल्प राबविण्यात आले होते. पण ते पूर्ण होऊ शकले नाही. पर्यटन क्षेत्रातील काही ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण झाले तरी त्यांची स्वप्नपूर्ती झाली नाही आणि ते कुलुपबंदच राहिले.

बोट क्लब, कलाग्राम, अ‍ॅडव्हेंचर पार्क, ग्रेप पार्क आणि इतर बरेच प्रकल्प अद्याप सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. असुरक्षित पर्यटन पद्धती आणि अधिक पर्यटकांचे आकर्षण असणा याभागात सुविधांच्या अभावामुळे एमटीडीसीला पर्यटन केंद्र म्हणून याकडे पाहण्याची संधी मिळाली आहे. पर्यटन विभागाने या भागात काही मूलभूत सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकल्प अद्याप पडताळणीमध्ये आहे आणि या भागाचे सर्वेक्षण चालू आहे.

पर्यटन विभागाने येथे शेड, पार्किंगची जागा, रेस्टॉरंट, सायकल ट्रॅक यासारख्या सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाणार आहे. त्यासाठी लवकरच काम सुरु होणार असून याबाबत आराखडा तयार केला जाईल, असे पर्यटन विकास महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.

भुजबळांचे डी्रम प्रोजेक्ट सुरु होणार ?
छगन भुजबळ जिल्ह्याचे पालकमंत्री असताना पर्यटन वाढीसाठी प्रयत्न झाले होते. मात्र, मागील सरकारच्या काळात या योजना बासनात गुंडाळून ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, भुजबळांचा आगमनानंतर नाशिकमधील घडामोडींना वेग मिळेल. बोट क्लब, अ‍ॅडव्हेंचर पार्क, द्राक्षे पार्क हे प्रकल्प नाशिकचे माजी पालकमंत्री यांचे स्वप्न होते. त्याच्या पुनरागमनानंतर नाशिककरांना आशा आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com