Thursday, April 25, 2024
Homeनाशिकएसटी महामंडळाला शासनाने दिले २५० कोटी रुपये; एक लाख कर्मचाऱ्यांना मिळेल वेतन

एसटी महामंडळाला शासनाने दिले २५० कोटी रुपये; एक लाख कर्मचाऱ्यांना मिळेल वेतन

नाशिक : एसटी कर्मचाऱ्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन देण्यासाठी एसटी कामगार संघटना आक्रमक झाल्यानंतर राज्य सरकारच्या वतीने एसटी महामंडळाला वेतन अदा करण्यासाठी सवलत मूल्यांच्या प्रतिपूर्तीपोटी २५० कोटी मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच एप्रिल महिन्याचे मासिक वेतन कर्मचाऱ्यांना देण्यासंबंधात एसटी महामंडळाकडून सूचना देण्यात आल्या आहेत.

एप्रिल महिन्याचे मासिक वेतन महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना (मान्यताप्राप्त), महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक), महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस यांच्यावतीने वारंवार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री, परिवहन मंत्री, परिवहन राज्यमंत्री यांना पत्रव्यवहार केला गेला होता.

- Advertisement -

एसटी कर्मचाऱ्यांना वेतन देण्याबाबत राज्य शासनाकडे विविध सवलतींच्या प्रतिपूर्तीचा शिल्लक निधी मिळण्याबाबत महामंडळाकडून प्रस्ताव पाठवला गेला होता. तो निधी लवकरात लवकर मिळविण्यासाठी संघटनेचे प्रयत्न सुरू होते. त्यानुसार या मागणीची दखल घेऊन शासनाने २५० कोटी रूपये मंजूर केले आहेत.

त्यामुळे कर्मचा-याच्या एप्रिल महिन्याचे वेतन सोमवारपर्यंत होणार असल्याचे महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी सांगितले आहे. शासनाच्या निर्णयानुसार एस.टी. कर्मचा-यांचे वेतन माहे एप्रिल २०२० देय मे २०२० संपूर्ण वेतन एकाच टप्प्यात देय असलेल्या तारखेस वेतन अदा करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले होते.

परंतु, एस.टी. महामंडळाकडे वेतन अदा करण्याकरीता रक्कम उपलब्ध नसल्याने दि. १ मे व ७ मे रोजी देय असलेल्या कर्मचारी व अधिका-यांना वेतन अदा करण्यात आलेले नव्हते.

करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारने दि. २३ मार्च २०२० पासून एस.टी. सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एस.टी. महामंडळाचे प्रती दिन २१ कोटी रुपयाचे उत्पन्न बुडत आहे. हे उत्पन्न बुडाल्यामुळे एस.टी. महामंडळाकडे कर्मचा-यांच्या वेतनाकरीता पुरेशी रक्कम उपलब्ध नव्हती.

शासनाच्या निर्णयानुसार एस.टी. कर्मचा-यांचे वेतन माहे एप्रिल २०२० देय मे २०२० या महिन्याचे संपूर्ण वेतन एकाच टप्यात वेतन अदा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विविध प्रवास सवलत मुल्यांच्या प्रतिपुर्तीपोटी दयायच्या रकमेसह माहे एप्रिल २०२० देय मे २०२० या महिन्याचे वेतन अदा करण्यासाठी ३०० कोटी रूपये एस.टी. महामंडळास द्यावेत जेणेकरुन एस.टी. कर्मचा-यांचे वेतन अदा होईल अशी मागणी महाराष्ट्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री, परिवहन मंत्री, परिवहन राज्यमंत्री यांच्याकडे महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेच्या वतीने करण्यात आली होती.

त्यानंतर महाराष्ट्र शासनाने विविध सवलतीच्या प्रतिपूर्तीपोटी थकबाकीतून २५० कोटी रूपये मंजूर केले आहेत. त्यामुळे एसटी कर्मचा-यांच्या वेतनाचा प्रश्न सुटला असून १ लाख ५ हजार कर्मचा-यांना वेतन मिळणार असल्याचे अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी माहिती दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या