घोटी : फास्टटॅगचा गोंधळ सुरूच; दुसऱ्या दिवशीही वाहनांच्या रांगा

घोटी : फास्टटॅगचा गोंधळ सुरूच; दुसऱ्या दिवशीही वाहनांच्या रांगा

इगतपुरी : घोटी टोल नाक्यावर सलग दुसऱ्या दिवशीही वाहनांच्या रांगा कमी होतांना दिसल्या नाही. याचा फटका स्थानिक दुचाकीस्वार व रिक्षा यांसह लांब पल्ल्याच्या वाहनांना झाला. टोल वरील स्वच्छतेची ‘ ऐसी की तैसी ‘ त्यामुळे परिसरात दुर्गंधीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. याकडे टोल प्रशासनाचे दुर्लक्ष कायम असल्याने प्रवाशी, वाहन चालक नागरिक हैराण झाले आहे.

रविवार ( ता.१५ ) रोजी मध्यरात्री नंतर फास्टॅग अंमलबजावणी सुरू केली मात्र पहिल्याच दिवशी लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या अन टोल प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे मुबंई येथील प्रवाशाला आपल्या प्राणास मुकावे लागले. मनोहर मोहन भिसे ( वय ५१ ) लिंबोनी बाग, गोवंडी, मुंबई ही व्यक्ती मृत झाली. लांबच लांब वाहांनाच्या रांगा त्यात जोरजोरात ओरडुन देखील टोल प्रशासनाने लक्ष दिले नाही, पोलिसांच्या सहकार्याने खाजगी वाहनाने आम्ही रुग्णालयात उपचारासाठी निघालो वेळेत रुग्ण वाहिका मिळाली असती तर त्यांचा प्राण वाचला असता असे भिसे यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

टोल वसुली जोरात असली तरी त्या मानाने वाहन चालक, प्रवाशी यांची सुरक्षा अथवा राष्ट्रीय महामार्गकडून मिळणाऱ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाही. दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. मात्र महामार्गाची जागोजागी चाळण, बंद असलेले हायमास्ट, तुंबलेल्या गटारी, साईड पट्ट्याची झालेली वाताहात, फलकांची झालेली दुर्दशा जीव घेणे खड्डे वरतून वारेमाप टोल धाडीने नागरिक हैराण झाले आहे. टोल नाक्यावर प्रवाशांना सुलभ सौचालय बांधण्यात आले.

मात्र त्यासाठी सेफ्टी टँक नसल्याने स्थानिक शेतकरी यांच्या शेतात उघड्यावर ड्रेनेजचे पाणी सोडण्यात आल्याने परिसरात दुर्गंधीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. त्यातील विजेचा पुरवठा कायम खंडित ठेवला जात आहे. येथील कंत्राटी कामगारांना वेळेत पगार अथवा ओळख पत्र देखील देण्यात आलेले नसल्याने कर्मचारी कोण? हे ओळखणे दुरापास्त आहे. त्यातून महिलांची छेडछाड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. टोल परिसरात स्वच्छता नसल्याने जागोजागी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com