Friday, April 26, 2024
Homeनाशिकराज्यांतर्गत मोफत प्रवासासाठी एसटी कडून ठेंगा; गावाकडे जाणाऱ्या मजूरांचा हिरमोड

राज्यांतर्गत मोफत प्रवासासाठी एसटी कडून ठेंगा; गावाकडे जाणाऱ्या मजूरांचा हिरमोड

सिन्नर | अजित देसाई : लॉकडाऊनमुळे ठीकठिकाणी अडकून पडलेल्या राज्यातील नागरिकांना त्यांच्या घरी परतण्यासाठी एसटी बस सेवा सशुल्क द्यायची की मोफत यावरून गोंधळ सुरू आहे. (दि.११) पासून सुरू होणारी मोफत सेवा आता अचानक स्थगित करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. परिणामी गावाकडे परतण्याची ओढ लागलेल्या मजूर, कामगार यांना रणरणत्या उन्हातच आपला प्रवास सुरु ठेवण्याची वेळ आली आहे.

शनिवारी (दि.९) राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी सोमवारपासून मजूर, विद्यार्थी, भाविक आणि अडकलेल्या लोकांसाठी मोफत प्रवास सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. मात्र, आता एसटी बस सेवा सशुल्क द्यायची की मोफत यावरून प्रशासकीय स्तरावर गोंधळ असून एसटी महामंडळाकडून ही सेवा स्थगित करण्यात येत असल्याचे पत्रक रविवारी रात्री जारी करण्यात आले.

- Advertisement -

त्यामुळे आगारात नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांना माघारी पाठवण्यात येत आहे. यामुळे एसटी कर्मचारी आणि गावी जाण्यासाठी इच्छुक असलेल्या प्रवाशांमध्ये बाचाबाचीचे प्रकार घडत आहेत. राज्याच्या परिवहन खात्याकडून घरी परतणाऱ्या नागरिकांसाठी एसटीची मोफत सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

यासाठी एसटीकडून कोणतेही भाडे आकारण्यात येणार नाही असे सांगण्यात आले होते. तसेच यासाठी नोंद नोंदणीची नियमावली सुद्धा जारी करण्यात आली होती. मात्र, प्रशासनिक पातळीवर गोंधळ उडल्याने अखेर ही सेवा स्थगित करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्यांतर्गत प्रवासासाठी ४६ किमीचा दर

एसटीकडून राज्यात अडकलेल्या परप्रांतीय नागरिकांना राज्याच्या सीमेपर्यंत व राज्याच्या सीमेवर येणाऱ्या परराज्यातील महाराष्ट्रीय नागरिकांना त्यांच्या जिल्हयात नेऊन सोडण्यासाठी मोफत बस धावणार आहे. राज्यांतर्गत प्रवास करणाऱ्यांना २२ जणांचा गट करून ४६ रुपये प्रती किमी या दराने बस आरक्षित करावी लागेल.

या दराने बस डेपोतून पुन्हा डेपोत जमा होईपर्यंतच्या परतीचा अंतराचे भाडे या २२ प्रवाशांना विभागून द्यावे लागणार आहे. एसटी च्या या निर्णयामुळे गावाची ओढ लागलेल्या असंख्य प्रवाशांचा हिरमोड झाला आहे. एकतर लॉक डाऊन मुळे खिशात दमडी राहिली नाही. परिणामी गावाकडे जाण्यासाठी अनेकजण मुलाबाळांसह पायी प्रवासाला निघाले आहेत.

सरकारकडून योग्य निर्णयाची अपेक्षा

दोन दिवसांपूर्वी एसटी मार्फत राज्यात अडकलेल्या विद्यार्थी आणि मजुरांना त्यांच्या गावी सोडण्याची घोषणा परिवहन मंत्र्यांनी केली होती. त्यानुसार आज या बस सोडण्यात येणार होत्या. मात्र रात्रीत निर्णय बदलण्यात आला. परराज्यातील नागरिकांना व राज्याबाहेरील नागरिकांना सोडण्या- आणण्यासाठी एसटी सोडण्याचा निर्णय योग्यच आहे. मात्र राज्यांतर्गत अडकलेल्या लाखो मजुरांचे व त्यांच्या कुटुंबियांना पायपीट करण्याची वेळ सरकारने आणू नये.

ठिकठिकाणी अडकलेले मजूर, विद्यार्थी हे गरीब आहेत. त्यांच्याकडून तिकिटाचे पैसे सरकारने आकारू नयेत. राज्यांतर्गत प्रवासासाठी कामगार, मजूर, विद्यार्थी यांची सोय व्हावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सोबत चर्चा करणार असल्याचे भाजपा नेते, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘दैनिक देशदूत’ला सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या