पंचवटी : गुंजाळ मळा येथे आग लागून गोडावून खाक

पंचवटी : गुंजाळ मळा येथे आग लागून गोडावून खाक

पंचवटी : हिरावाडी परिसरातील गुंजाळ मळ्यातील एका गोडाऊनला आज दुपारी अचानक आग लागल्याने त्यामधील मंडप , केटरिंग साहित्य जळून खाक झाले. तसेच याच ठिकाणी असलेल्या पाण्याच्या प्लांटचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान तासाभरात अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. मात्र आगीचे कारण समोर आले नाही. या प्रकरणी पोलिसांनी नोंद केली आहे.

पंचवटीतील हिरावाडी परिसरातील गुंजाळ मळ्यातील एका गोडाऊन मध्ये अमोल पोद्दार यांचे मंडपाचे साहित्य, प्रवीण शिरोडे यांचे केटरिंग साहित्याबरोबरच गौरव पाटील यांचा पाण्याचा प्लॅन्ट आहे. या ठिकाणी मंगळवार (ता.१७) रोजी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान अचानक आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. परिसरातील नागरिकांबरोबर नगरसेविका पूनम मोगरे, प्रियंका माने यांना आगीची माहिती मिळताच त्यानी तात्काळ अग्निशामक विभाग आणि पोलिसांना माहिती दिली.

अग्निशमन दलाचे जवान लीडर फायरमन कैलास हिंगमिरे,फायरमन एस बी निकम,पी पी बोरसे,यू जी दाते, ज्ञानेश्वर पाटील, विजय पाटील विजय नागपुरे यांचे पथक घटनास्थळी दाखल होत त्यांनी पाण्याचा फवारा करीत आग आटोक्यात आणली. जवळपास तीन ते चार बंबाच्या साहयाने तासाभरात आग विझविण्यात आली. या आगीत मंडप, केटरिंग साहित्य आणि पाण्याच्या प्लांटचे साहित्य जळून खाक झाले. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून आगीचे कारण स्पष्ट झाले नाही. या बाबत पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com